देहराडूनच्या सुप्रसिद्ध 'ग्रीन बुकशॉप'ने खास आयोजित केलेल्या रस्किन बाँडच्या सर्व साहित्याच्या प्रदर्शनाचे आणि त्याच्या 'नोट्स फ्रॉम अ स्मॉल रूम' या नव्या पुस्तकाच्या अनौपचारिक प्रकाशनाचे आमंत्रण रस्किनच्या आवडत्या जिरॅनियमच्या सुकवलेल्या फुलांना चिकटवून तयार केलेल्या एका सुंदरशा बुकमार्कसहित पोस्टाने माझ्याकडे आले. सोबतच्या माहितीपत्रकात पुस्तकातले त्याचे काही लेख छापले होते. एका लेखाचं नाव होतं 'थॉट्स ऑन रिचिंग सेव्हंटी फाईव्''. प्रदर्शनाचे निमित्तच होते रस्किनचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा करण्याचे.
रस्किन ७५ वर्षांचा झाला?
मला इतकं आश्चर्य वाटलं! इतकी वर्षं हातात हात घालून माझ्यासोबत निळ्या पाईन्सच्या आणि देवदारांच्या जंगलात निरुद्देश भटकंती करणारा, मला निसर्ग पाहायला शिकवणारा 'रस्टी' वयातीत आहे असाच माझा समज होता.
बुकमार्क घालून ठेवण्यासाठी मी त्याचं 'बुक ऑफ नेचर' उघडलं.
रस्किनचं कोणतंही पुस्तक उघडलं, की हिमालयातील निळ्या शिवालिक पर्वतराजींचे देवदार, पाईन आणि चीडच्या रांगांचे उतार, मोत्यांचा चुरा उधळत जाणारे स्फटिकशुभ्र खळाळते झरे, जंगली गुलाब, पेट्युनिया, पॅन्सी, बेगोनिया यांसारख्या असंख्य चिमुकल्या रानफुलांनी भरून गेलेल्या हिरवळी; चेरी, अक्रोड, मेपलच्या दाट छायेतलं ते टुमदार आयव्ही कॉटेज आणि त्या कॉटेजच्या पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खोलीतल्या खिडकीजवळच्या डेस्कवर बसून 'लँडोर डेज'सारखी नितांतसुंदर पुस्तके एकामागून एक लिहीत राहणारा रस्किन बाँड हे असं सगळं नजरेसमोर शब्दशः दिसायला लागतं. कारण रस्किन पुस्तकं लिहीत नाही, निसर्गचित्र रंगवतो; शब्दांतून! स्वतः रस्किन त्या निसर्गचित्राचाच एक अविभाज्य भाग. तेव्हा तो तर दिसणारच त्याच्या प्रत्येक पानातून.
रस्किन खिडकीजवळच्या डेस्कवर लिहितो आहे. त्याच्या खिडकीखालून एक वळणदार लहानसा रस्ता लँडोरच्या बाजाराकडे जात असतो. खिडकीलगतच एक खूप जुनं चेरीचं आणि वडाचं झाड आहे. झाडाखाली प्रेम आणि राकी वगैरे मुलं खेळत आहेत. पिवळे वॉर्ब्लर्स झाडांचे कोवळे कोंब कुरतडत आहेत. चेरीचा बहर आणि सरत्या हिवाळ्यात अधिकच लालभडक होत जाणारी स्नेकलिलीची फळे न्याहाळत रस्किन लिहितो आहे.गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळ देहराडूनपासून काही अंतरावरच्या 'लँडोर' या निसर्गरम्य, शांत गावात रस्किन राहत आहे. त्याच्या सोबतीला आहे फक्त हिमालयातला निसर्ग आणि त्या निसर्गाइतकीच निरभ्र, निष्पाप पहाडी माणसं!
'इट्स नॉट टाईम दॅट इज पासिंग बाय.. इट इज यू अँड आय..!' ..या पुस्तकातल्या एका पानामध्ये बुकमार्क घालून ठेवताना त्याने लिहिलेल्या वाक्यावर नजर जाते. लॅंडोरच्या बाजारातील रस्त्यावर वर्षानुवर्षे शेंगदाणे विकत बसणार्याचे अप्रतिम शब्दचित्र केवळ काही ओळींतच उभे करताना रस्किनने लिहिलेले असते.. "त्याचे नाव काय, वय किती विचारण्याच्या भानगडीत कधी कुणी पडले असतील असे वाटत नाही. बाजारातल्या जुन्या मनोर्यावरच्या घड्याळासारखे किंवा तिथल्या त्याहून पुरातन चेरीच्या झाडासारखे त्याचे अस्तित्व सर्वांनी गृहितच धरले होते जणू. पण तो त्या झाडापेक्षाही जास्त टिकाऊ आणि घड्याळापेक्षा जास्त विश्वासार्ह वाटे. त्याला स्वतःचे कुटुंब नव्हते, पण त्याच्या आजूबाजूला माणसांचा सदैव गराडा असे. त्यांच्यात असूनही तो वेगळा, कधीतरी दूरस्थही भासे. त्याचा सगळ्यांशी परिचय होता, पण कुणाशीही जास्त घसट नसावी, एकटा नसूनही एकाकी असणारा तो.." रस्किनच्या बोटांतून झरणार्या या शब्दचित्रात त्याचे स्वतःचेच प्रतिबिंब उमटले होते का? कदाचित!
आपल्या वडिलांसोबत हिमालयातल्या निसर्गराजींत घालवलेल्या आपल्या बालपणातील आठवणींवर आधारित 'द रूम ऑन द रूफ' हे पहिले पुस्तक लिहिले, तेव्हा रस्किन १७ वर्षांचा होता. या पुस्तकात दिसणारा 'रस्टी' उत्साही, काहीसा अबोल, लाजरा, बिबळ्या दिसावा म्हणून रोज पहाटे उठून झर्यावर धाव घेणारा, धुक्यात हरवून जाणारा, झाडांवरच्या पक्ष्यांवर आणि आपल्या सोमी, किशन, रणबीर या दोस्तांवर सारखंच प्रेम करणारा होता.
तो रस्टी ताज्या, टवटवीत मनोवृत्तीचा होता. त्यावेळी रस्किन जिथे राहत होता, ते देहराडून जेमतेम १०-२०,००० लोकवस्तीचं, दाट वृक्षराजीने वेढलेलं, छोटंसं देहरा गाव होतं. रस्किनने त्याच्या आसपासच राहून पूर्णवेळ लेखन करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आता सहा दशके उलटली. देहराडूनची लोकसंख्या १० लाखांवर पोचली. माथ्यावरच्या विरळ होत गेलेल्या केसांच्या पट्टीसारखे, देहर्यातले दाट जंगलही मागे मागे हटत गेले.
रस्किन तिथेच आसपास या सार्या बदलांचा साक्षी होऊन राहिला. त्याच्यातला रस्टी हिमालयाच्या पर्वतराजींमध्ये, तिथल्या माणसांमध्ये तितकाच मनमुराद रमत राहिला. दरम्यानच्या काळात ६ कादंबर्या, ७५ लघुकथा, १२ दीर्घ ललितलेखांचा संग्रह, ६ प्रवास व निसर्ग लेखसंग्रह, असंख्य कविता व गाणी, लहान मुलांसाठी गोष्टी असं शब्दभांडार रस्किनने आपल्या पुढ्यात ओतलं आणि त्यातल्या प्रत्येक शब्दामधून रस्टीची तीच ताजी, टवटवीत, उत्साही मनोवृत्ती आपण अनुभवली.रस्किन खरोखरच किती वर्षांचा झाला आहे, ह्या गोष्टीला आपल्या दृष्टीने काहीही अर्थ नाही. रस्टी वयातीतच आहे.
सागरी जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेत अनेकांनी प्रदीर्घ लेखन केले आहे. कॉनराड, मेल्व्हिल, स्टीव्हन्सन, मोसफिल्ड, हेमिंग्वे इत्यादी. पण असं लेखन प्रत्यक्ष पर्वतराजींमध्ये राहून सातत्याने करणारे फार मोजके. पूर्णवेळ लेखनाचाच व्यवसाय करणारे तर अशा भानगडींत पडणेच शक्य नाही. पहाडी जीवनाला काही ग्लॅमर नाही. शहरं प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही पुरवतात. तेव्हा शहरात राहून आणि चार दिवस हिमालयात काढून मग त्यावर वर्णनात्मक लेख लिहिणारे शेकड्यांनी मिळतील. पण रस्किनने असं केलं नाही. त्याचा एक 'निसर्गलेखक' म्हणून असणारा वेगळेपणा ह्यातच आहे. प्रसारमाध्यमांपासून, पर्यायाने प्रसिद्धीपासूनच दूर राहत, लॅंडोरसारख्या, हिमालयातील इतर ग्लॅमरस हिल-स्टेशन्सच्या नखर्यांपासून अलिप्त असणार्या शांत गावात राहून पूर्णवेळ फक्त लेखनच करण्याचा रस्किनचा तरुण वयात घेतलेला निर्णय नुसता वेगळा नव्हे, तर धाडसीच म्हणायला हवा. पण त्याने त्याची लिखाणावरची आणि निसर्गावरची निष्ठा हिमालयाइतकीच अविचल राखली.
ही निष्ठाच तर त्याच्या लंडनला नव्याने नशीब आजमावायला गेलेल्या तरूण पावलांना देहराडूनमध्ये परत खेचून घेऊन आली होती.
कसौलीच्या मिलिटरी हॉस्पिटलामध्ये एडिथ क्लार्क आणि ऑब्रे अलेक्झांडर बाँड यांच्या पोटी जन्मलेल्या रस्किनचे बालपण जामनगर, देहराडून आणि सिमल्यामध्ये गेले. छोटा रस्टी काहीसा अबोल, अंतर्मुख वृत्तीचा होता. आई-वडील विभक्त झाले होते. आई लहानपणीच घर सोडून गेल्याने असेल, पण तो आणि त्याचे वडील मनाने खूप जवळ होते. वडील निसर्गप्रेमी होते आणि रस्टीला घेऊन ते हिमालयातल्या वाटांवर खूप भटकंती करत. मोकळ्या जागांवर, तोड झालेल्या जंगलातल्या रिकाम्या पट्ट्यांवर झाडं लावत. 'अवर ट्रीज स्टिल ग्रो इन देहरा' लेखामध्ये या वडिलांसोबत घालवलेल्या काळाचे आणि त्यावेळी जोपासल्या गेलेल्या निसर्गप्रेमाचे खूप बहारदार वर्णन रस्किनने केले आहे. रस्किन लहानपणी पुस्तकंही भरपूर वाचायचा. वडिलांनी त्याच्या एका वाढदिवसाला त्याला एक गवतफुलाचे चित्र असणारी डायरी भेट दिली. आईवाचून एकाकी वाढणार्या रस्टीच्या मनात भावनांची असंख्य आंदोलने उसळत असणार, हे त्यांनी ओळखले होते. त्याचा निचरा सर्जनाद्वारे व्हावा हा एक हेतू डायरी देण्यामागे होताच. रस्किनने त्यात आजूबाजूचा निसर्ग, त्याला भेटणारे लोक, रोजचा घालवलेला दिवस यांच्या नोंदी करून ठेवायला सुरुवात केली. वडील त्यानंतर लगेचच मलेरियाने वारले. मग आपल्या आई, आजीसोबत, वसतीगृहात अशी रस्टीच्या आयुष्यातली वर्षं जात राहिली. पण या सर्व काळात तो रमला फक्त निसर्गात आणि त्याच्या डायरीतल्या नोंदींमध्ये. आपल्या सोबतच्या दोस्तांना तो डायरीत लिहिलेलं वाचून दाखवे आणि ते आग्रह करीत, तेव्हा त्यांच्यावरही लिहीत असे.
सिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आईने आग्रह धरला, की रस्टीने आता लंडनला जावे. भारतात राहून मुलाचे भवितव्य घडणार नाही याची आईला ठाम खात्री होती. ब्रिटिश राज आता संपले होते आणि इथल्या बहुतेक सगळ्याच ब्रिटिश आणि अॅंग्लोइंडियन कुटुंबांनी माघारी परतायची घाई चालवली होती. रस्किनच्या आयुष्यातला तो सर्वांत कठीण काळ. चित्र-विचित्र संमिश्र भावनांनी, काय करायचे या विचारांनी मन गोंधळून गेले होते. लेखक बनायची उर्मी मनाच्या तळाशी दाबून ठेवून, नुकत्याच तारुण्यात प्रवेश करणार्या रस्किनने भविष्यातल्या इतर 'सुवर्णसंधी' आजमावून बघण्यासाठी शेवटी लंडनला प्रयाण केले. त्याच्या मनातल्या रस्टीने मात्र हिमालयाचा निरोप घेण्याचे साफ नाकारले. तो मागेच, त्याच्या छतावरील खोलीतून झर्याकाठी पाणी प्यायला येणार्या बिबळ्यावर नजर ठेवत, पिंपळाखाली मोडकी सायकल ठेवून बाजूच्या अक्रोडाच्या झाडावरच्या लांब शेपटीवाल्या माकडांच्या खोड्या काढत राहिला.लंडनमध्ये रस्किन कॉलेजात गेला, त्याने ट्रॅव्हल एजन्सीपासून ते फोटोंच्या दुकानातील विक्रेत्यापर्यंत विविध नोकर्या केल्या आणि त्या वर्षांतल्या प्रत्येक दिवशी मनातला रस्टी झुरत राहिला हिमालयाच्या कुशीतल्या त्याच्या गावात परतण्यासाठी. त्याला तिथल्या हवेची, झाडांची, मित्रमैत्रिणींची, बाजारातल्या शेंगदाणेवाल्याची, बेकरीवाल्याच्या मुलीची आणि अंगणातल्या मेपलच्या ढोलीमधल्या झुबकेदार शेपटीच्या खारीची सतत आठवण येत राहिली. मनाच्या याच बेचैन अवस्थेत मग रस्किनने एक दिवस 'द रूम ऑन द रूफ' लिहून काढले. त्यातल्या शब्दाशब्दांत त्याच्या मनातली हिमालयातल्या दिवसांची उसळती ओढ ठिबकत राहिली.
या पुस्तकाने साहित्यवर्तुळात चांगलीच खळबळ माजवली. तरूण रस्किनच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक भाषेतल्या आठवणींची मोहिनी सामान्य वाचकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांवरच पडली. ब्रिटिश कॉमनवेल्थ साहित्यिकांसाठी असणारा प्रतिष्ठेचा 'जॉन लेव्हलिन र्हिस पुरस्कार' त्याला पदार्पणातच मिळाला. वयाच्या फक्त १७ व्या वर्षी अशी प्रसिद्धी व सन्मान मिळालेल्या रस्किन बाँडचे भवितव्य लंडनला राहून इंग्रजी साहित्यजगतात आता लखलखीतपणे उजळणार, ह्यात काहीच शंका नव्हती. पण हातात पुरस्काराच्या रकमेचा चेक पडताच रस्किनने पहिली गोष्ट केली, ती भारतात परतण्याचे तिकीट काढण्याची. लंडनच्या चार वर्षांमधे ज्या शांत, शुभ्र, असीम हिमालयाचे स्वप्न तो रोज पाहत होता, त्या हिमालयाकडे त्याची पावले परत अपरिहार्यपणे वळली.
रस्किन स्वतःच्या घरी परतला.
देहराडूनला परतलेला रस्किन स्वतंत्र व एकटा होता. आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा महत्त्वाचा निर्णय त्याने घेतलेला होता. हातात पुन्हा एकदा डायरी होती, भोवती पाचूंसारख्या उलगडणार्या हिरव्यागार, चिरपरिचित वाटा होत्या. त्यांवरून तो मनाला येईल, तेव्हा हिंडू शकणार होता आणि पाय थकल्यावर ताज्या मनाने आज काय पाहिलं त्याच्या नोंदी डायरीत करणार होता.
देहराडूनमध्ये रस्किनला राहायला घर हवे होते, ते दिले बिबीजीने. त्याच्या सावत्र वडिलांच्या पहिल्या बायकोने. रस्किनच्या आईने दरम्यानच्या काळात दुसरे लग्न केले होते. सावत्र वडील आणि आईच्या दुनियेपासून तो आता मनाने पूर्ण विलग झाला होता. मात्र सावत्र वडिलांनी सोडून दिलेली त्यांची पहिली पत्नी, जिला रस्किन 'बिबीजी' म्हणून हाक मारत असे, ती मोठ्या हिमतीची व प्रेमळ स्त्री होती. रस्किनला तिचे विलक्षण कौतुक वाटे. देहराडूनमधली ती एकमेव आणि पहिली बाई, जिचे वाणसामानाचे दुकान होते. रस्किन सकाळच्या वेळात तिच्यासोबत धान्य खरेदी करायला मोठ्या बाजारात जाई. तूर, उडीद, चणे, राजमा वगैरेंची पोती उचलायला त्याची मदत होई. रस्किन लिहितो, "धान्य, डाळींची मला आता चांगली ओळख झाली, पण धान्याचा सौदा करणं मात्र मला जमायचं नाही. कदाचित म्हणूनच बिबीजीने ते दुकान माझ्या नावावर करून देण्याचा विचार रद्द केला असावा." आपण अगदी एकाकी, कष्ट करून लिहिणारे लेखक म्हणून ओळखले जावे, ही रस्किनच्या मनातली हौस काही बिबीजीने पुरी होऊ दिली नाही. तो म्हणतो, " दुपारी ती मला पराठे, शलगम किंवा टर्निपचं लोणचं आणि गाजराची मसालेदार कांजी असणारं जेवण पोटभर खायला घालायची" मग दुपारी दुकानातल्या वरच्या माळ्यावर बसून रस्किन लिहायला लागत असे. संध्याकाळी अंधार झाला, की बिबीजी केरोसीनचा कंदील पेटवून जाई. तिथे वीज नव्हती. "पण माझी काहीच तक्रार नव्हती." आपल्या तिथल्या दिवसांचं खूप सुंदर, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मिश्किल शैलीत वर्णन करताना 'देहरा आय नो' या पुस्तकात रस्किन पुढे लिहितो, "विजेचं बिल भरायला पैसेच नसण्याच्या त्या काळात, कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात लिहिलेल्या माझ्या लिखाणाला उलट एक 'सॉफ्ट आणि रोमॅंटिक ग्लो' आला. मी 'तरुण, आयुष्याशी झगडणारा लेखक' होऊ शकत नसल्याची माझी खंत थोडीफार शमली गेली."
रस्किन बाँडने त्या काळात लिहिलेली एकाहून एक सुंदर अशी 'रेन इन द माउंटन्स, द टाईम स्टॉप्स अॅट शामली, ऑल रोड्स लीड टू गंगा, व्हाईट क्लाऊड्स्-ग्रीन माउंटन्स, लॅंडोर डेज, अलाँग मंदाकिनी, टेल्स ऑफ ओल्ड मसूरी, ग्रेट ट्रीज ऑफ गढवाल, ग्रोइंग अप विथ ट्रीज, वन्स अपॉन अ माउंटन्स टाईम' वगैरे कित्येक पुस्तकं आणि ललित लेख वाचले, की त्याच्या त्या 'सॉफ्ट-रोमॅंटिक ग्लोइंग' शैलीचा प्रत्यय हमखास आपल्यालाही येतो. फक्त ती त्याच्या लिखाणातली जादू केरोसीनच्या कंदिलाच्या उजेडामुळे नसून त्याच्या मनातल्या हिमालयातल्या झर्यांसारख्याच निवळशंख, विशुद्ध निसर्गप्रेमामुळे आलेली आहे, इतपत जाणही आपल्याला आलेली असते.
रस्किन झाडांवर, फुलांवर, पर्वतांतल्या धबधब्यांवर लिहिताना जितका रमतो, तितकाच किंवा जरा अधिकच रमतो त्याच्या आजूबाजूच्या माणसांवर लिहिताना. व्यक्तिमत्त्वे अचूक आणि मोजक्याच शब्दांत उतरविण्याचे त्याचे कसब केवळ अपूर्व आहे. ' द ब्लू अंब्रेला'मधली ती चटपटीत बिनया, 'प्लॅटफॉर्म नंबर एट'वरची अनामिक स्त्री, रुद्रप्रयागवरून लहानपणीच त्याच्या जवळ राहायला आलेला प्रेम, रस्किनसाठी जुनाट, राजेशाही खुर्ची राखून ठेवणारा टेहरी रोडवरचा चहाटपरीवाला, विसरभोळा आणि गप्पिष्ट शेजारी कर्नल बिग्ज, रस्किनला अजिबात न आवडणारी केसांना जस्मिनचं तेल लावणारी मिस् बन आणि जिचं नाव रस्किनने कधीच त्याच्या विश्वासातल्या वाचकांनाही सांगितलं नाही, पण जिच्यावर मनोमन प्रेम केलं, ती तिबेटन दुकानातली विक्रेती आणि शामलीत अचानक भेटलेली त्याची जुनी प्रेयसी सुशीला - रस्किनच्या आयुष्यातली ही सारी लोभस माणसं आपल्या कायम लक्षात राहतात, त्याच्या पुस्तकांतून ती वारंवार डोकावत राहतात.
रस्किन बाँडच्या कथांवर चित्रपट निघाले, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळून ते गाजले ('द फ्लाईट ऑफ पिजन' या कादंबरीवरून शाम बेनेगलने काढलेला 'जुनून' आणि 'द ब्लू अंब्रेला' कथेवरून विशाल भारद्वाजने त्याच नावाचा काढलेला चित्रपट), 'अवर ट्रीज स्टिल् ग्रो इन देहरा' या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, १९९९मध्ये रस्किनला पद्मश्रीही मिळाला. पण अशा कुठल्याच प्रसिद्धीच्या झगमगाटात तो कधीच रमला नाही.
दिल्ली-मुंबईसारख्या शहरांत आल्यावर तो अस्वस्थ होतो. वाहनांच्या गजबजाटापासून कधी एकदा दूर जाऊन आपण आपल्या खिडकीखालच्या चेरीच्या झाडाखाली बसून, दगडावर विसावलेले निळे फुलपाखरू पाहत लिहायला लागतो असे त्याला होऊन जाते. "हिमालयाची झगमगती शिखरे सर करायचा, त्यांच्यावर चढाई करायचा उत्साह माझ्यात नाही. लहानशा, ओळखीच्या पायवाटा मला खुणावतात. त्यावरून चालत जवळच्या जंगलात, एखाद्या खेड्यात, छोट्या तळ्याकाठी किंवा भणाणता वारा असलेल्या टेकडीच्या माथ्यावर चालत जाण्यात मला अमाप आनंद मिळतो." रस्किन लिहितो. आणि मग आता इतकी वर्षं त्या वाटांवरून चालत राहिल्यावर आपणही त्या पहाडांचाच एक भाग बनलो आहोत, तिथल्या झाडांशी, खडकांशी, जंगली फुलांशी आपले रक्ताचे नाते जुळले आहे, उतरत्या संध्याकाळच्या उन्हात ओकवृक्षाच्या डवरलेल्या फांदीखालून चालत जाताना ते झाड प्रेमाने आपल्या डोक्याला स्पर्श करते, ते या जडलेल्या नात्यापोटीच याची रस्किनला खात्री पटते. आणि आपल्यालाही.
रस्किनची पुस्तकं वाचली नसती, तर आपल्याकरता हिमालय नुसत्याच एखाद्या रम्य निसर्गचित्रासारखा होऊन राहिला असता, असं मला नेहमीच वाटतं. फक्त बघावे आणि सुंदर आहे असे म्हणावे. पण हिमालय वाचायला शिकवला तो रस्किनने. हिमालय म्हणजे केवळ भव्य, चमचमती बर्फाची शिखरे नाहीत, तर तो त्यातल्या माणसांसकट, छोट्यांतल्या छोट्या रानफुलांसकट, पाईन-देवदारांच्या दमदार रांगांसकट, फुलपाखरे आणि झर्यांसकट एक जिवंत, स्पंदन करणारे व्यक्तिमत्त्व आहे, हे शिकवले रस्किनने.पुन्हा पुन्हा हिमालयाकडे पावले वळत राहिली, ती त्याने पुस्तकातून दाखवलेला निसर्ग आपल्या डोळ्यांनी पाहून पुन:प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी. बद्रिनाथच्या वाटेवरून जाताना किंवा जोशीमठचा प्राचीन तुतीचा वृक्ष पाहताना, मंदाकिनी अलकनंदेच्या तीरावरून चालताना, गढवालच्या खेड्यांतून प्रवास करताना, दरीतून उडत जाणार्या पक्ष्यांची आनंदी गाणी ऐकताना प्रत्येक वेळी हा आनंद मिळाला.
आयुष्यभर ज्यांच्यावर जिवापाड प्रेम केलं, ज्यांना 'द गार्डियन्स ऑफ कॉन्शस' मानलं, त्या झाडांना, पाईन देवदारांच्या समृद्ध रांगांना, सालाच्या देखण्या जंगलांना आता विरळ होत जाताना, मोठमोठ्या धरणांमुळे एकेक करत उजाड होत जाणार्या गावांना, रस्त्यांमुळे, वेड्यावाकड्या बांधकामांमुळे ठिसूळ होत गेलेल्या पर्वतकड्यांना, प्रदूषणामुळे माना टाकणार्या फुलांना, पुराने गिळंकृत केलेल्या वस्त्यांना पाहून व्यथित होत जाणारं रस्किनचं मन गेल्या काही वर्षांतल्या लिखाणातून सातत्याने जाणवत राहतं. सरकारी अनास्था, बेपर्वाई, माणसांचं जंगलांपासून तुटत गेलेलं नातं, नव्याने जन्म घेणारा स्वार्थी लोभीपणा यांवर फक्त हताश होणंच आपल्या हातात आहे, असं मानणारी उथळ निसर्गप्रेमी वृत्ती रस्किनकडे सुदैवाने नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून वैयक्तिक पातळीवर तो विविध मार्गांनी सतत प्रयत्न करतो. व्याख्याने देतो, लेख लिहीत राहतो. निसर्गाचा वारसा जपण्याचं काम नव्या पिढीकडूनच होऊ शकेल हा दुर्दम्य आशावाद त्याच्याकडे अजूनही आहे.
आपल्या एका लेखात तो लिहितो, "दिल्लीमधलं आधुनिक स्थापत्यशास्त्र हिमालयातल्या नाजूक वाटा-वळणांवर आणून उभं केल्यावर आता हा परिसर टेकडीवरून पाहताना शेकडो थडगी असलेल्या कबरस्तानासारखा दिसायला लागला आहे, यात नवल काय?"हिमालयातल्या या मौल्यवान निसर्गसंपदेची लूट आणि तिचे हे नुकसान होण्याची सुरुवात जेव्हा ब्रिटिशांनी आपल्या चैन आणि सुखसोयींसाठी सिमला, मसूरी, दार्जिलिंग, डलहौसी, नैनिताल सारखी हिल स्टेशन्सची उभारणी केली, तेव्हापासूनच झाली, असं रस्किन बिनदिक्कत परखडपणे नॅशनल जिओग्राफिकवर सांगतो. 'एकेकाळी दर्यांमध्ये स्फटिकशुभ्र दंव शिंपडणारे धुके असायचे आणि आता तिथे प्रदूषणाचे मळकट ढग असतात, ही कळ चोवीस तास माझ्या ह्रदयातून जात नाही' असं तो कळवळून म्हणत राहतो.
मात्र अजूनही निसर्गाच्या विजिगीषु वृत्तीवरचा, वसंत ऋतूच्या आगमनानंतर खडकांमागून पुन्हा एकदा नव्याने डोके वर काढणार्या रानफुलांवरचा, निसर्गसाखळीच्या शाश्वत आणि चिवट सातत्यावरचा त्याचा विश्वास उणावलेला नाही. तो म्हणतो- " Despite everything, each morning I look at the birds and the warm sun shining behind the clouds, and I realize that I still have another song to sing- another tale to tell. May be tomorrow, when winds aren't cold and sun's bit warmer, I'll tell you another story.."
हिमालयातली निसर्गराजी टिकेल, बहरत राहील, माणसं सुजाण बनतील, हा आशावाद मग पुन्हा एकदा आपल्याही मनात जन्म घेतो, रस्किनचं पुस्तक हातांत घेताना.
मुंबईतल्या उकाड्याने आणि प्रदूषणाने जीव हैराण झाला, की मला रस्किनची आठवण येते. शिवालिक टेकड्यांच्या, चीड-देवदार-पाईनच्या रांगांनी झाकून गेलेल्या एका शांत गावात, आपल्या आयव्ही कॉटेजमध्ये, चेरीचं झाड दिसणार्या वळणदार रस्त्याकडे पाहत एका थंड निळ्या दुपारी रस्किन अजूनही लिहीत बसलेला आहे, गेली सहा दशके तो तिथेच बसून लिहितो आहे, वयाच्या ७५ व्या वर्षीही जंगलांत भटकणार्या तरूण रस्टीच्या हातांनी आपल्या डायरीत नोंदी करून ठेवत आहे, ही भावना मला आश्वस्त करते. उन्हाच्या तडाख्यात माझ्याही खिडकीबाहेर भरभरून फुलत राहणार्या पेल्टोफोरमकडे समाधानाने पाहत मी बुकमार्क घालून ठेवलेलं रस्किनचं वाक्य मोठ्यांदा वाचते," .. and when all the wars are done, a butterfly will still be beautiful!"
6 comments:
Khupach sundar lihilay. Ruskin Bond is simply great!
मजा आली वाचून
अतिशय सुंदर...रस्कीनसारख्या प्रतिभावंताची महत्ता काही शब्दांमध्ये उभी करणे सोपे नव्हे! मात्र तुम्ही ते करून दाखविले. भविष्यात असेच नितांतसुंदल लेख वाचायला मिळतील या अपेक्षांसहीत धन्यवाद
khup sundar lekh. ruskin bond mi vachala nahi pan ata utsukata lagun rahili ahe. kuthalya pustakapasun suruvata karu te nakki sang. maaybolivarati meenuchya vicharpusmadhe takashil ka?
wah! Ruskin Bond wachatana nehemich aat kahitari halata, sundar bhasha! Ani aapla lekhahi khoopach mahaan utarla aahe...
vachaaylach hava ruskin bond
alhadmahabal.wordpress.com
Post a Comment