सामान्य माणसं जेव्हा चित्रांमधून येतात तेव्हा त्यांना इतर कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण ओळख नसते. त्यांचं सामान्य असणं, त्यांचं नीरस, रुटीन आयुष्य हेच त्यांचं वैशिष्ट्य असतं. चित्रकारांच्या दृष्टीने. म्हणूनच ती जेव्हा चित्रांमधून येतात तेव्हा समुहाने येतात.
सामान्यांचं जीवन, त्यांचे प्रश्न, गरीबीची भूक, कष्ट फ़ार कमी वेळा चित्रांमधे उतरली, जेव्हा उतरली, तेव्हा त्यांचं फारसं स्वागत झालं नाही, सामान्यांकडूनही नाही.
साहजिक आहे, कष्टमय, नीरस जीवन रोज जगणा-यांना आपल्या या जगण्याचं चित्रणं बघण्यापेक्षा आभासी, जे आपल्याजवळ नाही, जे हवसं वाटतय ते बघण्यात जास्त रुची.
चित्रकला सुरुवातीपासूनच देवालयांमधे रुजली, राजाश्रयाने फोफावली. त्यामुळे धार्मिक, ऐतिहासिक चित्रविषय, राजबिंडी व्यक्तिचित्रणं, रमणीय निसर्गचित्रं जास्त लोकप्रिय झाली.
चित्रचौकटीतलं ते अद्भूत विश्व, त्या कहाण्या सामान्यांच्या नव्हत्या, चित्रांमधल्या नायक नायिकांच्या भावभावना कितीही खर्यासारख्या भासल्या तरी त्यातून सामान्य माणसाच्या वेदना उमटत नव्हत्या. सामाजिक बांधिलकी मानणारे कलाकार मुळात हाताच्या बोटावर मोजण्याइतके, चित्रकार तर आणखीनच कमी. तरीही काही मोजक्या चित्रकारांनी सामान्य माणसाला आपल्या कॅनव्हासवर स्थान दिलं आणि तेही केवळ त्यांची गरिबी, सामान्य, हलाखीतलं जगणं 'कलात्मकरित्या' देखणं दिसतं म्हणून नाही, तर खरोखर या चित्रकारांना सामान्य माणसाचं जगणं रंगविण्यात रस होता.
वेलाकुझचं १७व्या शतकातलं कष्टकर्यांना जेवण करुन वाढणार्या स्त्रीचं चित्र किंवा व्हॅन गॉघचं दरिद्री खाणकामगारांचं, बटाटे खाऊन भूक भागवू पहाणार कुटुंब, त्या काळापेक्षा नंतरच लोकांनी नावाजलं, आणि तेव्हाही चर्चा त्या माणसांपेक्षा चित्रकाराच्या गुणवत्तेबाबतच झाली.
९व्या शतकात गुस्ताव कोर्बेने भव्य आकाराच्या कॅनव्हासवर सामान्य लोकांचं आयुष्य रंगवलं तेव्हाही त्याला या ’बिनमहत्वाच्या, सामान्य’ विषयाकरता एव्हढी मोठी जागा आणि आपली कला फ़ुकट घालवल्याबद्दलची टीका सहन करायला लागली.
अमेरिकेत ’ग्रेट डिप्रेशन’च्या काळात सोशल रिऍलिझम या आर्ट मूव्हमेन्टने जोर धरला. भारतामधे मात्र सामाजिक सत्यता चित्रांमधून यायला त्यानंतर निदान दोन दशकं वाट बघायला लागली. भारतीय चित्रकलेवर रविवर्माचा, आर्टस्कूल्समधल्या ऍकेडेमिक शैलीचा प्रभाव तीव्र होता, प्रोग्रेसिव्ह आर्टची चळवळ अधिक काळ रुजली असती तर कदाचित हा पाया त्यांच्याकडून भक्कमपणाने घातला गेलाही असता.
५०च्या उत्तरार्धात सामाजिक मूल्यांमधे मुलभूत बदल होऊ लागले. औद्योगिकीकरण, राजकीय अस्थिरतेच्या काळात हे बदल अधोरेखीत करणारी, नव्या पिढी समोरील प्रश्नांना उच्चारणारी समकालीन चित्रभाषा आधुनिक भारतीय चित्रकलेच्या मुख्य प्रवाहात रुळवण्याचे महत्वाचे काम केले सुधीर पटवर्धन, गीव्ह पटेल, नलिनी मलानी, विवान सुंदरम यांनी. सामाजिक समस्यांना त्यांनी वैयक्तिक आपलेपणातून न्याहाळले. त्यांच्या चित्रांमधून शहर दिसलं. शहरी ताणतणाव, कुटुंब-समाजाची घुसमट दिसली. भाऊ पाध्ये, किरण नगरकर, अरुण कोलटकर, नारायण सूर्वे, नामदेव ढसाळ अशा समकालिनांच्या साहित्यातून जशी खरी मुंबई दिसली तशी ती यांच्या चित्रांमधूनही दिसली.
सामान्य माणसाला सातत्याने आपल्या कॅनव्हासवर स्थान देणार्या चित्रकार सुधीर पटवर्धनांची कामगिरी या सर्वामधे मुलभूत आणि महत्वाची. त्यांची शैली थेट. चित्रभाषा सहज, सोपी पण अंतर्मुख करणारी. त्यांच्या चित्रातल्या माणसांच्या कहाण्या खर्या, आजच्या.
ही माणसं दीर्घकाळ लक्षात रहातात, त्यांच्या जगण्याबद्दल विचार करायला भाग पाडतात. कधी ती माणसं रस्त्यावरच्या अपघाताला अलिप्तपणे न्याहाळणारी, कधी उसळलेल्या दंगलीत स्वतःचा जीव बचावू पहाणारी, कधी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी कष्ट करणारी, कधी लोकलच्या प्रवासातली. समाजातली माणसे आणि समाजाचाच एक भाग असलेल्या कुटुंबातलीही.
सुधीर पटवर्धनांचं मला सर्वात अस्वस्थ करुन टाकणारं चित्र ‘फुल सर्कल’.
मध्यमवर्गीय कुटुंब रहात असलेल्या घरातली एक खोली. समोर खुर्चीवर हातात मोबाईल घेऊन बसलेली एक व्यक्ती, बाजूला एक स्त्री वाकून केर काढते आहे. बिछान्यावर वृद्ध आजारी गृहस्थ. पलीकडे एक तरुण. पाठमोरी तरुण स्त्री. एक लहान मुलगा खेळण्यातल्या गाड्यांशी खेळतो आहे.
हे सारेजण एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत हे निश्चित. बिछान्यावरची आजारी व्यक्ती एकेकाळची घरातली कर्ती असावी, भोवताली त्यांचा भाऊ, मुलगा, सून, नातवंड. आजारपणाचं सावट घरातल्या प्रत्येकाच्या दैनंदिन व्यवहारावर अपरिहार्यतेनं पडलेलं स्पष्टपणाने दिसतं. खुर्चीतल्या गृहस्थांच्या चेहर्यावर थकवा, डोळे मिटलेले. डुलकी किंवा विचारांमुळे. हातातल्या मोबाईलवर आजारी व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल नुकतीच काही चर्चा झाली असावी. कुणाच्या तरी चौकशीला उत्तर दिलं गेलं असेल.. अजून काहीच फरक नाही, जैसे थे. एक ओशाळवाणेपणा चेहर्यावरच्या थकव्यात मिसळलेला. मागचा तरुण निश्चित असा कुठे पाहत नाही. त्याचे खांदे झुकलेले, चेहरा ओढलेला आहे. तोही कसल्या तरी विचारात मग्न. पाठमोर्या स्त्रीच्या देहबोलीतून त्रयस्थता, अलिप्तता व्यक्त झाली आहे. तिच्या पाठीतून कठोरपणाचा भाव जाणवतो.
ही सहा माणसं एका खोलीत असली तरी सुटी सुटी आहेत. कुणीही एकमेकांशी, किंवा काहीच बोलत नाहीयेत. प्रत्येकजण स्वतःतच मग्न. कसलं तरी दडपण त्यांच्यावर आहे. सर्वच व्यक्तींचे चेहरे झाकोळलेले आहेत. लांब मुदतीच्या आजारपणाचं, येऊ घातलेल्या मरणाचं सावट सर्वांच्या चेह-यावर पडलेलं दिसतं.
त्या सगळ्यांना एकत्र बांधणारी व्यक्ती डोळे मिटून बिछान्यावर पडलेली आहे. लहान मुलगाही आपलं जग निर्माण करून त्यात मग्न आहे. थोडीफ़ार हालचाल करतात ती केर भरणारी स्त्री आणि हा लहान मुलगा. बाकी काळ साचून राहिलेल्या शेवाळासारखा स्तब्ध. एकेकाळी घरात वाहता असलेला जीवनप्रवाह आता थांबल्यासारखा झाला आहे. काळाच्या एका अनाकलनीय लूपमधे अडकल्यासारखी ही माणसं अनंत काळ अशीच बसून असल्यासारखी.
ही खोली जगण्याच्या चैतन्यानं नव्हे तर मरणाच्या औदासीन्यानं भारलेली आहे.
हे लोक काय विचार करत असतील? लहान घरात, जागेची अडचण असताना खोलीतला मुख्य पलंग वृद्ध, बिनकामाच्या व्यक्तीकडून असा दीर्घकाळाकरता अडवला गेल्यावर घरातल्यांच्या, मग ते जवळचे नातेवाईक का असेना, मनात जे काही कटू विचार उमटून जातील ते सारे या चित्रात स्पष्ट वाचता येतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती घरातलं आजारपणाचं वातावरण कधी एकदाचं संपेल याची वाट पाहते आहे. प्रतीक्षेमुळे सहनशक्तीचा अंत होतो, मुखवटे गळून पडतात . मृत्यू किंवा आजार बरा होऊन, कसंही. पण वातावरण पूर्वपदावर यावं अशी प्रत्येकाच्या मनात तरळती इच्छा. दुस-याच्या जगण्या-मरण्याच्या विचारानं या चित्रातली स्थिती भारलेली आहे. जवळच्या व्यक्तीच्या मरणाची इच्छा परिस्थितीला शरण जाऊन का होईना, मनाच्या खोल तळातून पृष्ठभागावर येते त्या वेळी काय स्थिती होत असेल?
हे चित्र पाहत असताना आपण अस्वस्थ होतो. कारण हे चित्र आपल्याच मनाचा तळ ढवळत असतं.
कलेने अंतर्मुखही करायला हवे. कलेचे ते कर्तव्य आहे.
=====================
No comments:
Post a Comment