Monday, March 05, 2012

ओफेलिया

"It is not the language of painters but the language of nature which one should listen to.... The feeling for the things themselves, for reality, is more important than the feeling for pictures."- Vincenr Van Gogh



जॉन एव्हरेट मिलेस या ब्रिटिश चित्रकाराने १८५१-५२ साली काढलेलं हे पेंटींग ’ओफेलिया’. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला ना या चित्रकाराची काही माहिती होती, ना ’ओफेलिया’ नावाच्या पार्श्वभूमीची. इंग्रजी क्लासिकल साहित्याशी फारसा संबंध नव्हता.
मात्र ओफेलियाचं पेंटींग पहाताना मनाला एक विलक्षण अस्वस्थता आली होती. रंगांचं एक अद्भूत, देखणं रसायन चित्रात होतं, त्याशिवाय अजूनही काही होतं.
पाण्याकाठच्या गर्द झाडो-याचा एक हिरवा घुमटाकार आणि त्यात साचलेला निस्तब्ध, निश्चल कोंडलेपणा. दाट, हिरव्या झाडा-फ़ुलांचं त्यातलं अस्त्तित्व एरवीसारखं मनाला सुखद, प्रसन्न अनुभव देत नव्हतं, कारण खालच्या शेवाळलेल्या हिरव्या पाण्यात ‘ती’ होती. अर्धवट बुडालेली, तरंगती ओफेलिया. दोन्ही बाजूला पसरलेले तिचे हात, अर्धमिटली वर पहाणारी दृष्टी, उघडे ओठ, आणि चेह-यावरचे गोठून राहीलेले तणावग्रस्त भाव, पायातळी पाण्याने भरुन वर उचलल्या गेलेल्या पोशाखाची स्थिरावलेली वर्तुळं.. आणि सर्वात थरारुन टाकत होती तिच्या स्तब्ध शरिराला लगटून तरंगणारी फ़ुलं, काठावरुन तिच्या दिशेने खाली झेपावणारी फ़ुलं.. ओफेलिया आता जिवंत नाही हे कोणी सांगण्याची गरजच नव्हती.
काही वर्षांपूर्वी कुवेशीच्या जंगलातला एक ट्रेक केला होता. दांडेलीचं अभयारण्य पार करुन कॅसलरॉककडे जाताना एक घनगर्द डोह अचानक समोर आला. नदीचं पाणी काठावरच्या दाट, हिरव्या झाडो-याच्या गचपणातून वाहता, वाहता मधेच एका ठिकाणी खोल थबकून राहीलं होतं. काठावर वेलींची आणि झाडांच्या मुळांची इतकी दाट गुंतागुंत की नजर चुकली तर पाय अडकून थेट त्या डोहातच पडायला होईल. वर्षारण्यातला एरवी असणारा उष्ण, दमटपणा तिथे होताच आजूबाजूला आणि डोहात मात्र काळसर, थंड हिरवा गारवा. आतल्या खोल पाण्याकडे वरुन क्षणभरच वाकून बघताना मनावर एक अस्वस्थ दडपण आलं होतं, किती सोपं आहे इथे खोल बुडून जाणं. न जाणो, काय तरंगताना दिसेल त्या पाण्यावर...
’ओफेलिया’च्या त्या पेंटींगमधे मला ते सगळं दिसलं जे त्या डोहात दिसू नये असं वाटलं होतं.
मृत्यूच्या थंड निश्चलतेचं जे अस्त्तित्व ओफेलियाच्या पेंटींगमधल्या देखण्या, बंदिस्त अवकाशात काजळी धरुन होते, ते आता शांत नव्हते. काहीतरी अस्वस्थ, खळबळलेपण त्या शेवाळलेल्या पाण्यातून, तरंगत्या फ़ुलांतून, दाट हिरव्या झाडांतून उसळी मारुन वर येत होते. अजून तरंगत असणारी, आता काही क्षणांतच पाण्यात बुडून नाहिशी होऊ पहाणारी ओफेलिया तिची गोष्ट सांगू पहात होती.
शेक्सपियरच्या हॅम्लेट या सुप्रसिद्ध नाटकातली ही ’ओफेलिया’. वडिल, भाऊ, प्रियकर या तिच्या आयुष्यातल्या तिन्ही पुरुषांकडून धिक्कारली गेलेली, प्रतारणा, नाकारलेपण, फ़सवणूक पदरात पडलेली, वडिलांच्या हातून झालेला हॅमेल्टचा, स्वत:च्या प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सैरभैर झालेली, रोमॅन्टिक वेदनेचे प्रतिक ओफेलिया. आपल्या भ्रमिष्टपणात नदीच्या काठावर फुले गोळा करत, गाणं गुणगुणत असताना झाडाची फांदी तुटते आणि ती पाण्यात पडते. पाण्यात पडल्यावरही ती जीव वाचवायचा कोणताही प्रयत्न करत नाही, कदाचित तिची तशी इच्छाही नसावी, किंवा धोक्याची पुरेशी जाणीवच तिच्या सैरभैर मनाला नसावी. ती गाण गात रहाते. तिच्या घोळदार झग्यात हवा भरते त्यामुळे सुरुवातीला थोडा वेळ ती पृष्ठभागावर तरंगते पण मग पाण्याने कपडे भिजतात, जड होतात आणि तिला पाण्याच्या आत खेचून नेतात. शेवाळलेल्या पाण्यात ती शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन होते.
ओफेलियाचा मृत्यू साहित्य जगतातला सर्वात काव्यात्म, सुंदर मृत्यू समजला जातो. हॅम्लेट नाटकाच्या प्रयोगात तो प्रत्यक्ष घडताना दाखवलेला नाही. क्वीन गरट्रूड नंतर एका गाण्यातून ओफेलियाच्या मृत्यूचे वर्णन करते. साहजिकच कल्पनाशक्तीला पुरेपूर वाव. त्यामुळेच त्या काळातल्या व्हिक्टोरियन पेंटर्सपासून आजतागायत अनेकांनी ओफेलियाचा मृत्यू कॅनव्हासवर चितारला.
जेमतेम २२/२३ वर्षांचं वय असलेल्या तरुण मिलेसलाही कोवळ्या, उमलत्या वयातल्या ओफेलियाचं जीवनाकडून नाकारलं जाणं आणि त्यातून तिने शांतपणे, गाणं गात, निसर्गरम्य नदीच्या पात्रात मृत्यूच्या स्वाधीन स्वत:ला करणं चटका लावून गेलं. ओफेलियाला कॅनव्हासवर उतरवण्याचा त्याने ध्यास घेतला. मिलेस हा प्रतिभावान, तांत्रिकदृष्ट्या हुषार चित्रकार. ’प्रीराफ़ेलाईट ब्रदरहूड’ या ग्रूपची स्थापना केलेल्या तिघा सदस्यांपैकी तो एक (उरलेले दोघे- डांटे गॅब्रिएल रोझेटी आणि विल्यम हॉलमन हंट).
१८५१ च्या उन्हाळ्यात मिलेसने या पेंटींगवर काम करायला सुरुवात केली. यातले लॅन्डस्केप त्याने आधी रंगवायला घेतले. योग्य लोकेशन मिळवण्याकरता तो भरपूर हिंडला. सरे परगण्यात किंगस्टन अपॉन थेम्स जवळच्या एवेल नदीकाठी त्याला हवी तशी दाट वनस्पतींनी वेढलेली जागा सापडली. डोक्यावर जेमतेम सावली देणारी छत्री उभारुन मिलेसने तासनतास एका जागी उभे राहून नदीकाठची झाडे, फ़ुले बारकाईने, कौशल्याने रंगवली. कित्येकदा सलग अकरा तास तो उभा असे. उन्हाळ्याचे दिवस. डोक्यावर रणरणतं उन आणि नदीकाठचा सोसाट्याचा वारा. मिलेस त्याच्या मित्राला लिहिलेल्या एका पत्रात लिहितो की, "इतका भणाणता वारा. मी कॅनव्हाससकट उडून पाण्यात जाऊन पडीन आणि मला ओफेलियाच्या वेदनांशी समरस होण्याचा अनुभव घेता येईल." अर्थातच तसं झालं नाही. मिलेस पाच महिने पेंटींग करत राहीला. एवेलच्या नदीकिना-यावरच्या रानफ़ुलांपैकी काही वैशिष्ट्यपूर्ण फ़ुलेच त्याने निवडली ज्याला काही सांकेतिक अर्थ आहेत. ओफेलियाच्या उजव्या हाताजवळून वहाणारी डेझी- तिच्या निष्पापपणाचं प्रतिक, लाल गुलाब- तारुण्य, प्रेम आणि सौंदर्याचं प्रतिक, गळ्याजवळचे व्हायोलेट्स- गुंतणं, अडकणं, गुदमरुन मृत्यूचं सूचन करणारे, तिच्यावर झुकलेले विपिंग विलोज- हरवलेल्या प्रेमाचं प्रतिक, नेटल्सची फ़ुले- वेदनांचं प्रतिक, क्रो-फ़्लॉवर्स- कृतघ्नतेचं प्रतिक, लाल गर्द, मधे काळ्या बिय असलेली पॉपीची फ़ुले- काळझोपेचे प्रतिक. इत्यादी. निसर्गाचे इतके प्रतिकात्मक आणि अचून चित्रण मिलेसने केले ते केवळ अद्वितिय.
त्यानंतरच्या हिवाळ्यात लंडनमधे मिलेसने प्रत्यक्ष ’ओफेलिया’ रंगवली. एलिझाबेथ सिडाल नावाची १९ वर्षांची मॉडेल त्याला मिळाली. ओफेलियाला शोभून दिसेल असा ऍंन्टिक गाऊन त्याने चार पौंडांना आणला आणि मग आपल्या लहानशा जागेतला बाथ पाण्याने भरुन त्याने एलिझाबेथला त्यात झोपवले. लंडनचा कडाक्याचा हिवाळा. एलिझाबेथला पाण्याचा थंडपणा झेपेना. तेव्हा त्या बाथखाली त्याने मेणबत्या, काही तेलाचे दिवे लावले. आणि मग मिलेस त्याच्या सवयीप्रमाणे चित्र रंगवण्यात गढून गेला. ते मिणमिणते दिवे केव्हाच विझून गेले. हे मग रोजचंच झालं. एलिझाबेथ तशीच गारठलेल्या अवस्थेत तासनतास झोपून रहायची. मिलेसला चित्र पूर्ण करायला चार महिने लागले. चित्र पूर्ण झालं खरं पण एलिझाबेथ न्यूमोनियाने आजारी पडली. त्यात तिचा मृत्यू झाल्याची अफवा नंतरच्या काळात पसरली पण त्यात तथ्य नव्हते. एलिझाबेथने मिलेसचा सहकारी रोझेटीसोबत लग्न केले. एलिझाबेथच्या वडिलांनी तिच्या उपचारार्थ पन्नास पौंडाची रक्कम मात्र मिलेसकडून वसूल केली.
मिलेसचं सर्वात प्रसिद्ध आणि कौतुकास पात्र ठरलेलं हे चित्र. ओफेलियाचा निष्पापणा, भ्रमिष्टता, बुडून मरण्यातली भीषणता, आणि आजूबाजूच्या निसर्गातला देखणेपणा हे त्याने इतक्या अचूकतेनं दाखवलं की आजही ते त्याबाबतीत एकमेवद्वितीय ठरतं.
१८५२ साली रॉयल ऍकेडेमीच्या प्रदर्शनात पहिल्यांदा हे चित्र प्रदर्शित झालं तेव्हा प्रेक्षकांनी सुरुवातीला काही प्रतिक्रिया व्यक्त करायचंच नाकारलं. साहजिकच आहे. मृत्यूचा हा देखणा, भीषण आणि निश्चल आविष्कार त्यांनी इतक्या जिवंतपणाने आधी कधीच पाहिलेला नव्हता. तो स्वीकारणे त्यांच्या दृष्टीने फार कठीण होते. मात्र आर्ट जर्नल्समधून समीक्षकांनी मिलेसने घेतलेल्या कष्टांची आवर्जून दखल घेतली.
चित्रं तुमच्याशी बोलतात आणि तुम्हाला उलट स्वत:शी बोलायला लावतात.
’ओफेलिया’ हे त्यापैकी महत्वाचे चित्र.
आपल्यासमोर चित्र असतं. चित्राचा प्रकाश, रंग, पोत सगळं सुंदर..पण चित्र पाहून झाल्यावर मनात रेंगाळत रहात ते यापैकी काही नसतं. मनावर चित्राचा जो ठसा उमटलेला असतो, त्याला या तांत्रिक बाबींशी काहीच देणंघेणं नसतं. झाडांची पानं, फ़ुले किती सुंदर, हुबेहूब रंगवली आहेत याच्याशीही नसतं. ओफेलियामधे हे सगळं आहे आणि याव्यतिरिक्तही अजून एक स्ट्रॉन्ग एलेमेन्ट आहे. जो आपल्याला अस्वस्थ करतो. चित्र त्याकरताच आपल्याशी संवाद साधायला धडपडत रहातं. बुडणा-या तरुणीची गोष्ट सांगू पहातं, ती गोष्ट काय असेल ते आजूबाजूच्या निसर्गातून सुचवू पहातं.
चित्रभाषा ऐकायची, समजून घ्यायची म्हणजे नेमकं करायचं तरी काय याचा नेमका धडा मिलेसच्या ’ओफेलिया’तून मिळतो.
चित्र जे सांगू पहातय ते नीट ऐकायचं.
कळलं नाही तर प्रश्न विचारायचे. स्वत:ला आणि चित्रालाही.
मित्र बोलत नसला तर काय करतो आपण?
कविता समजली नाही तर काय करतो?
तेच करायचं.
पुन्हा पुन्हा वाचायची. मुक्कामापर्यंत पोहोचवणा-या सगळ्या वाटा, शक्यता धुंडाळायच्या.
चित्रकाराकडे त्याला जे सांगायचे आहे त्याकरता रंग-रेषा-आकार असतात. चित्र ही त्याची संहिता. त्याला काही संदर्भ असतात. त्यातला बंध जाणून घ्यायचा.
ओफेलियाचं चित्रं पहिल्यांदा पाहीलं तेव्हाची माझी पहिली प्रतिक्रिया मला आजही जशीच्या तशी आठवते. तेव्हा मला चित्रकाराबद्दल, ’ओफेलिया’ नावाबद्दल काहीही ठाऊक नव्हते. आज जेव्हा बुडणा-या ओफेलियाला पुन्हा पाहीलं तेव्हा तिची गोष्ट मला माहीत होती. चित्रकाराबद्दलही माहीत होतं. तरीही माझी प्रतिक्रिया पहिल्यांदा चित्र पहाताना होती तशीच झाली. चित्राच्या देखणेपणापेक्षाही त्यातल्या अस्वस्थतेनं भारुन टाकणारी.
==============================================================
शर्मिला फडके
ओफेलियाची असंख्य पेंटींग्ज आजतागायत रंगवली जात आहेत. मिलेसचं हे पेंटींग आता लंडनच्या टेट गॅलरीत आहे आणि त्याची अंदाजे किंमत ३० मिलियन डॉलर्स आहे.

चित्रभाषा

१७/१८च्या वयात एकदा कुणाबरोबर तरी जे जे स्कूल ऑफ़ आर्टमधे गेले होते. तोपर्यंत माझा आणि चित्रकलेचा संबंध फक्त शाळेत इंटमिजियेट परिक्षेला बसण्यापुरताच. पण त्या दिवशी जेजेच्या आवारातली दाट, गर्द झाडी, जागोजागी लयबद्ध शिल्पं, उंच खिडक्यांच्या कमानी, नक्षीदार खांब आणि त्यांच्या तितक्याच नक्षीदार सावल्या मिरवणारे लांबलचक पॅसेज,आतमधे भव्य सिलिंगमधून सांडणारा प्रकाश, पेंटींग्जनी सजलेल्या, अनोखी फ़रशी असलेल्या त्या कलात्मक, दगडी इमारतीत एक खोलवर कलेचा श्वास हृदयातून पोटापर्यंत खेचून घेतला गेला आणि मग तो सावकाशपणे रक्तात भिनला तो कायमचाच. चित्रकलेच्या दुनियेच्या मोहमयी आकर्षणाची रुजवात जे जे स्कूल ऑफ़ आर्टच्या आवारात झाली आणि ती जोपासली गेली जहांगिर, पंडोल, एनजिएमए, एनसिपिएमधल्या चित्रदालनांमधल्या फ़े-यांमधून, अनेक दुपारी तासनतास ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीमधल्या त्या मऊ, गुबगुबीत चामडी खुर्च्यात बसून, मधल्या काचेच्या टेबलावर तिथली भलीमोठी पेंटिंग्जची, पेंटर्सच्या आयुष्यावरची पुस्तकं बघण्यात घालवल्या. एकेका चित्राचे पान पुन्हा पुन्हा उलगडून, नजर खिळवून पाहीले, इंटरनेटवरुन त्या चित्रांचा, चित्रकारांचा प्रवास जाणून घेण्यात नादिष्टपणे रात्री खर्च केल्या. त्या चित्रांचं गारुड अजब होतं. मग ’चिन्ह’च्या अंकांनी विशेषत: भास्कर कुलकर्णी आणि गायतोंडे विशेषांकांनी भारुन टाकलं, अंकांची पारायणं केली. चित्रकारांचे त्यातले किस्से, कहाण्या वाचल्या.
या सगळ्यातून आता मला चित्रकला इतकी कळली आहे कां की इथे मी त्यावर लिहावं असा एक प्रश्न स्वत:ला अनेकदा विचारुन झाला.
चित्रकला म्हणजे नक्की काय?
ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीमधे पावसाळी दुपारी बघीतलेली ती चित्रं.. मोने, माटिझ, सेझां, रेन्वाची आणि गॉघ, गोगॅं आणि पिकासोची.. ती एकातएक गुंतलेल्या कमळांची वर्तुळं आणि संथ, हिरवी तळी, गव्हाची शेतं आणि त्यावर हेलकावणारे कावळ्यांचे काळे, उदास थवे, शेकोटीचा तो गूढ, लाल प्रकाश (की अंधार?), नक्षत्रांनी खच्चून भरलेल्या निळ्या-हिरव्या रात्रींच्या आवरणातून झिरपत राहीलेली पिवळी अस्वस्थ अशांतता,

ताहिती बेटावरच्या अनोख्या सूवर्णप्रकाशात झळाळून उठलेली सावळ्या कायेची आभा, तो पिवळा ख्रिस्त आणि त्याच्या भोवताली लीनतेनं बसलेल्या खेडूत स्त्रियांच्या चेह-यावरचे प्रार्थनाशिल, करुण भाव,गेर्निकेमधला वेदनेचा चित्कार.. अमृता शेरगिल, अंजोली इला मेनन,सूझा, रझा, गायतोंडे, बरवे आणि आरा, हुसेन आणि बावा आणि पटवर्धन.. काही जुन्या खिडक्यांच्या चौकटीतल्या उदास, दुख-या रंगछटा, रिकामे चेहरे, काही झळझळीत, गहिरे रंग आणि गोलाई असलेल्या भरीव पण तरल आकृत्या, काहींमधे नुसत्याच स्त्रिया,भयकारी, स्फ़ोटक, नग्न किंवा मायाळू, शांत, दैवी, काही तांत्रिक चौकोन आणि बिंदू, काही गूढ, अद्भूत आकार ज्यात पर्वत रडतात,झाडे हसतात, काही पैलू पाडलेल्या लोलकांसारखे रंगांचे तुकडे,काहींमधे फ़क्त प्रसन्न रंग-रेषा आणि कोणतेच प्रश्न न पाडवणा-या स्थिर फ़ुलदाण्या तर काही हिरव्या, निळ्याचा अथांग, खोल, आत खेचून घेणार अवकाश..
चित्रे समजून घेण्याचा प्रयत्न वगैरे सगळं फोल वाटलं जेव्हा गायतोंडेंचं वाक्य वाचलं- “प्रेक्षक माझे चित्र ’उमजला’ तर ते उमजणे त्याचे स्वत:चे, माझे नव्हे. अंत:चक्षूंनी पाहिल्याशिवाय माझी चित्रं ’उमजणार’ नाहीत..."
मग ’उमजणं’ या शब्दाचा भुंगाच मागे लागला.
गॉघचा पिवळा रंग उधळलेला नाही, तो झिरपत रहातो, ठिबकत रहातो, मोनेच्या वॉटरलिलीज बघताना मनात दाटून येणारी प्रसन्नता आणि गॉघची आर्लेममधली खोली बघताना मनावर दाटून येणारी एकाकी उदासी यांची जातकुळी भिन्न, जरी पुन्हा पुन्हा पहाण्याचं अनावर आकर्षण तेच.. हा फ़रक कळणं म्हणजे चित्र उमजणं? कदाचित.
मोने म्हणतो- अनेकजणं माझ्या चित्रांवर चर्चा करतात, माझी चित्रं त्यांना कळाली आहेत असा दावा करतात, माझी चित्रं कळलीच पाहीजेत असा त्यांचा अट्टाहास का? माटिझ म्हणतो आधी आकार असतो आणि रेषा त्याभोवती सुरु होतात, क्लीचा प्रवास बिंदू पासून सुरु होतो, गायतोंडेंना रंग महत्वाचा वाटतो. ते रंग ऐकत असतात. त्यांचा तो अद्भत हिरव्या रंगाचा स्वत:ला शोधत जाणारा कॅनव्हासवरचा प्रवास, मिथ्यांना चित्रात परावर्तित करणारे बरवे, कोलते चित्रकलेचा संबंध अगोचर सृष्टीच्या अशोधाशी लावतात.
खरं तर प्रत्येक पेंटींग हा एक अपरंपार शक्यतांचा प्रवास असतो.. रंगाकडे, कॅनव्हासकडे आणि शेवटी स्वत:कडे.
चित्र बघण्याकरता मनात उमज हवी ती फ़क्त याचीच.
चित्र आवडलं की चित्रकाराचा शोध घेणं, चित्रांमागची कहाणी जाणून घेणं अपरिहार्य ठरतं. व्हॅन गॉघचं कानावर रुमाल बांधलेलं सेल्फ़ पोर्टेट बघताना त्या रुमालामागच्या तुटक्या कानाची गोष्ट जाणून घेणं अपरिहार्य असतं, गायतोंडेंचं जगाकडे पाठ करुन एकांतात जगणं आणि हुसेनचं माणसांच्या सतत गर्दीत राहून एकाकी असणं, अमृता शेरगिलचं मनस्वीपण..
प्रत्येकाची एक स्वतंत्र कहाणी.वैयक्तिक आणि चित्रनिर्मितीमागच्या प्रेरणेची कहाणी.दोन्हीही एकच कदाचित.चित्रकला म्हणजे नक्की काय?
चित्रकला म्हणजे गायतोंडेंची कित्येक कोटींना विकली गेलेली पेंटिंग्ज?की दिल्लीत निजामगंजच्या बरसातीत अखेरच्या एकाकी दिवसांत त्यांनी चितारलेली सिलिंगफॅनची तीन पाती?हुसेनचे करोडोंचे घोडे? की त्याला परागंदा करणार्‍या नग्न देवतांचे कॅनव्हास?रवि वर्माची धनिकांच्या खाजगी संग्रहात बंदिस्त झालेली दमयंती? की त्याच्या सरस्वतीच्या चित्रामागचा गूढ चेहरा?भास्कर कुलकर्णींनी जगासमोर आणलेली वारली आर्ट आणि मधुबनी? की त्याच मधुबनी गावामधे त्यांचे उपेक्षेत मरुन जाणे?चित्रकला म्हणजे चिमुलकरांच्या तरल स्व्प्नांतून उमटलेले गूढ आकार बहुतेक. किंवा त्या तरल आभासी आकारांनी वेडे झालेलेचिमुलकर स्वतःसुद्धा.जेजेचं १५० वर्षं पुराणं सौंदर्य आणि आता त्याला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी.चित्रकलेची ही सुद्धा एक कहाणी आहे.
चित्रकला याही पेक्षा काही वेगळी असू शकते?आणि मग अजिंठ्याच्या पद्मपाणीने सांगितलेली चित्रकलेची कहाणी? अल्टामिराच्या त्या तीन उन्मत्त बैलांनीही चित्रकलेचा अर्थसांगितलेला असणारच.भीमबेटकाच्या गुहेतल्या भिंतीवरच्या आदिम आकृत्यांमधली उर्जा.. आदिवासींचा जीवनमरणाचा संघर्ष उलगडवून दाखवणारीतीही चित्रकलाच. चित्रकला ही मानवतेची भाषा आहे, मानवतेची लिपी आहे.
चित्रकार रोज एक पेंटींग करत असतोच कुठे ना कुठेतरी.
ज्या प्रत्येक पेंटींगमागे एक कहाणी असते ती जाणून घेणं महत्वाचं. पेंटींग म्हणजे रंगाकारापलीकडला एक नि:शब्द अवकाश. मौनाची भाषा उलगडणारी चित्रलिपी शिकण्याचा प्रयत्न करणं म्हणजे चित्रकाराचा, त्याच्या चित्रकलेचा सन्मान करणं.
पेंटिंग जिवंत बनतं ते या कहाणीमुळे.
ती जाणून घेतली नाही तर कदाचित कॅनव्हासवर फ़क्त रंग उरतात, रेषा उरतात, आकार उरतात. रंग कोणते, कसे वापरलेत, रेषांचे फ़टकारे किती जोमदार, लय किती नाजूक, आकार किती सघन हे कदाचित समजावून घेता येऊही शकतं, पण त्यामुळे चित्र उमजेलच, आतपर्यंत पोचेलच असं नाही. तुमचा त्या चित्राशी संवाद होईलच असं नाही.क्यूबिझम, फ़्यूचरिझम, दादाइझम, फ़ॉव्हीझम, एक्स्प्रेशनिझम.. हजारो इझम, असंख्य वाद.. नक्की कोणत्या कप्प्यात चित्राला बसवायचं असा मेंदू थकवणारा विचार करुन चित्र समजू शकते?
चित्रकला म्हणजे जीवनकहाण्या, निर्मितीप्रेरणेचा वेध, ध्यासामागची, जगण्याशी चाललेल्या झगड्याचीही कथा..अजूनही बरंचकाही.. रोजच्या, आजूबाजूच्या आयुष्यातलं.. चित्रकलेचा पसारा तर आपलं अवघं जगणंच व्यापून बसलेला आहे.
हे जर उमगलं नाही तर- “हे घोडे काय, आमचा पाचवीतला मुलगाही काढेल, हे काय नुसते रंग फ़ासलेत, नुसताच ठिपका दिलाय, उलटं लावलं तरी कळणार नाही असं दिस्तय हे चित्रं." किंवा "चित्रकलेशी आमचा काहीच संबंध नाही,चित्राबित्रांमधलं आम्हाला काही कळत नाही" हे उगीचंच तुच्छतेनं, ठासून सांगीतलं जातं.
आपल्याकडे चित्रभाषा जनसामान्यांपर्यंत कधी पोचलीच नाही. चित्राच्या विषयापेक्षा त्याच्या किंमतीची, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले चित्रांचे लिलाव याबद्दलची चर्चा जास्त होते.
शेवटी चांगलं चित्र म्हणजे नेमकं काय? पाहणा-याचा चित्राशी संवाद सुरु होऊन पाहणारा तिथेच खिळतो, ती त्याला चित्राची भाषा कळण्याची, चित्र ’उमजण्याची’ सुरुवात असू शकते.
रविन्द्रनाथ ठाकूर म्हणाले होते- चित्रकार गात नाही, धर्मकथा सांगत नाही. चित्रकाराचे चित्र बोलते. एक कहाणी सांगते.
ऐकूया आपण ही चित्रभाषा.

Tuesday, January 10, 2012

'चित्रकारांच्या प्रदेशात..' स्टुडिओ सिरिज

चित्रकार आणि त्याचा स्टुडिओ- या विषयावर आधारीत "चित्रकारांच्या प्रदेशात.." ही ब्लॉग-सिरिज चिन्ह-ब्लॉगवर आजपासून सुरु केली आहे.

चित्रकार शुभा गोखले आणि तिचा स्टुडिओ-'गोंदणगाव' हे दोन्ही अत्यंत वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण. तिच्यापासूनच या मालिकेचा शुभारंभ केला आहे. 'चित्रकारांच्या प्रदेशात..' चे हे इन्ट्रो पोस्ट आणि 'गोंदणगाव' हे आज टाकलेले पोस्ट दोन्ही जरुर जरुर वाचा.

आणि प्रतिक्रियाही नोंदवा. मालिकेतील पुढच्या भागात काय हवेय आणि काय नकोय हे तुमच्या प्रतिक्रियांमधून समजू शकेल याकरता हा आग्रह.

Wednesday, October 26, 2011

रेषेवरची अक्षरे-२०११

रेषेवरची अक्षरे-२०११ चा यावर्षीचा अंक नेहमीसारखाच वाचनीय आहे.
अंकातील विशेष विभाग-"लैंगिकता आणि मी"एक वेगळा प्रयोग म्हणून अभिनंदनास पात्र तर आहेच शिवाय या विभागाची भट्टीही खास जमून आली आहे.
संपादकमंडळाचे अभिनंदन आणि अंकाच्या यशासाठी,पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


जरूर वाचा.

Wednesday, September 21, 2011

त्या वर्षी

शांता गोखलेंची ’रिटा वेलिणकर’ माझी आवडती कादंबरी.त्यानंतर १७ वर्षांनी त्यांनी लिहिलेली ही कादंबरी. दरम्यानच्या काळात त्यांचे कलासमिक्षणात्मक,बहुतांशी पत्रकारितेच्या अंगाने केलेले इंग्रजी लेखन आणि मोजक्या कथा सोडल्या तर काही वाचनात आले नव्हते.
तीन वर्षांपूर्वी मौजेची पुस्तकं ज्या शांतपणे,काहीही गाजावाजा न करता प्रसिद्ध होत असतात त्याच शांतपणे 'त्या वर्षी’ बाजारात आली.ना कुठे जाहिरात ना बोलबाला.
कादंबरी वाचली तेव्हा मला ती विलक्षण 'नवीन’ वाटली.कादंबरीतल्या अशेषच्या तोंडून सांगायचं तर,"नवीन म्हणजे नावीन्य नव्हे.नवीन म्हणजे ताजं.खरं.आतला-बाहेरचा संबंध लावणारं."

'त्या वर्षी'चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कथानकाचं वर्तमानाला घट्टपणे जोडलेलं रहाणं.या लिखाणाला एक पक्क ठिकाण आहे,विशिष्ट कालखंड आहे.पात्रांचे वागणे,विचार,त्यांच्यासमोरची आव्हाने या कालपटाशी सुसंगत आहेत.
काही अपवाद वगळता मराठी साहित्यामधे ज्या वातावरणात लेखक लिहित असतो ते त्याच्या लेखनात कधीच उमटत नाही.त्यांनी निर्माण केलेल्या जगाला कोणत्याही काळाचे संदर्भ चिकटलेले नसतात.
'त्या वर्षी' मधले जग कलावंतांचे असूनही कोणत्याही प्रकारे भासमान किंवा अधांतरी नाही.त्याला वर्तमान जगण्याचे निश्चित भान आहे.सामाजिक संदर्भ आहे.कलावंताच्या निखळ कलाप्रेरणेवर आणि प्रकटीकरणावर बाह्य जगातली अपरिहार्य वस्तुस्थिती नेमका काय परिणाम करते,जागतिकीकरण, बाजाराच्या शक्ती,जमावाची मानसिकता,आक्रमक प्रसारमाध्यमं कलावंताच्या आंतरिक अवकाशावर कशाप्रकारे अतिक्रमण करतात,कलावंत आंतरिक स्तरावर याचे कसे विश्लेषण करतो,त्याच्या कलेतून,ते कितपत अभिव्यक्त होते हे हा कथानकाचा प्रमुख गाभा.

वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमधे वावरणार्‍या मित्रांच्या एका ग्रूपची ही कहाणी.. याला हिंसेच्या राजकारणाची पार्श्वभूमी आहे.
कथानकाचा काळ बाबरीमशिद पाडल्यावर १२ वर्षांनंतरचा आहे.त्याला अनुसरुन इतर घटना,समाजमनात झालेल्या सांस्कृतिक,राजकीय स्थित्यंतराच्या,मोडतोडीच्या संदर्भांसकट यात येतात.या काळात जगण्याच्या विविध स्तरांवर धर्मवाद झिरपला.आजवर जी क्षेत्र अलिप्त होती त्यांना सुद्धा याचे परिणाम भोगावे लागले.
बाबरी मशिद पाडल्यावर उसळलेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीत जमावाकडून अनिमाचा नवरा सिद्धार्थ मारला जातो.१२ वर्ष रोज तो दिवस जगत राहीलेली अनिमा तिच्या दु:खाचा, संतापाचा निचरा डायरीच्या पानांमधे करत रहाते.एक दिवस ती आपली रोजनिशी लिहिणे बंद करते.पुढे जायचं ठरवते,आठवणींमधून मोकळं व्हायचा तिचा निर्णय कादंबरीची सुरुवात आहे.

अनिमाचा अर्थ- मानवी मनाचा तो भाग जो अंतर्मनाचा वेध घेतो आणि नेणीवेच्या संपर्कात असतो. या अर्थाचा चपखल वापर अनिमाच्या व्यक्तिरेखेच्या प्रवासात होतो.
अनिमाची व्यक्तिरेखा मध्यवर्ती नसली तरी महत्वाची आहे.अनिमा शाळेत शिकवत असते पण तिला तिथून काढून टाकतात कारण ती गाथा सप्तशती वर्गात वाचून दाखवते आणि ते अश्लिल असल्याचे सर्वांचे मत.पोर्शन बाहेरचं वाचून दाखवल्याचा गुन्हा पुन्हा पुन्हा हातून घडत असल्याने पालक आणि शाळा तिच्यावर नाराज असतात.
अनिमाचा एक भूतकाळ आहे,तिचे आई-वडिल,सूरगाव आहे.मुलगी आणि तीही सावळी जन्माला आलेल्या अनिमाचं कुटुंबव्यवस्थेमधलं दुय्यम स्थान,भावापेक्षा ती आईच्या नजरेत सहजगत्या कायम खालच्या पायरीवर.पण त्यातूनही तिनं जोपासलेलं तिचं आंतरिक कणखर,संवेदनशील,प्रगल्भ,रसिक आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व.
या उलट तिचा भाऊ अशेष.गोरागोमटा मुलगा म्हणून आईचा विशेष लाडका,पण कदाचित म्हणूनच अशेष अनिमासारखा कणखर, लढाऊ नाही.कचखाऊ आहे.नसरिन बरोबर लग्न ठरवताना आईला दुखावण्याचं धाडसं तो करु शकत नाही.आणि ते दु:ख गोंजारत रहातो.अनिमाचा कणखरपणा ती आंतरजातीय लग्न करताना तिच्या भावच्या तुलनेत सिद्ध करुन दाखवू शकली आहे.
अनिमा आणि अशेषचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत.अशेष प्रयोगशिल चित्रकार आहे.हे दोघे आणि त्यांच्या सामायिक कलाकार मित्रांचा एकात एक गुंतलेला नातेसंबंधांचा एक लोभसवाणा पट कादंबरीमधे उलगडत जातो.
अशेषचा चित्रकार मित्र हरिदास,फ़िरोझ,त्याचा माथेरानचा बंगला,कोल्हापूरहून आलेली पत्रकार जानकी पाटील मुंबई ऑब्झर्वर मधे कल्चरखिचडी नावाचा कॉलम चालवते.कॉलमचं नावच माध्यमजगताची कलेकडे पहाण्याची दृष्टी अधोरेखित करतं.जानकीला काही वेगळं,कलाकारांच्या निर्मितीचा वेध घेणारं लिहायची इच्छा आहे.
शास्त्रीय संगीतातील गुरु-शिष्य परंपरेत अडकलेली गायिका शारदा,तिलाही काही नव्या वाटा धुंडाळायची इच्छा आहे,गुरुंचा त्याला विरोध आहे.शारदाचा नवरा शेखर तिला 'कानधर’ घराण्याची म्हणतो.गुरुंचं नाव घेतलं की धरले कान,सूर सटकला धरले कान.
या शिवाय अनिमाच्या भूतकाळाशी संबंधित काही पात्रं,सूरगावातले आदिवासी,रामाचं मंदिर आहे,डॉ.भास्कर आहेत..
कादंबरीमधली सजिव-निर्जिव कोणतीही पात्रं अनोळखी वाटत नाहीत.कधी ना कधी यांच्याबद्दल वाचले आहे,त्यांना ऐकलं आहे,पाहीलं आहे हा फील घेउन ती येतात.

हरिदास माध्यमजगात रमणारा चित्रकार.खरं तर परफॉर्मिंग आर्टिस्टच.रहातो मुंबईच्या एका जुन्या वाडीतल्या कौलारु घरात पण लाल मर्सिडिझ चालवतो,त्यावर हत्ती रंगवतो,ट्रकचा हॉर्न बनवतो.त्याच्या ’ऑल व्हाईट’ प्रदर्शनातील नव्या प्रयोगाला लोकांनी ’ऑल वाईट’ म्हणत हेटाळलं आहे पण आपला नवे प्रयोग करण्याचा हक्क तो अबाधित राखून आहे."वैचारिक सुसंगतीसारखी कंटाळवाणी गोष्ट नाही.आपण तोच तोच विचार केला तर तेच तेच काम करु." हे त्याचं आवडतं तत्वज्ञान.हरिदासचं थिल्लर, शोबाजी करणारं वागणं शारदाचा नवरा शेखरला आवडत नाही.शारदाचे आणि हरिदासचे एकेकाळचे संबंधही त्याच्या रागाच्या मागे सावली धरुन आहेत.

आर्टस्कूल सोडून कलाविश्वात उतरलेल्या उदयोन्मुख चित्रकारांचा उडणारा सर्जनशिल गोंधळ प्रकाशच्या व्यक्तिचित्रणातून व्यक्त होतो.राजकीय संदर्भ चित्रातून आणायला हवेत,व्हिडिओआर्टला मागणी आहे तर ते कसं करायचं?त्याच्या गोंधळलेल्या प्रश्नांना उत्तर देताना समंजस चित्रकार फ़िरोझ सांगतो," तुम्हांला जे करावसं वाटतय ना,ते करा.तुमची प्रतिभा,तुमच्या कल्पना,तुमचं आयुष्य,तुमच्या भिती,आठवणी.. समजून घेऊन त्यांच्याशी इमान राखा.तुमची चित्रं म्हणजे तुमचं सत्य असेल.जे तुमच्या आतून येतं ते तुमचं सत्य.त्याचा शोध घ्या."

कादंबरी बरिचशी अनिमाच्या नजरेतून घडते पण ती प्रोटेगोनिस्ट नाही.प्रमुख सूत्रधार आहे वर्तमानकाळ, नियती.कोणत्याही एका विशिष्ट सूत्रातून कादंबरी पुढे जात नाही.कलावंताच्या मनस्वी कलाप्रेरणांचा मागोवा घेत,वास्तव जगाशी त्यांना जोडून घेत,कलेबद्दलचे दृष्टीकोन,परस्परांमधील गुंतागुंतींचे संबंध,हेवेदावे उलगडत कथानक पुढे सरकत रहातं.सुरुवात,मध्य,शेवटाची पारंपारीक चौकट इथे नाही.वर्तमानाचा गतिमान ओघ कथानकाला आपल्यासोबत घेऊन जातो.घटनांच्या ओघात व्यक्तिरेखा उलगडत जातात आणि आजच्या जगण्यातील त्यांचे व्यवहार स्पष्ट होत जातात.

कलाकार काहीतरी भन्नाट वेगळ्या जगात वावरतात,त्यांना अंतराळातून कुठून तरी स्फुर्ती येते आणि मग ते काहीतरी निर्माण करतात अशी रोमॅन्टिक कल्पना बाळगायला लोकांना आवडतं.खरं तर वर्तमानातल्या प्रत्येक घटनेचा एक थेट परिणाम इतर लोकांप्रमाणेच कलाकारांच्याही वागण्यावर,विचारांवर होत असतो. तर्कसंगत प्रतिक्रिया त्यांच्याही जागरुक अंतर्मनावर उमटतात. कलेतून ते प्रकटायला कदाचित वेळ लागतो पण ते जेव्हा येतं तेव्हा काळाचा संदर्भ कलावंताच्या निर्मितीमागच्या प्रेरणा तपासून पहाताना महत्वाचा ठरतो.
सामान्य माणसाच्या मनात कलेविषयी असंख्य गोंधळ असतात.त्याला स्वत:ला चित्र म्हणून जे अभिप्रेत आहे आणि कलाजगत किंवा माध्यमजगताकडून जे उत्तम चित्र म्हणून वाखाणले जाताना दिसतं त्यात मोठी दरी पडलेली दिसते.आजच्या जागतिक देवाण-घेवाणीत चित्रजगतात अशा अनेक दर्‍या निर्माण झाल्या आहेत.कदाचित म्हणूनच आपण कलाकारांना स्वतंत्र स्थानावर,काही अंतरावरच ठेवणे पसंत करतो. आम्ही त्यांच्याशी नाही नातं जोडू शकणार हा गंड बाळगत जगतो आणि कलाकारासाठी कधीच आपल्या मनाचे दरवाजे खर्‍या अर्थाने उघडत नाही.
त्यामुळेच कलाकारांचा स्वत:च्या कलेशी,समाजाशी जोडले जाण्यात असलेला प्रामाणिकपणा,व्यवहारी वृत्ती,उत्तरदायित्व याचा जो वस्तुनिष्ठ ताळेबंद इथे मांडला जातो,कलाकार आणि सामान्य माणूस यांच्यामधली वैचारिक दरी सांधण्याचा जो प्रयत्न इथे होतो तो कलाकारांना समजून घेण्यासाठी महत्वाचा ठरतो.

वर्तमान जगात घडणार्‍या घटनांचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम यातील पात्रांच्या आयुष्यावर होताना दिसतो. यात दंगल आहे,हुसेनच्या चित्रांवरील हल्ला आहे,कलाकारांचे लैंगिक व्यवहार,चित्रकाराची आत्महत्या,वारली चित्रांचे व्यवहार,तिवरांची तोड, सरकार आणि बिल्डरलॉबी.. कादंबरीत अनेक उल्लेख,संदर्भ,विचार येत रहातात ज्यामुळे ती वर्तमानाला पक्की धरुन रहाते.या घटना कुठेही मुद्दाम आणल्यासारख्या वाटत नाहीत.कादंबरीतल्या व्यक्तिरेखांच्या आयुष्याचा या घटना एक भाग आहेत.

व्यक्तिरेखांपैकी काही तत्त्वांना घट्ट धरुन चालणारे,काही तत्त्वाची कास सोडून रस्त्यावरुन भरकटलेले.वेगवेगळ्या पार्श्वभूमी,व्यवसायातल्या वृत्ती-प्रवृत्ती आणि विकृतींचे रेखाटन यात आहे. प्रतिभावंतांनाही दैनंदिन व्यवहारात कराव्या लागलेल्या तडजोडी,तत्त्वांशी, मूल्यांशी फ़ारकत घेताना होणारी त्यांची फरपट,बौद्धिक ताणतणाव,निर्ममता धक्का पोचवते.

स्ट्रगलर प्रकाशच्या आध्यात्मिक,सेलेब्रिटी चित्रकार प्रकाशानंदापर्यंतचा सुमित्रादेवींच्या साहाय्याने झालेल्या प्रवासातून नवोदित कलाकाराचे ताण,शोषण, क्रिटिक्सचा व्यावसायिकपणा,मागणी म्हणून अमूर्त चित्रं काढणं,नामांकित व्हायचं तर मिडियाची गरज आणि तुम्ही नामांकित असल्याशिवाय मिडिया तुमच्याकडे बघणार नाही या चक्राला भेद देण्याकरता चाललेले प्रयत्न,त्यातून घडून येणार्‍या विपरित गोष्टी सामोर्‍या येतात.

अशेष अनिमाच्या आईवडिलांची कथा ही एका परिने स्वातंत्र्योत्तर पिढीचे प्रतिनिधित्व करते.ध्येयवादाने भारुन गेलेल्या पतीच्या बेपर्वा,अव्यावहारिक वागण्याचे चटके सोसणार्‍या सिंधूताई,त्यांना समजून न घेणारा अण्णांचा एरवी नि:स्वार्थी,सामाजिक चळवळींमधे रमणारा स्वभाव,त्यांच्या गायब होण्यामागचे गूढ,उपेक्षित, वयस्कर सिंधूताईंनी सूडाच्या भावनेतून डॉ. भास्करसोबत प्रस्थापित केलेले अनैसर्गिक प्रेमसंबंध..नाती आणि नात्यांमधले समजून घेणे किती सापेक्ष असते हे मोठ्या करुणपणे आपल्याला समजावून जातात.

बच्चूकाकांची सामाजिक चळवळीचे अपयश,खंत पेलणारी व्यक्तिरेखा आणि डॉ. भास्करची हिंदू दहशतवादाच्या दिशेने झालेला प्रवास दाखवणारी व्यक्तिरेखा परस्पर विरोधी तरीही आपल्या जागी खर्‍या.अलिप्त,तटस्थ शैलीतून लेखिका त्यांच्या जगण्याच्या छटांना अनेक परिमाणे देत ठळक करत जाते.

अशेष,हरिदास किंवा फ़िरोझच्या व्यक्तिरेखेतून आजच्या चित्रकारासमोरील आव्हाने,त्याचे विचार आपल्याला समजून घेता येतात.चित्रनिर्मितीची एक सुरेख प्रोसेस या निमित्ताने अनुभवायला मिळते.विशिष्ट रंगाचं चित्रकाराच्या मनावरचं ऑब्सेशन कुठून येतं (अशेषचं काळ्या रंगात अडकून जाणं),कलावंताच्या नेणीवेत काय चालतं, कधीतरी काहीतरी अनुभवलेलं वर येत असताना येणार्‍या सृजनाच्या कळा,अशेषला आपल्या थरथरत्या हाताची वाटलेली भिती जी त्याच्या मनाच्या कमकुवतपणातून वर आलेली असते,सृजनाच्या केंद्रबिंदूचा शोध घेताना होणारी तगमग,नवनिर्मितीचा क्षण पकडतानाचा आनंद-ती सारीच प्रक्रिया फ़ार लोभसपणे येते.

फ़िरोझने चितारलेल्या महाभारतातील चित्रमालिकेमधल्या ’संहार’ चित्रावर जमाव हल्ला करतो.चित्राची नासधूस करतो.अनिमाचा अप्रत्यक्षपणे त्या चित्राच्या निर्मितीमधे सहभाग असतो.हिंसे़चं एक आवर्तन पूर्ण होतं.तिथेच कादंबरी संपते.

कादंबरी कोणत्याही शैलीत,फ़ॉर्ममधे अडकलेली नाही.अनौपचारिक,मोकळं असं हे लिखाण आहे.म्हणूनच वर्तमानाशी सर्वात जास्त जोडलेलं रहातं.भाषा लालित्याच्या सोसात अडकलेली नाही,पत्रकारितेतली स्पष्ट,ओघवती,वैचारिक शैली लिखाणाला आहे पण ती कुठेही कोरडी होत नाही.लेखिकेने पत्रकार म्हणून वावरताना पाहिलेल्या,अनुभवलेल्या वेगळ्या वास्तवाचा हा सृजनशीलपट आहे.त्यातल्या व्यक्तित्वांच्या,आयुष्यांच्या अपरिमित छटा आपल्याला स्तिमित करतात.भाषेमधला उपरोध आवश्यक तिथे व्यक्त होतो,मेलोड्रामा नसलेली संयत,अभिजात मांडणी हे या कादंबरीचे मोठे वैशिष्ट्य.

भाषेची ललित वळणं नजाकतीने आणि सहजतेनं येतात.याचे उत्कृष्ट उदाहरण चित्रकार अशेषचे काळ्या रंगाशी जुळत गेलेले नाते,त्याला गवसत गेलेला काळ्या रंगाचा अंतरात्मा आणि मग त्या काळ्या रंगातच त्याचे अडकून पडणे,त्यातून सुटण्याची त्याची धडपड किंवा शारदेच्या मनातील "काळ पाहिला रे सख्या..."या नव्या बंदिशीचा जन्माची घटना.
जानकी अशेषला त्याच्या काळ्या रंगाच्या ऑब्सेशनबद्दल विचारत असते तेव्हा तो सांगतो- "काळ्याचं शरीर डोळ्यांना सुखावत नाही,इतर कोणत्या ज्ञानेंद्रियाला ते चाळवत नाही,भावनांशी खेळत नाही,तो वेश्याव्यवसाय कधीच करत नाही,तो केवळ आणि केवळ बुद्धीचा हस्तक असतो.काळ्या रंगाचा आदर ही रंगाची मागणीच आहे.तिथं तडजोडीला जागा नाही.काळा हा रंगही आहे आणि शब्दही आहे.'ब्लॅक’चा उच्चार कडी बंद केल्यासारखा निर्वाणीचा आहे.काळ्याच्या उच्चारात मोकळेपणा आहे.त्याच्या शेवटी ‘आ’कार आहे म्हणून. काळ्यात आणखी एक प्रभावी अक्षर आहे.‘ळ’. ‘ळ’चे दोन गोलाकार,मांसल.पहिल्यातून दुसर्‍यात.दुसर्‍यातून पहिल्यात.गिरवत बसलात तर ’ळ’ कधी संपणारच नाही”. पु.शिं.ची ‘पुष्कळा’ आठवते.

जानकी पाटीलच्या कलासमिक्षणांचे लेख,मुलाखती,बातम्या वगैरे कादंबरीत जशाच्या तशा छापल्या आहेत ते परिणामकारक आणि वेगळं वाटतं.तिचं कलावंताच्या सृजनापर्यंत पोहोचू पहाणं,कलाविश्वातल्या घडामोडींचं, संक्रमणाचं छान भाष्य त्यातून येतं.

कादंबरीतलं जग कलावंतांच्या वृत्ती-प्रवृत्तींचं सूक्ष्म आणि सखोल दर्शन घडवतं.कलावंतांचे यातले विश्व त्यांच्या वैयक्तिक परिघातून विस्तारत जाते.मनस्वी कलावंताचे आपल्या ध्येयांबद्दलचे,कलेबद्दलचे दृष्टीकोन,त्यांचे गुंतागुंतीचे संबंध,कलावंत आणि माणूस या दोन स्तरांवर आयुष्य जगताना होणारी मानसिक ओढाताण,त्यांचे दांभिक,बेगडी,मुखवट्यांमागचे खरेखुरे चेहरेही प्रकाशमान होत जातात.

कादंबरीची काही वैशिष्ट्य किंवा वेगळेपणा सांगायलाच हवीत अशी- कलाक्षेत्रातल्या वादविषयांची सविस्तर चर्चा कादंबरीत आहे.प्रोग्रेसिव्ह कला चळवळीतल्या कलाकारांचा भारतीय कलेवर पडलेला चांगला-वाईट प्रभाव,कलेमधलं सौंदर्याचं स्थान,फेक आर्ट,कला आणि समाज यातलं नातं,कलाव्यवहारात अधिकाधिक जोमाने प्रवेश करत असलेला कलाव्यापार कलेच्या वृद्धीसाठी चांगला की वाईट,भारतीय कलेत भारतीयपणा किती शिल्लक आहे,तो टिकवण्याचा प्रयत्न व्हायला हवा की गरज नाही वगैरेंबद्दल चित्रकारांची मतं,विचार त्यांच्या भाषेत सविस्तरपणे दिले आहेत.
वेगवेगळ्य़ा प्रवाहाच्या चित्रकारांची परस्परांच्या शैलीवरची टीका,समर्थनं, आजच्या इन्स्टॉलेशन,व्हिडिओआर्टच्या कलाकारांची भाष्य, पारंपारिक कलेच्या स्वरुपाला त्यामुळे गेलेला छेद,कलाकाराचे उत्तरदायित्व काय असते यावरचे भाष्य परिणामकारक आहे.
शांता गोखलेंसारख्या या क्षेत्रातल्या मान्यवर,अनुभवी आर्टक्रिटिकचे विचार त्यानिमित्ताने व्यक्तिरेखांच्या तोंडून ऐकायला मिळतात जे नक्कीच विचार करायला लावतात.
उदा.अशेष एका चर्चासत्रात कलेच्या उत्तरदायित्वाविषयी म्हणतो-" त्याच्या मुळाशी एक साधी पण कठीण प्रक्रिया आहे.‘आपुला संवाद आपुल्याशी’ ह्या वचनात ती सामावलेली आहे.जेव्हा आपला संवाद बाजारपेठेशी होऊ लागतो,आणि बाजारी यशासाठी आपण आपलंच अनुकरण करत राहतो,तेव्हा आपण आपलं उत्तरदायित्व नाकारत आहोत असं समजावं.ही स्थिती कोणाही कलाकाराच्या आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर येऊ शकते.ती ओळखून पुन्हा एकदा स्वत:ला ढवळून काढून प्रश्न विचारायची तयारी असावी लागते.."
लेखिकेची या सार्‍याकडे बघण्याची एक ठाम दृष्टी आहे,एक जाणीवपूर्वक घेतलेला दृष्टीकोन आहे हे जाणवते.
व्यक्तिरेखा सुट्ट्या आहेत आणि त्यांचे तसेच असणे अपेक्षित आहे.कलावंताचा अलिप्ततावाद यातून सामोरा येतो.कलावंतांचं स्वतंत्र बेटांप्रमाणे स्वमग्न जगणे,दुसर्‍या कलावंताच्या निर्मितीकळांची वेदना, आनंदाची जाणीव नाही,व्यक्तींचे तुटलेपण, स्वतंत्र तुकडेच शेवटी सारे.कलाव्यवहारांच्या,मैत्रीच्या समान धाग्याने यातल्या व्यक्ती परस्परांशी जोडल्या गेल्या असल्या तरीही प्रत्येकाचा अवकाश स्वतंत्रच.प्रत्येकाच्या आयुष्याची रेषा स्वतंत्र.काही समांतर,काही परस्परांना छेदून जाणार्‍या,काही वेड्यावाकड्या गुंतलेल्या..तरीही स्वतंत्र.

कलाकार व सामान्य माणूस यांच्यामधलं आणि कलाकारामधल्या सामान्य माणसाचं नातं,वर्तमान जगण्यातले अनुभव, तणाव,आस्था,समज,समाजातल्या विविध घटकांची मानसिकता जाणून घेण्याच्या धडपडीत येत जाणारी उमज कादंबरीत उमटली आहेच पण त्याही पलीकडे काहीतरी यात आहे.कलावंताच्या मनाच्या अगदी आतल्या पदरातले सृजनाचे कल्लोळ लेखिका ताकदीने मांडू शकली.रंगरेषांच्या निर्मितीमधली संवेदना आपल्यापर्यंत पोचवू शकली.कलावंताच्या निर्मितीप्रेरणेची प्रक्रिया तपासण्याचा हा प्रयत्न मला वेगळा,महत्वाचा आणि नवीन वाटला.
गतिमान,अनंत अशा कालप्रवाहाची आणि कलाप्रवाहाची जाणीव करुन देणारी ही कादंबरी.

कादंबरी वाचल्यावर एखादा कलात्मक सिनेमा बघून झाल्यासारखं वाटतं.दृश्यकलांचा,कलाकारांच्या जगण्याच्या आतल्या परिघाचा,त्यांच्या सृजनाच्या निर्मितीक्षणांचा,तणावांचा,अगदी हेव्यादाव्यांचाही इतका प्रत्ययकारी,शब्दांच्या माध्यमातून श्रुती,दृष्टी संवेदनांनाही जागवणारा,नवीन,समकालीन लिखाण वाचल्याचा अनुभव मला आधी कधीही आला नव्हता.

--
त्या वर्षी
शांता गोखले
मौज प्रकाशन गृह
प्रथम आवृत्ती- ६ मार्च २००८
किंमत- एकशेपंचाहत्तर रुपये

Tuesday, March 08, 2011

चायना पोस्ट-आठ (फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड)

दुपारी चार वाजता हांगझोला पोचलो तर ते शहर अंगावर दाट धुक्याचं पांघरुण घेऊन मस्त गुडूप झोपलं होतं.शांघायहून आम्ही येत होतो आणि तिथल्या चकचकाटामुळे अक्षरश:दमून गेलेल्या आमच्या डोळ्यांना हांगझोतला तो निळाईची झाक पसरलेला धुकाळ राखाडी,काहीसा मंदावलेला प्रकाश खूपच शांतवणारा वाटला.बघताक्षणीच कोणीही प्रेमात पडावं असं ते शहर.तसं बघायला गेलं तर प्रथमदर्शनी इतर कोणत्याही हनिमूनर्स पॅरेडाईज म्हणून ओळखल्या जाणार्‍या निसर्गरम्य हिलस्टेशनसारखंच दिसणारं.ताजी,थंडगार हवा,धुक्यात लपेटलेल्या संध्याकाळच्या वेळा आणि दाट झाडीतून वाट काढत आपल्याला कोणत्यातरी अनपेक्षित सौंदर्यस्थळी नेऊन पोचवणारे वळणदार,उंचसखल पातळीवरचे छोटे,छोटे रस्ते.सिमला,माऊंट अबू,नैनिताल किंवा अगदी आपलं महाबळेश्वरही झाकावं आणि हांगझोला काढावं.
लिनबोला मी तसं म्हणताच तो जरा दुखावला.हांगझो सारखं तळं दुसर्‍या कोणत्याच शहरात नाहीये हे त्याचं पालुपद होतं.लिनबो हांगझोचा प्रचंड अभिमानी.त्याचं हांगझोमधे वडिलोपार्जित घर आहे.त्याच्या पणजोबांची हांगझोच्या राजवाड्यात तलावातल्या नौकांची देखभाल करण्याची नोकरी होती.
लिनबोलाही असाच आत्ताच्या काळातला कोणतातरी जॉब हांगझोलाच राहून करायची खूप इच्छा होती पण वडलांनी त्याला जबरदस्तीने बेजिंगला इंजिनियरिंग कॉलेजात घातलं होतं.त्याचा आता प्लास्टिक मोल्डिंग मशिनरी बनवायचा मोठा व्यवसाय होंगियानमधे होता.तिथेच त्याचं कुटुंबही रहातं पण त्याचा सगळा जीव हांगझोत अडकलेला असतो.दर आठवड्याला तो आवर्जून हांगझोला परतायचा.
होंगियान फ़क्त पैसे मिळवून देतं पण सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला हांगझोलाच यायला हवं असं दरवेळी भेटला की लिनबो एकदातरी हे वाक्य म्हणायचा.त्याचा आम्हाला सारखा आग्रह चाललेला असायचा तिथे जाऊन या म्हणून.पण जवळच आहे तर कधीही जाता येईल असं म्हणत आम्ही आपले लांबलांब अंतरावरच्या चिनी शहरांनाच भेटी देण्यात मग्न होऊन गेलो होतो.
लिनबोची मधल्या काही दिवसात काही खबरबातही नव्हती पण शांघायमधे भरलेल्या वर्ल्ड एक्स्पोला आमच्याच रांगेत बाहुलीसारख्या नाजूक बायकोला आणि गुबगुबीत सशासारख्या दिसणार्‍या आठ महिन्यांच्या मुलाला घेऊन उभा असलेला लिनबो अचानक भेटला आणि मग त्याने शांघायहून थेट हांगझोला जायचा आमचा प्लॅन स्वत:हून पक्का करुनही टाकला.
होंगियानपासून हांगझोचा रस्ता जेमतेम पाच-सहा किलोमिटर अंतराचा पण त्या दोन शहरांच्या वातावरणात,संस्कृतीतला फ़रक कित्येक योजनांचा.होंगियान संपूर्णपणे औद्योगिक वातावरण असलेलं शहर आहे.लिनबोच्या म्हणण्याप्रमाणे तिथल्या सगळ्या गोष्टी फ़क्त फ़ंक्शनल असतात.नुसतं बसून तलावाचं पाणी तास न तास निरखत बसण्यातलं सुख तिथल्या काय इतर कोणत्याच शहरातल्या लोकांना कळणारं नाही असं तो पुन्हा पुन्हा सांगतो.
हांगझो सोडताना आम्हीही त्याची री ओढायला लागलो होतो.
शहराच्या सर्व अस्तित्वालाच वेढून असलेल्या हांगझोच्या तलावाला'तलाव'म्हणणं म्हणजे त्याच्या आकारमानाचा अपमान करण्यासारखच होतं.अक्षरश:किनार्‍या थांगही न लागणारा विशाल समुद्राचा एक पाचूसारखा तुकडा असा तो हिरवट-निळ्या पाण्याचा प्रचंड मोठा जलाशय होता.विलो,चेरी,र्‍होडोडेन्ड्रॉन्स आणि अजून एका नाजूक पांढर्‍या फ़ुलांचा चांदण्यांसारखा सडा पाण्यावर पाडणार्‍या एका अनामिक झाडांच्या महिरपीने,छोट्या,छोट्या कमानींच्या पुलांनी,राजवाड्याच्या देखण्या,भव्य,नक्षिदार कमानींनी तलावाचे मुळातले सौंदर्य कमालीचं खुलत होतं.पहाटे,दुपारी,उतरत्या संध्याकाळी आणि मिट्ट काळोख्या रात्रीही तलाव पहावा आणि त्या प्रत्येक प्रहराचं अंगभूत सौंदर्य अंगावर निथळवत राहिलेला तो अद्भूत तलाव पाहून त्याच्या मोहकतेनं विस्मयचकित व्हावं.नौकाविहार करावा किंवा नुसतच काठावर बसून तलावातलं चांदणं निरखावं.पूर्वेचं व्हेनिस म्हणून दिमाख दाखवणार्‍या जवळच्या सुजौ शहरातल्या कालव्यांचं एकत्रित सौंदर्यही या तलावापुढे उणंच.
एका रात्री उशिरा तलावावरुन परतत असताना आम्ही जेवायला उघडी रेस्टॉरन्ट्स शोधत होतो तेव्हा एका सायकलरिक्षावाल्याने इंदू इंदू म्हणत आम्हाला थेट आणून सोडलं हांगझोमधल्या एका इंडियन रेस्टॉरन्टमधे.शुक्रवारची ती संध्याकाळ होती आणि रेस्टॉरन्ट्च्या मधोमध एका स्क्रीनवर हिंदी सिनेमातल्या गाण्यांनी धुमाकूळ घातलेला होता.त्याच्या खालच्या मोकळ्या जागेमधे त्या सगळ्या लेटेस्ट आयटेम नंबर्सवर बरंच तरुण,प्रौढ पब्लिक जोरदार नाचत होतं.त्यात बरेच भारतीय होते,चिनी होते,पाकिस्तानी,बांगलादेशी,श्रीलंकन,तुर्की होते आणि काही वेस्टर्न चेहरेही होते.हांगझोचं हे रेस्टॉरन्ट वीकेन्ड्सना असंच भरुन ओसंडत असतं असं तिथला केरळी मॅनेजर सांगत होता.लग्नांमधे असतो तसा भला मोठा बुफ़े स्प्रेड मांडून ठेवला होता.चिनी (भारतीय पद्धतीचं),पंजाबी,साऊथैंडियन,कॉन्टिनेन्टल,इटालियन असा आपल्याकडच्या लग्नांमधे असतो तसा सगळा मेनू बुफेमधे दिसत होता.पदार्थ चवदार होते.सगळेजण बशा भरभरुन घेऊन जात होते.
इतकी सगळी पब्लिक टुरिस्ट आहे?मला कळेना.
एकतर बरेच जण त्या रेस्टॉरन्टच्या वातावरणाला,तिथल्या जेवणाला सरावलेले वाटत होते.
नाही नाही,फक्त टुरिस्ट नाहीत.लिनबो म्हणाला.
हांगझोच्या जवळपासची सगळी शहरं बहुतांशी औद्योगिक आहेत.शिवाय जवळच सुजौची सिल्क टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे.मोठं व्यापारी केन्द्र असल्याचा फायदा हांगझोला मिळतो.ही लोकं इथे सारखी येत जात असतात. बेजिंग,शांघायला बरेच भारतीय चेहरे दिसतात पण हांगझो सारख्या लहान शहरात इतके भारतीय एकत्र दिसू शकतील असं वाटलच नव्हतं.
मेनलॅन्ड चायनामधे भारतीयांची संख्या गेल्या दशकामधे नक्कीच वाढली आहे(अंदाजे ३०,०००)तरी युरोप,अमेरिका,मध्यपूर्वेला जाऊन रहाणारे जितके भारतीय असतात त्यापेक्षा ही संख्या कितीतरी कमी आहे.यापैकी काही विद्यार्थी,व्यापारव्यवसायातले आणि बरेचसे बहुराष्ट्रीय कंपन्या,बॅंकेमधील नोकर्‍याद्वारे इथे आलेले आहेत.चायनीज शाळांमधे किंवा बेजिंग युनिव्हर्सिटीमधे भारतीय शिक्षक,शिक्षिकांना खूप मान आणि मागणी असते.बेजिंग युनिव्हर्सिटीमधल्या हिंदी भाषा विभागातर्फ़े भारतीय इतिहास,संस्कृती बद्दल माहिती देणारे वर्गही चालवले जातात आणि त्या वर्गांना चिनी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.भारतात येऊन नोकर्‍यांची संधी घ्यायला अनेक चिनी तरुण तरुणी उत्सुक असतात आणि त्यामुळे या विभागाची लोकप्रियता खूप आहे.भारतीय फ़ॅशन्स,खाद्यपदार्थ यांची चीनमधली लोकप्रियता गेल्या काही वर्षांमधे सातत्याने वाढती आहे.
लिनबोचं हांगझोमधे जे जुनं घर होतं तिथे त्याच्या आईवडिलांना भेटायला आम्ही गेलो होतो.दोघांनाही इंग्रजी अजिबातच येत नसल्याने संभाषण लिनबो मार्फ़तच जे काही होईल ते.लिनबोच्या वडलांना घरी कंटाळा यायचा आणि मुलाच्या फ़ॅक्टरीमधे जाऊन काही काम करायची त्यांची इच्छा असायची पण लिनबोच्या मते वडिल जुन्या विचारांचे आहेत आणि त्यांची मत वेगळी आहेत.लिनबोची आई जेव्हा माझ्या सुनेला संध्याकाळी घरी जेवण करायला वेळ नसतो आणि तिला तसं सांगितल्यावर ती तुमच्या मुलासारखीच मी सुद्धा आठ तास फॅक्टरीत जाते असं'उद्धट'उत्तर देते अशी तक्रार लिनबो मार्फत सांगत होती तेव्हा चिनी असोत किंवा भारतीय चुली सगळीकडे सारख्याच असं जाणवून मजा(!) वाटली.
चीनमधे पिढ्यांमधल्या अंतराचा हा प्रकार मात्र बराच आणि खूप तीव्रतेनं पहायला मिळाला.दोन पिढ्यांमधील विचारांची तफ़ावत चीनमधे प्रचंड आहे.चीनची विशीच्या आसपासची पिढी संपूर्णपणे वेस्टर्न कल्चरला आपलीशी केलेली,इंग्रजी सफ़ाईने बोलू शकणारी.चीनच्या वन चाईल्ड पॉलिसीच्या कडक अंमलबजावणीच्या दरम्यान जन्माला आलेली ही एकुलती एक मुलं,ज्यांना लाडावलेले लिटल एम्परर्स म्हणून समाजशास्त्रज्ञांनी उपहासाने संबोधले.
साठीच्या पुढचे चीनी सध्याच्या झपाट्याने बदललेल्या चीनच्या संस्कृतीशी अजिबातच सांधा जुळवू न शकलेले.त्यांना इंग्रजी अजिबातच येत नाही आणि समजतही नाही.त्यांना नव्या पिढीचं के एफ़ सी,मॅकला सारखं भेटी देणं,कोक,बिअर पिणं,फ़ॅशन्स,बोलणं-चालणं काहीच आवडत नाही.चीनमधला वृद्ध वर्ग हा संपूर्णपणे तुटल्यासारखा बाजूला पडलेला वाटला.
चीनी मधल्या पिढीला म्हणजे साधारण पन्नाशीतल्या चिन्यांना आत्ताच्या तरुण पिढीमधील लिव्हईन रिलेशन्शिप्सचे आकर्षण,डीव्होर्सच्या झपाट्याने वाढत जाणार्‍या प्रमाणाबद्दल खूप चिंता वाटते पण त्यांनी या गोष्टी अपरिहार्य म्हणून स्विकारायचे ठरवल्यासारखी त्यांची वागणूक असते.या वयोगटाच्या चिन्यांनी खूप मेहनतीने आपलं स्थान निर्माण केलं आहे आणि त्याचा त्यांना सार्थ अभिमानही आहे.तरुण पिढीची भारतात काय परिस्थिती आहे याची उत्सुकता त्यांना वाटते.
सुजौच्या सिल्क फ़ॅक्टर्‍यांमधे फार सुरेख मशिनवर बनवलेले रेशमचे तागेच्या तागे आपल्या डोळ्यांपुढे उलगडत जाताना बघण्याचं दृष्य फार सुरेख दिसतं पण मला आवडलं ते बेजिंगच्या भेटीदरम्यान बघितलेलं रेशमाच्या किड्यांच्या पैदाशीपासून ते त्या किड्यांनी बनवलेल्या रेशमाच्या कोशाला चारी बाजूने हाताने ताणून मग त्यापासून रेशमाच्या रजया बनवण्याचं केन्द्र.ती पद्धत ग्रेटच होती. एका रजईसाठी दहा ते बारा रेशमाचे कोष ताणून ते एकमेकांवर ठेवतात आणि मग त्याची रजई बनवतात.अद्भूत एअरकंडिशन्ड अशी शुद्ध ऑरगॅनिक रजई असते ती.उन्हाळ्यात थंडगार आणि हिवाळ्यात उबदार.त्यावर सुंदर,चिनी पद्धतीचं भरतकाम केलेल्या रेशमांच्या खोळीही मिळतात.
सुजौला सिल्कचे स्टोल्स,शाली,स्कार्फ़,सिल्क कार्पेट्स खूप सुंदर आणि अती महागडे होते.पण सिल्क स्टोल्सच्य खरेदीचा मोह आवरण्याच्या भानगडीत मी अजिबातच पडले नाही.लिनबो बार्गेन करायला होताच त्यामुळे भरपूर खरेदी केली.भारतात परतल्यावर मैत्रिणींनी पहिला डल्ला मारला आणि माझी बॅग रिकामी करुन टाकली ती या स्टोल्सनीच.मऊ जेडच्या बारीक बारीक कपच्या घालून बनवलेली रजईसुद्धा इथे बघीतली.
चीनमधे अशा फ़ॅक्टर्‍यांमधून ज्यापद्धतीने डायरेक्ट मार्केटींग चालतं ते बघण्यासारखं असतं.तुमच्यासमोर संपूर्ण मॅन्युफ़ॅक्चरिंग प्रोसेस दाखवून एखादी वस्तू बनवली की साहजिकच त्या वस्तूंच्या ऑथेन्टिसिटीसाठी वेगळ्या सर्टीफिकेशनची गरजच लागत नाही.लोक मग अशा वस्तू वाटेल त्या चढ्या भावानेही घेतात. बरेचदा गरज नसतानाही घेतात.मग ती पारंपरिक चिनी औषधं असोत,सौंदर्यप्रसाधनं असोत,सिल्कच्या रजया असोत,जेडच्या महागड्या वस्तू असोत नाहीतर मोत्यांचे दागिने असोत.पर्ल फ़ॅक्टरीमधे तुम्हाला टॅन्कमधून कोणताही शिंपला उचलायला सांगतात.मग तो तुम्हीच फोडायचा आणि त्यात मोती मिळाला तर तो तुमचा.मात्र तो अंगठीत किंवा पेन्डन्टमधे सेट तिथेच करवून घ्यायचा.शिंपल्यामधे कधी कधी अनोख्या गुलाबी नाहीतर राखाडी काळ्या छटेतलेही जे मोती मिळतात ते दिसतात मात्र अत्यंत विलोभनीय.अंगठीत सेट करुन घ्यायचा मोह नाहीच आवरत.तुमच्या शिंपल्यात मोती नाही मिळाल तरी नाराज व्हायचं कारण नसतं.तिथे तयार दागिने किंवा मोतीही मिळतात.शिवाय त्या मोत्यांचं चूर्ण घातलेली तुमच्या त्वचेचं तारुण्य टिकवणारी,खुलवणारी क्रीम्सही मिळतात.
सौंदर्य,ऐषोआराम,आरोग्य,प्राचीनता,फ़ॅशन्स,आधुनिकता..प्रत्येक गोष्टींच्या फॅक्टर्‍या चीनमधे आहेत.
चीनी फ़ॅक्टर्‍यांचा कारभार किंवा एकंदरीतच चीनमधल्या औद्योगिक विभागांचा पसारा बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो हे मात्र नक्की.या फॅक्टर्‍यांचा पसारा आणि उलाढाल इतकी प्रचंड असते.
सुजौ जवळच्या टेक्स्टाईल विभागात तिथल्या सेझमधे एकेका लहान विभागात१५दशलक्ष बटणं,२००मिल्यन मिटर्सच्या झिपर्स,३ बिलियन मोज्यांच्या जोड्या असे उत्पादनांचे आकडे तिथल्या बोर्डांवर वाचल्यावर हा काय अफ़ाट पसारा असू शकतो याचा अंदाज येतो.
होंगियानजवळच्या एका दुसर्‍या औद्योगिक शहरात वू लिनची लाईफ़स्टाईल प्रॉडक्ट्सची फ़ॅक्टरी आम्ही बघायला गेलो होतो.चहा-कॉफ़ीच्या कपांपासून,टोस्टर्स,कृत्रिम,शोभेची फ़ुलं,कीचेन्सपासून घरगुती सजावटीच्या वस्तू ज्या नंतर वॉलमार्ट किंवा इकेआमधे’मेड इन चायना’लेबलांना मिरवत विराजमान होतात त्याचं उत्पादन तिथे अजस्त्र प्रमाणात होत असताना बघितलं.शब्दांमधे ते वर्णनच करता येणार नाही.
आणि मग आम्ही यीवूच्या होलसेल मार्केटलाही भेट दिली.फ़ॉरबिडन पॅलेस किंवा शिआच्या टेराकोटा आर्मीला पाहून जितकं आश्चर्य वाटलं त्यापेक्षा हजारो पटींनी जास्त आश्चर्य यिवूला आल्यावर,तिथली ती अजस्त्र उलाढाल पाहून वाटलं.यीवू इंटरनॅशनल ट्रेड सिटी म्हणजे जगातलं सर्वात मोठं होलसेल मार्केट.२.६मिलियन स्क्वे.फ़ुटांइतक्या प्रचंड विस्तारावर पन्नास हजार स्टॉल्स आहेत आणि तिथे चार लाख विविध प्रकारच्या वस्तूंची उलाढाल होते.अक्षरश:कोणत्याही प्रकारच्या वस्तू आख्ख्या चीनमधे बनून इथे येतात आणि इथून मोठमोठ्या कंटेनर्समधे त्या भरुन जगभर विक्रीकरता रवाना होतात.आफ़्रिकन आर्टचे नमुने असोत की गणपतीच्या,कृष्णाच्या झळझळीत निळ्या रंगातल्या मुर्ती सगळ्या इथे दिसतात. मोठे मेगामॉल एकापुढे एक बांधल्यासारखं हे मार्केट आहे.त्यांचे वेगवेगळे विभाग.म्हणजे एक आख्ख मॉलच.उदाहरणार्थ हार्डवेअर टूल्स आणि फ़िटिंग्जचं एक मॉल,दुसरं पतंग,फ़ुगे,हॅन्गिन्ग टॉईज वगैरेचं,तिसरं घरगुती सजावटीच्या वस्तुंच,एक भलंमोठं मॉल तर फ़क्त ख्रिसमससाठी लागणार्‍या सजावटीच्या वस्तुंचं होतं आणि तिथे सगळीकडे सॅन्टाच सॅन्टा.जगातल्या७०% ख्रिसमसच्या वस्तू इथून जातात.
यीवूला भारतीय व्यापार्‍यांची खूप गर्दी होती.आम्हाला तिथल्या कॅफ़ेटेरियामधे भेटलेल्या महेन्द्रचा मुंबईला क्रॉफ़र्ड मार्केटमधे होलसेल वस्तू पुरवण्याचा व्यवसाय आहे.त्याचं स्वतःच एक दुकानही तिथे आहे.महेन्द्रच्या यीवूला वर्षातून चार खेपा होतात.प्रत्येकवेळी तो एक कंटेनर भरुन गार्मेन्ट ऍक्सेसरीज इथून घेऊन जातो.शोभेची बटणं,लेस,वगैरे.इथल्या वस्तू त्याला तीनपट जास्त भावाने(तेही होलसेलमधला भाव म्हणून.आपण वस्तू विकत घेतो तेव्हा दहापट अधिक किंमत मोजतो)क्रॉफ़र्ड मार्केटमधे विकता येतात.महेन्द्रच्या मते इथे वस्तू स्वस्त तर मिळतात पण हेच फक्त कारण नाही.इथे एकेका वस्तूंमधे प्रचंड व्हरायटी बघायला मिळू शकते हे मुख्य आकर्षण.बटणाच्या एका पॅटर्नचे दहा हजार वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात हे महेन्द्रचं बोलणं मला एरवी ऐकताना अतिशयोक्ती असलेलं वाटू शकलं असतं पण यीवू ट्रेडींग सेन्टरला भेट दिल्यावर नाही.लुशानचं इलेक्ट्रॉनिक मार्केटही असंच अजस्त्र विस्ताराचं आहे.
-----------------------------------------------------------
शेवटचे २ दिवस राहीले आणि आता वाटायला लागलं की अजून किती गोष्टी पाहून झाल्याच नाहीयेत.अजून किती ठिकाणी पुन्हा जाऊन यावसं वाटतय.
अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्सच्या खालीच असलेल्या युबिसी कॉफ़ी हाऊसमधे बसून गेल्या अडीच महिन्यांच्या चिनी दौर्‍याचा मनातल्या मनात आढावा घेताना खूप काही बघायचं राहून गेल्याही हुरहुर मनाला वाटतेय.
युबिसी कॉफ़ी हाऊसमधल्या हसर्‍या चीनी वेट्रेसेस माझ्या आता खूप ओळखीच्या झाल्या आहेत.
तिथे पिआनो वाजवणारी मुलगीही मी आले की आता लगेच भारतीय सुरावट छेडते.भारतीय सुरावट म्हणजे तिच्यामते करण जोहरच्या फिल्ममधली गाणी.पण मला चालतं.
मला नव्या नव्या व्हेज डिशेस सुचवायलाही तिथल्या मुलींना खूप आवडतं.तीळ लावलेले बनाना फ़्राय,व्हेज बार्बेक्यू स्टिक्स,फ़्रूट सॅन्डविच,व्हेज टोफ़ू स्टरफ़्राय आणि अप्रतिम चवीचा,अत्यंत देखणा दिसणारा काचेच्या मोठ्या किटलीतला फ़्रूट टी.त्यात मोसंबी,अननस,सफ़रचंद,किवी वगैरे फ़ळांचे तुकडे,मोगरा आणि इतर सुकवलेली फ़ुलं ठेवून वर लागेल तसं गरम पाणी ओतल्यावर तयार होणारं ते सुगंधी,केशरी रसायन चिमुकल्या देखण्या कपांतून थोडं थोडं पिताना स्वर्गीय चवीचा अनुभव येतो.
मी युबिसीमधे येऊन बसले आणि बाहेर पाऊस सुरु झाला.आपलं नाव स्टेला सांगणार्‍या गोड चिनी मुलीने एका मोठ्या बोलमधे गरम वाफ़ाळलेला पातळसर भात,त्यात मश्रूम्स,चायनीज कॅबेज,नूडल्स,ऍस्पेरेगस घालून समोर आणून ठेवला.बाजूला व्हेज सलाडची बशी.पिआनोवरच्या मुलीने उठून माझ्या शेजारी मासिकांचा गठ्ठा आणून ठेवला.मला त्या चिनी लिपीतल्या फ़ॅशन्स मॅगेझिन्सचा खरं तर काहीच उपयोग नाही पण मला तिचं मन मोडवत नाही.
मी काचेतून बाहेर पडणार्‍या पावसाकडे बघते.पावसांच्या सरींच्या पलीकडे समोरच्या फ़ुटपाथवरच्या दुकानांवरची मधूनच चमकून उठणारी लाल,सोनेरी देखणी चिनी अक्षरं मला नेहमीच बघायला आवडतात.त्यांचा अर्थ काय हे कळण्याची सुतराम शक्यता मला नाही.पण त्यांचं देखणं वळण मी पुन्हा पुन्हा पहात रहाते.ती पहाताना मला फ़ॉरबिडन सिटीमधली निळी,सोनेरी रंगसंगती आठवते आहे,बेजिंगच्या देखण्या प्राचीन हुटॉन्ग्ज आठवताहेत,तिथले गुलाबांचे वेल,मोगर्‍याच्या आणि क्रिसेन्थेममच्या कळ्यांचा तिथल्या सिहुयानमधे प्यायलेला चहा आणि त्या चहाचे चिमुकले निळे कप आठवताहेत,पोर्सेलिनची भांडी, देखणी नाजूक चिनी कटलरी आठवते आहे,टेराकोटाच्या सैनिकांच्या चेहर्‍यावरचे भाव आठवताहेत,श्यूच्या घरच्या पीचचा जाम आणि तिच्या आईच्या हातच्या भाज्या आठवत आहेत,बेजिंगचा फूटमसाज आठवतो आहे,बेजिंग वॉलवर जाताना रोपवेचा आलेला खतरनाक अनुभव आठवतो आहे,चहाचे अजस्त्र वृक्ष,गाठाळलेल्या खोडांचा स्पर्श आठवतो आहे,यॉंगनिंग पार्कातली रंगित,नाचरी फ़ुलपाखरं,हांगझोचं विलोंच्या जाळ्यांतून दिसणारं तलावाचं पाचूसारखं चमकतं पाणी,मुटियान व्हिलेजमधला सुकवलेल्या फ़ळांचा बाजार,दाट झाडांनी व्यापलेले रस्ते,शांघायच्या स्कायस्क्रॅपर्स,यीवूची बाजारपेठ,फ़ुजियानमधला कोसळता पाऊस,बेजिंगमधले चिनी उत्साही मित्र,तिथलं बुकमॉल..
बाहेरचा पाऊस थांबला.मला घरी जाऊन पॅकिंग आवरतं घ्यायलाच हवं आहे.युबिसी कॉफ़ी शॉपमधल्या त्या सर्व हसर्‍या चिनी मुलींचा आणि माझी राहीलेली छत्री परत करायला मागून धावत येणार्‍या प्रामाणिक चिनी मॅनेजरचा एक प्रातिनिधीक निरोप घेऊन मी बाहेर पडते.
जाताना मी त्यांना सांगते की येईन परत पुन्हा.अजून बरंच बघायचं राहीलय माझं.