झिमझिमत्या पावसात मी आणि मिथिला काल संध्याकाळी एनसिपिएला गेलो.
भन्नाट वारा.
मागे मुंबईचं क्षितिज काळसर पावसाळी ढगांमधे मावळत गेलं.रस्त्यावरची माणसांची गर्दी मागे मागे जात रस्ता शांत होत गेला.
एनसिपिएच्या टोकाला वेडावाकडा वारा आणि पावसाच्या सरी.पावसाच्या एका जोरदार झोतात आम्ही क्षणात चिंब भिजूनच गेलो. काही हरकत नाही.एकमेकींकडे समजुतदारपणे पहात आम्ही हसलो.निसर्गाचा मुक्त आविष्कार अंगावर झेलूनच त्याला भेटण्यात मजा.
फॉयरमधे टेबलावरची त्याची पुस्तकं चाळत असताना मागे किंचित लोकांची गडबड.मिथिलाने अधिरपणे खांद्यावर हात टेकवत मागे पहायला खुणावलं.
रस्किन बॉन्ड.वाटोळा,गोल गोरा चेहरा,ओठांवरचं मिश्किल हसू,चष्म्याआडचे उत्साही,लुकलुकते निळे डोळे.
रस्टी तोच होता.अजूनही तसाच.'इट्स नॉट टाईम दॅट इज पासिंग बाय..इट इज यू अँड आय..!'त्यानेच एके ठिकाणी लिहिलं होतं ते आठवलं.
ओळख पटताच मी त्याच्याजवळ गेले.माझीही ओळख दिली.हातात हात मिळवला.
त्याच्या हातांचा गार स्पर्श हिमालयाच्या शिवालीक पर्वतराजींमधून वहात येणार्या झर्यासारखा नितळशांत.
"तुमची पहिली भेट लॅन्डोरमधे व्हावी असं मनापासून वाटत होतं.पण आत्ता इथे मुंबईमधे होतेय आणि इतक्या सहज ह्याचही अप्रुप वाटतय खूप."माझा आवाज किंचित कापत होता."पण मी लॅन्डोरला येणार आहे हे नक्की.कदाचित ह्याच मार्चमधे."
त्याने कुतूहलाने माझं बोलणं ऐकून घेतलं."नक्की या.भेटायला आवडेल तिथे.सीझनही फार छान असतो त्यावेळी"तो मी पुढे केलेल्या त्याच्या'द बुक ऑफ नेचर'वर ऑटोग्राफ देत म्हणाला.
मी आनंदाने मान डोलावली.मनात हसूनही घेतलं.ऋतूंच्या चांगल्या असण्या नसण्याशी मला काय देणं घेणं?हिमालयातला प्रत्येक ऋतू रस्किनचा हात धरुनच तर पाहून झाले आहेत.
त्याने ईमेलमधे सुचवल्याप्रमाणे मी त्याच्या अनुवादित केलेल्या कथांच्या प्रती आणल्या होत्या त्या सोपवल्या.त्याने आभार मानले.काही इतर बोलणंही झालं.त्याच्या भोवती आता हळूहळू इतर चाहत्यांची,क्रॉसवर्ड बुक अॅवार्डच्या शॉर्टलिस्टेड लेखकांची,मेंबर्सची गर्दी वाढायला लागली.माणसांनी त्याला घेरून टाकलं.मी काढता पाय घेतला.मला तसाही आता आतल्या ऑडिटोरियममधे होणार्या कार्यक्रमामधे काही इंटरेस्ट राहिलेला नव्हता.रस्किन बॉन्डला भेटण्यासाठीच फक्त मी आले होते.
जिना उतरुन खाली आल्यावर आम्ही परत मागे वळून वर पाहिलं.
माणसांच्या जंगलात रस्टी बावरुन गेला होता.
No comments:
Post a Comment