Monday, October 29, 2012

तीन पुजारणी



चित्रांना अर्थ असतो, भाषा असते, सौंदर्य असतं तसा त्यांचा स्वत:चा असा एक मूडही असतो. चित्रांमधले रंग, रेषांची लय, आकारांची रचना यामधून तयार होणारा विशिष्ट ऍम्बियन्स असतो. चित्र खेळकर असतात, उदास असतात, गंभीर, अध्यात्मिक असतात आणि उत्सवीही असतात.

आता पिकलेल्या भातांचा, तीळाच्या नाजूक फ़ुलांचा, झेंडूच्या टपो-या गेंदांचा आणि अश्विनातल्या लखलखत्या उन्हाचा मिळून तयार झालेला सोनेरी, पिवळा गंध हवेत दरवळायला लागला आहे, नवरात्र उंबरठ्यापाशी येऊन पोचले आहे आणि अशावेळी मला आठवताहेत जामिनी रॉय यांची चित्रे. त्यांच्या कालीघाटावरच्या, भांगेत लाल सिंदूर भरलेल्या, हातात पूजारती, झेंडूचे सर घेतलेल्या तीन पुजारणी नजरेसमोर दिसायला लागल्या आहेत. जामिनीदांच्या चित्रांमधे हा खास भारतीय, उत्सवी, सणांचा आनंदी मूड, सांस्कृतिक, शुभ ऍम्बियन्स निर्माण करण्याचा, तेही कमीतकमी रेषाकारांमधून, विलक्षण गुण आहे. कदाचित म्हणूनच त्यांची पारंपारिक, भारतीय शैलीतील चित्रे अत्याधुनिक इंटेरियर असलेल्या घरांमधे, पाश्चात्य शैलीतल्या वातावरणामधेही कधी उपरी वाटत नाहीत. देशात, परदेशात सामान्यांपासून, श्रीमंतापर्यंत जास्तीतजास्त घरांमधे लावल्या गेलेल्या चित्रांच्या फ़्रेम्स एकेकाळी राजा रविवर्माच्या असत आणि त्यानंतर तो मान मिळाला जामिनी रॉय यांच्या चित्रांना.

जर्द पिवळा, दाट निळा, गडद तपकिरी, खोल हिरवा असे भारतीय मातीतून जन्मलेले, नैसर्गिक रंग, ठाशीव, लयदार, ठळक आणि तरीही विलक्षण नाजूक वाटणा-या सघन, गोलाकार रेषांमधले आकार, विशाल नेत्रांच्या स्त्रिया, मुले, कमीतकमी कलाकुसरीत खास भारतीय शैलीतले मोटिफ़्स पेहरुन डौलात उभ्या असतात, त्यांच्या चित्रांकडे एकवार नुसते पाहूनही आपण थेट पोचतो कालिघाटावरील मा दूर्गेच्या मंदिराबाहेरील बाजारात भरलेल्या बिजोयाजात्रेच्या अपूर्व सोहळ्यामधे.

जामिनीदांची चित्रकला म्हणजे भारतीय आधुनिक कला आणि पारंपारिक लोककला यांचा अनोखा मेळ. जामिनीदांची चित्रभाषा एकाचवेळी भारतीय असते आणि आधुनिकही असते. तिच्यात लोकपरंपरेची चिन्ह, कलाकुसरीचे मोटिफ़्स असतात आणि वेस्टर्न मिनिमलिस्टीक आकार, त्रिमिती लयही असते. झळझळीत रंग असले तरी ती भडक नसतात, कलाकुसर असली तरी डेकोरेटीव्ह नसतात, नैसर्गिकता असते आणि अलंकरणही. रेषा ठळक, बोल्ड असूनही आकार नाजूक, तरल असतात, लोककलेतील कथनात्मकता असते पण त्यात नाट्यमयता, भावनिकतेचं अवडंबर नसतं.
हे आणि असे अनेक समतोल साधलेली चित्रभाषा जामिनी रॉय यांनी आत्मसात केली होती ती विलक्षण कठोर परिश्रमांमधून, बारीक निरिक्षणामधून. प्रसंगी नंदलाल बोस यांच्यासारख्या चित्रकाराची परखड समीक्षणात्मक टीका सहन करुन, आपल्या वेस्टर्न ऍकेडेमिझमच्या शिक्षणाला विसरुन, जवळपास अस्तंगत झालेल्या लोककलेला स्वीकारुन मग जामिनी रॉय यांची चित्रभाषा अशा वरवर सोप्या, साध्या वाटणा-या पण तांत्रिक अचूकता, रंगांचा सुयोग्य मेळ, रेषांवर हुकूमत गाजवणा-या समतोलाला पोचली होती. अत्यंत डौलदार आणि विलक्षण साधेपणा हा जामिनी रॉय यांच्या चित्रांचा युनिक ट्रेडमार्क झाला तो यातून तावून सुलाखून मगच.

"आत्मिक शांततेचा आग्रह कलाकाराने कधीच धरता कामा नये. कसं शक्य आहे ती मिळणं? मनाला अधिकाधिक मिळवण्याची आस, सर्जकतेची आग, आणि व्यक्त होण्यातली अस्वस्थता अंतरंगात असताना आत्मिक शांततेचा आग्रह?" जामिनीदा म्हणत असत.

जामिनीदांना कालिघाट चित्रशैलीमधून आपली चित्रभाषा गवसण्याआधीच्या काळात ते परदेशी, भारतीय लोकांची पोर्ट्रेट्स करत असत. इम्प्रेशनिस्ट स्टाइल लॅन्डस्केपही सुंदर असत त्यांची. अबनिन्द्रनाथांचा प्रभाव असतानाच्या काळातही त्यांनी वेस्टर्न ऍकेडेमिझम शिकून घेतले. त्यातल्या तंत्रावर हुकूमत मिळवली. आठ वर्षे गव्हर्न्मेन्ट स्कूल ऑफ़ आर्ट ऍन्ड क्राफ़्टमधे काढली. ऑइल पेंटींगमधे मास्टरी असलेले चित्रकार होते ते. खूप नाव, पैसा मिळत होता, पण स्वत:ची अशी खास ओळख गवसत नव्हती.

जामिनीदांच्या वेस्टर्न शैलीतल्या कामात तंत्रकुशलता होती, पण वेगळेपणाचा काहीच ठसा नव्हता. त्यांनी स्वत:ला शोधण्याचा, स्वत:ची चित्रभाषा शोधण्याचा प्रवास सुरु केला आणि ते मुक्कामाला आले पुन्हा आपल्या मुळांपाशी.
बांकुरा या आपल्या जन्मगावी, गावातल्या कुंभारांकडून शिकलेली मातीची चित्रे बनवण्याची कला, कालीमातेच्या मंदिराबाहेर बसलेल्या पटुवा कलाकारांची कालिघाट शैलीला नवा घाट देत त्यात काही नवी, आधुनिक मुळाक्षरे घालून त्यांनी नवी चित्रभाषा विकसित करायला प्रारंभ केला. गोलाकार रेषा, सघन वळणे त्यांच्या बोटांत होती. सुरुवातीला काहीशा अस्थिरतेनं, बिचकत सुरु झालेला हा प्रवास मग त्यांनी बेधडकपणे स्वत:चा म्हणून स्वीकारला. कॅनव्हासही टाकून दिला. मातीपासून, नैसर्गिक फ़ळाफ़ुलांचे, मातीचे रंग वापरुन, कापडावर, लाकडावर किंवा चटईवर लिंबाच्या रसाचा थर देऊन त्यांनी कालिघाट चित्रशैलीमधे रंगवायला सुरुवात केली.

त्याच सुमारास प्रबासी या बंगाली साहित्यिक मासिकामधे १९०८ साली रविन्द्रनाथांनी लिहिलेला एक लेख जामिनींच्या वाचनात आला. त्यातल्या राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेने ते पूर्णपणे भारुन गेले. अबनिन्द्रनाथांचा कलेत भारतीयता असायलाच हवी हा विचार हळूहळू त्यांच्यात झिरपत गेला.

मग पाश्चात्य शैलीतून संपूर्ण भारतीयत्वाचा स्वीकार त्यांनी केला. वेस्टर्न स्टाइलमधले आपले सारे टॅलन्ट पणाला लावून त्यांनी पटुवा शैली त्याची सारी पारंपारिक वैशिष्ट्ये जपत नव्याने विकसित केली.

बंगाली पारंपारिक चित्रशैली- कालिघाट, पटुवा, टेराकोटा विष्णूपूरा मंदिरांमधून त्यांना भारतीयता गवसली. मग हळूहळू पारंपारिक चित्रशैली जास्त फ़ॉर्मल, स्टाइलचा योग्य वापर, साधेपणा, कमीतकमी रेषाकार, भावनिक नाट्यमयता. डेकोरेटीवपणा कमी कमी होत गेला. आधीच्या चित्रांमधे रंग, मोटिफ़्सचा मुक्त वापर होता तोही कमी झाला. चित्रभाषा मिनिमलिस्टीक होत गेली. माटिझच्या चित्रांप्रमाणे.
बंगाली लोकचित्रकलेतून विकसित झालेली त्यांची चित्रभाषा, कलोनियल काळातील चित्रकलेला बेधडक, आगळ्या रेषांनी जाऊन धडकली.
एखादा गुंतागुंतीचा भावनिक, नाट्यमय क्षण निवडून त्याला कालिघाटच्या साध्या रचनेत, पटुवांच्या कथनात्मकतेत बसवून त्यात वेस्टर्न स्टाइलने खोली, घनता आणण्याचे त्यांचे कसब वैशिष्ट्यपूर्ण. खास जामिनी रॉय स्टाइल. त्यांच्या चित्रांच्या आकारात कोंडलेपणा नाही, उत्स्फ़ुर्तपणे, मुक्त होऊन ते आपल्यापर्यंत पोचते.
आदिम आकारांमधले सौंदर्य टिपण्याची त्यांची नजर, ब्रश स्ट्रोक्समधली, हातांच्या वळणांतली तांत्रिक अचूकता ही त्यांची स्ट्रेन्ग्थ. रेषांमधला डौल, नाजूक तरीही ठळक. एकाचवेळी हे दोन्ही कसं साध्य होतं याचं आश्चर्य वाटतं.
वेस्टर्न ऍकेडेमिझमला एकेकाळी आव्हान देणारी नव-बंगाली चित्रशैली थंड, निर्जीव, काही नवं मिळवून द्यायला असमर्थ बनली होती. अशावेळी चिरतरुण, कधीही जुनी वाटणारी, तरीही पारंपारिकता जपणारी, मुळांकडे घेऊन जाणारी जामिनीदांची चित्रभाषा वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

पाच हजार वर्षांचा कलावारसा वेस्टर्न आर्टच्या काही वर्षांच्या प्रभावाखाली दबून गाडला जाण्याची धास्ती ज्यांच्यामुळे नाहिशी झाली त्या भारतीय राष्ट्रवादी परंपरेतल्या रविन्द्रनाथ, अबनिन्द्रनाथ, नंदलाल बोस, अमृता शेर-गिल यांच्या रांगेतले सन्माननीय चित्रकार जामिनी रॉय. त्यांच्या चित्रांनी पारंपारिकता जपूनही आपल्याला आधुनिकतेच्या प्रवाहात सामिल होता येतं हा आत्मविश्वास भारतीय चित्रकारांना मिळाला.

नॉस्टेल्जिक लिरिसिझम, आकाररचनांचा सुंदर मेळ, नैसर्गिक रंगांमधला आकर्षक झळाळ, तालबद्ध बाह्यरेषा, संथाळी लोभस रांगडेपण म्हणजे ही त्यांची चित्रभाषा. उत्सवी आणि चिरतरुण.



No comments: