Tuesday, April 26, 2016

Smile, breathe and go slow.. नऊ

 घर आवरण्याची जपानी पद्धत -कोनमारी
जीवनशैलीसंदर्भात मिनिमलिझमची पाश्चात्त्य चळवळ अलीकडे सुरू  झालेली असली तरी एकंदरीत कला-संस्कृती आणि सामाजिक इतिहासात मिनिमलिस्ट या संकल्पनेची मुळं खोलवर गेलेली आहेत. विशेषत: जपानी, झेन संस्कृतीमधे या मुळांचा मागोवा घेता येतो. ‘मिनिमारिसुतो’ हा शब्द जपानी संस्कृतीचा जुना वारसा. आर्ट, डिझाइन, लिटरेचरच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा. पारंपरिक जपानी घरे मिनिमारिसुतो संकल्पनेला मध्यवर्ती ठेवूनच बांधण्यात आलेली, म्हणजे एक खोली अनेक कारणांकरता वापरणं इत्यादि. 
अर्थात मध्यमवर्गीय भारतीय संस्कृतीमधे गेल्या काही वर्षांमधे काटकसर, वस्तूंचा पुनर्वापर या संकल्पना जशा कालबाह्य झाल्या तशाच काही दशकांपूर्वी सर्वसाधारण जपानी कुटुंबांमधे ‘मिनिमारिसुतो’ अडगळीत गेला. जपानच्या नव्या पिढीला जास्तीत जास्त वस्तू खरेदी करण्याचे वेड लागले आणि घरात त्या साठवून ठेवायचेही. 
मात्र आता गेली काही वर्षे जपानमधे पुन्हा ’कमीत कमी वस्तू जवळ बाळगणे, अडगळमुक्त जीवनशैली, शून्य कचरा निर्मिती, अशा अर्थाने ’मिनिमारिसुतो’ संकल्पनेचे पुनरुज्जीवन झाले. जपानी माध्यमांमधून आता सातत्याने मिनिमारिसुतो जीवनशैलीवर कार्यक्रम होतात. ’अडगळीवाचून जगणे’ आनंदनिधानाकडे जाण्याचा मार्ग असल्याचे जपानी लोकांना पुन्हा पटवणे हा माध्यमांचा प्रमुख उद्देश आहे आणि तो हळूहळू यशस्वी होत आहे. 
लोकांच्या बदललेल्या दृष्टिकोनाला कारणीभूत ठरले आहे मारी कोन्दो या जपानी लेखिकेने २०१४ साली लिहिलेले ‘द लाइफचेन्जिन्ग मॅजिक ऑफ टायडिंग अप- द जापनिज आर्ट ऑफ डीक्लटरिंग अॅण्ड ऑर्गनायझिंग’ हे पुस्तक. अलीकडेच याच मालिकेतले दुसरे पुस्तक आले आहे- ‘स्पार्कजॉय’. 
मारी कोन्दोच्या या दोन्ही पुस्तकांच्या अॅमेझॉनवर वीस लाखांहून जास्त प्रती विकल्या गेल्या. आणि त्या जास्तीत जास्त जपानी लोकांनीच विकत घेतल्या आहेत. मारी कोन्दोच्या मते तिने आपल्या पुस्तकांमधून नवीन काहीच सांगितलेले नाही. फक्त ‘घर आवरण्याच्या’ पारंपरिक जपानी व्यवस्थेचे ज्याला ‘कोनमारी पद्धत’ असे नाव आहे तिचे पुनरुज्जीवन केले. 
घर आवरणे, नको असलेल्या वस्तू फेकून देणे, कपडे. वस्तू, पुस्तकांची व्यवस्था, घरातला मोकळा अवकाश जपून ठेवणे, अडगळ दूर करणे याकरता जपानमधे वापरली जाणारी पारंपरिक कोनमारी पद्धत मारी कोन्दोमुळे आता जगभरात प्रसिद्ध झाली आहे. घर आवरणे ही संकल्पना जपानमधल्या जुन्या घरांमधून पुष्परचना आणि पाककृतींप्रमाणो पिढय़ानपिढ्या जपलेली कला. मात्र अलीकडच्या अनेक वर्षांमधे जपानी विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातल्या लहान मुलांवर घर आवरण्याचे हे ‘कोनमारी’ संस्कारच झाले नसल्याने हळूहळू ती पद्धत विस्मरणात गेली, कालबाह्य झाली. 
जपानी मिनिमलिझम म्हणजे घराच्या मुख्य दिवाणखान्यात, लिव्हिंग रूममधे काहीही सामान नसणे. जास्तीत जास्त मोकळा अवकाश हे प्रमुख सूत्र. घरांमधे भिंती घालून वेगवेगळ्या खोल्यांमधे त्याचे विभाजन करणे म्हणजे मुक्त अवकाशाला प्रतिरोध असे मानले जाते. वीस-तीस वर्षांपूर्वी जपानी घरांमधे फक्त तातामी चटया अंथरलेल्या असत. त्यांच्यावरच बसणे, झोपणे, आरामात पसरणे सहज शक्य असे. मात्र आधुनिक, नव्या जपानी घरांमधे हार्डवुडची जमीन असते. त्यावर सोफा, खुर्च्या, रग्ज इत्यादिंशिवाय बसणे, झोपणे शक्य होत नसल्याने नव्या पिढीला केवळ तातामीचा वापर नव्याने करणो आव्हानात्मक वाटते. 
लेखिका मारी कोन्दो वयाच्या पाचव्या वर्षापासून जपानच्या पारंपरिक कोनमारी पद्धतीने घर आवरण्यात तरबेज झाली त्याचे कारण तिचे आजी आजोबा. मारी कोन्दोचे लहानसे घर अत्यंत सुंदर आणि टापटिपीचे म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. शेजारीपाजारी घर आवरण्याकरता मारी कोन्दोचा सल्ला ती अगदी लहान वयाची असल्यापासून घेत. घराच्या सौंदर्यरचनेपेक्षा घराची सुव्यवस्था राखणे जास्त महत्त्वाचे हे तिचे तत्त्व. कोन्दोच्या मते लोकांना योग्य प्रकारे घर आवरणे जमत नाही कारण त्यांना घरातली अडगळ काढून टाकणे जमत नाही. घरातल्या वस्तूंमधे त्यांची फार मोठी भावनिक गुंतवणूक असते. फोटो, पेनं, मासिके, पुस्तके, कात्रणे, कपडे, अंतर्वस्त्रे, मेकअपचे सामान, भांडी, काचवस्तू अशा किमान लाखभर वस्तू मारी कोन्दो कोणत्याही मध्यमवर्गीय घरातून बाहेर काढते. काही वेळा तर हा ’कचरा’ टनावारी असतो. 
लोकांच्या घरातल्या अतिरिक्त वस्तूंची अडगळ बाहेर काढून, अवजड फर्निचर काढून टाकून रुग्णालयात दाखल होण्याची वेळ अनेकदा तिच्यावर येते. 
एखादी फुलदाणीही घरातून बाहेर टाकायला नाखूश असणारे लोक मारी कोन्दोचं का ऐकतात?
मारी कोन्दोच्या मते ती लोकांना हे पटवून देऊ शकते की, या वस्तू तुमच्या घरात अडगळीत पडून राहिल्याने गुदमरतात, मृतावस्थेत जगत असतात, इतर कोणा गरजू व्यक्तीच्या घरी त्या ‘जिवंत’ राहू शकतात. थोडक्यात मारी कोन्दो अडगळीच्या वस्तूंना नवीन जीवन बहाल करते. लोकांच्या घरातून बाहेर काढलेल्या अडगळीला योग्य घरे मिळवून देण्याचे काम मारी कोन्दो वैयक्तिक जबाबदारीने करते. त्याकरता ती गराज सेल आयोजित करते. जुन्या बाजारांमधे खेपा घालते, चॅरिटी शो, प्रदर्शने भरवते. मात्र अगदीच तुटक्या वस्तू असल्याशिवाय ती कोणत्याही जुन्या अडगळीतल्या वस्तू डम्पिंग ग्राउंडवर टाकत नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने ते योग्य नाही असे ती मानते. 
निसर्गाशी एकात्मता साधायची तर अवकाश शक्य तितके मोकळे असायला हवे. मारी कोन्दो ‘घर कसे आवरायचे’ याचे प्रशिक्षण वर्गही घेते. तिच्या वर्गात नाव नोंदवायला तीन महिन्यांचा वेटिंग पिरीयड असतो! कोनमारी पद्धतीने घर आवरल्यावर ते पुन्हा कधीही विस्कटणार नाही, त्यात अनावश्यक वस्तू साठणारच नाहीत याची मारी कोन्दो हमी देते. 
कोणतीही अतिशयोक्ती न करता मारी कोन्दो ठामपणे सांगते की, घर आवरल्यावर त्या घरातल्या लोकांच्या आयुष्यातही नाटय़पूर्ण फरक पडलेला आहे. त्यांची अनेक वर्षे खोळंबलेली कामे पार पडतात, आयुष्यभर जपलेली स्वप्ने पूर्ण होतात, नोकरी-व्यवसायात यश मिळतं, नातेसंबंध सुधारतात, लोकांची आयुष्य जास्त आनंदपूर्ण बनतात. आणि  हे फक्त त्यांच्या आजूबाजूचा अवकाश मोकळा केल्याने शक्य होतं. घरातली कोंदट हवा मोकळी होऊन तिथे ताज्या, स्वच्छ हवेचा वावर होतो. अशा मोकळ्या, खुल्या, अडगळविरहित अवकाशात त्यांना विचार करायला, लक्ष केंद्रित करायला, नव्या कल्पना सुचायला वाव मिळतो. ते तणावमुक्त होतात. त्यांची कार्यशक्ती वाढते. घर आवरल्याने विस्कळीत विचारही आवरले जातात, भूतकाळ मागे टाकून वर्तमानावर लक्ष केंद्रित व्हायला मदत होते. आयुष्यात काय गरजेचे आहे, काय हवे, काय नको हे नीट कळायला लागते.
तिच्या मते नुसते घर कसे आवरायचे हे सांगितल्याने लोकांची आयुष्य नाटय़पूर्ण बदलत नाहीत. घर कसे आवरायचे हे फक्त एक तंत्र नसते. ती कला आहे. प्रत्येक वस्तूची एक जागा असते. तिथेच ती ठेवल्याने त्या वस्तूचा सन्मान होतो. वस्तू आवरून, योग्य जागी ठेवण्याची पद्धत तिने इतक्या सोप्या त-हेने विकसित केली आहे की घरातले सहा वर्षांचे मूलसुद्धा यात तरबेज होते. घर किंवा तुमची कामाची जागा तुम्ही स्वत: आवरली तरच ती नीट राहू शकते यावर तिचा विश्वास आहे. इतर कोणालाही, नोकर, एजन्सीजची माणसे यांच्याकडून हे काम करवून घेतले तर त्याचा उपयोग नाही. कारण ते पुन्हा पुन्हा विस्कळीत होत राहते, वस्तू साठून राहतात आणि यात तुमची प्रचंड ऊर्जा, वेळ, पैसा फुकट जात राहतो. ‘मी जन्मजात आळशी आहे’ किंवा ‘मला पसाराच आवडतो’, ‘मला वेळ मिळत नाही’ अशी विधाने ही स्वत:मधल्या कमतरतेवर पांघरूण घालणारी असतात, असे म्हणत मारी त्यांना काहीही महत्त्व देत नाही. 
पिढीजात पाककृती किंवा स्वयंपाकाची कौशल्ये जशी एका पिढीकडून दुस:या पिढीकडे हस्तांतरित होतात तसेच हे जपानी घर आवरण्याचे कोनमारी तंत्र. मात्र नव्या पिढीला आता ते अशा त-हेने शिकवावे लागते याची कोन्दोला खंत वाटते. 
‘स्पार्कजॉय’ या आपल्या दुस-या पुस्तकामधे तिने भर दिला झेन संकल्पनेवर. ही संकल्पना मुळातच साधेपणावर आधारित असल्याने मिनिमलिझमला त्यात खूपच महत्त्व आहे. जगण्याचा आनंद आणि मुक्तपणा हा साधेपणातून, नैसर्गिकपणातून येतो. याबद्दल अधिक माहिती पुढच्या लेखात.
(लेख लोकमत ’मंथन’ मधे पूर्वप्रकाशित झाला आहे.)

Smile, breathe and go slow.. आठ

मिनिमलिझम

अतिरिक्त खरेदी न करण्याच्या, अनावश्यक वस्तू न साठवण्याच्या आव्हानात रोजच्या जीवनातल्या अनेक गोष्टींचा त्याग असतो. ज्या एरवी निरुपद्रवी वाटलेल्या असतात, पण ज्यांचा अतिरेक कर्जाच्या खाईत लोटणारा ठरलेला असतो.
उदाहरणार्थ बाहेर जेवणावर पैसे न उधळणे, सिनेमा, बार्स, डिस्कोजवर खर्च न करणे, विकेण्ड्सना भटकंती करण्यात पेट्रोल न जाळणे इत्यादि.

आणि यात अनेक गोष्टींचा नव्याने स्वीकार असतो-
करमणुकीसाठी सर्वाकरता खुले असणारे कार्यक्रम पाहणे, सार्वजनिक वाहनाने प्रवास करणे, नवी पुस्तके विकत न घेता सार्वजनिक वाचनालयांमधून आणणे किंवा घरातली पुस्तके एकमेकांना वाचायला देणे अशा अनेक गोष्टी. काहीजण ट्रेन किंवा बसचं तिकीट न काढता सायकल किंवा पायी चालणं स्वीकारतात.
मित्रंनी किंवा जवळच्या कुटुंबीयांनीही त्यांचा खर्च उचलायचा नाही हे महत्त्वाचं.

एका साध्या, मिनिमलिस्ट जीवनशैलीकडे घेऊन जाणारी, सुरुवातीला खडतर वाटणारी ही वाट. प्रत्येकाची वेगळी.

मिनिमलिझम किंवा मिनिमलिस्ट जीवनशैलीचा स्वीकार म्हणजे कमीतकमी, अत्यावश्यक गरजेच्या, स्वत:ला महत्त्वाच्या वाटणा-या वस्तूंसोबत जगणे.

साधेपणाने जगण्याचे सूत्र सांगणा-या झेन तत्त्वज्ञानाबद्दल आस्था असणा-यांना मिनिमलिझमबद्दल वेगळे सांगायची आवश्यकता नाही. मिनिमलिस्ट जीवनशैलीचा प्रसार गेल्या दहा-बारा वर्षात इंटरनेट नियमाने वापरणा-या, उच्च मध्यमवर्गीय, यशस्वी करिअर जोपासणा-या, अतिरेकी खरेदी आणि उपभोगवादी जीवनशैलीच्या चक्र यात अडकलेल्या ३० ते ४५ वयोगटातल्या अमेरिकन तरुण-तरुणींमध्ये मोठय़ा प्रमाणावर झाला त्यामागचे ट्रिगर होते जोशुआ बेकरचा ‘द मिनिमलिस्ट’ ब्लॉग.

‘द मिनिमलिस्ट’ हा ब्लॉग लिहिणा-या व्हरमॉण्टच्या जोशुआ बेकरची गोष्ट सुरू झाली ती त्याने घरातला, गॅरेजमधला ओसंडून वाहणारा कचरा, वस्तूंची अडगळ साफकरायला काढण्याच्या दिवशी.
ड्राइव्ह वे वरचा प्रचंड मोठा ढिगारा पाहून जोशुआचा म्हातारा शेजारी त्याला सहज म्हणाला, “खरंच तुला या इतक्या गोष्टींची गरज होती का?”
या प्रश्नाचे उत्तर शोधताना जोशुआचे पुढचे आयुष्य बदलून गेलं.
आपल्या आयुष्यात या गोष्टींनी काहीही मौल्यवान भर घातलेली नाही, उलट अनेक मौल्यवान गोष्टी हिरावून घेतलेल्या आहेत असं त्याच्या लक्षात आलं. आणि मग जोशुआने नुसती अडगळच नाही, तर घरातल्या इतरही अनेक वस्तू डोनेट, सायकल करायला सुरुवात केली. कमीतकमी वस्तूंसोबत जगण्याची मिनिमलिस्ट जीवनशैली जोशुआने जगायला सुरुवात केली आणि मग त्यातून मिनिमलिस्ट ब्लॉगर्स चळवळ सुरू झाली.

‘मिनिमलिझम’ म्हणजे सर्वसंगपरित्याग नाही. आजच्या जगात वावरताना कोणत्याही व्यक्तीला असे नि:संगपणे जगता येणं प्रॅक्टिकली अशक्य आहे. रोजच्या जगण्याला अत्यावश्यक अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यांच्यासकट मिनिमलिस्ट जीवनशैली स्वीकारणे कितपत शक्य असते, असं अनेकांना वाटतं.

म्हणूनच जोशुआ बेकर आजच्या काळातल्या मिनिमलिझमची व्याख्या सोप्या शब्दांमधे करतो. ‘शंभरहून कमी गोष्टींसोबत जगणं’.
रोज ठरवून काही गोष्टी कमी केल्या, नवीन वस्तू आणण्यापेक्षा आहेत त्यांचाच नवा उपयोग शोधून काढला तर हे ध्येय बघता बघता साध्य होऊ शकतं.

घर-संसार व्यवस्थित सांभाळून, वस्तूंचा उपभोग घेऊनही मिनिमलिस्ट जीवनशैली जोपासता येतेच. फक्त त्या वस्तूंना, चैनीला स्वत:च्या आयुष्यात किती महत्त्व द्यायचे, हे प्रत्येकाने स्वत: ठरवणं. आपले आरोग्य, नातेसंबंध, छंद, व्यक्तिमत्त्वाची जोपासना, एक व्यक्ती म्हणून आपली होणारी वाढ यापेक्षा या वस्तू मोठय़ा आहेत का, याचा निर्णय घेणं.

माणूस हा भोवतालच्या पर्यावरणाचा, समाजाचा एक घटक आहे. आपलं आयुष्य जगताना त्यांचंही देणं आपण किती मानतो. फक्त स्वत:करता, स्वत:च्या कोशात गुरफटून घेत जगायचं की आजूबाजूच्या पर्यावरणाचा एक भाग होऊन जगायचं याचा निर्णय घेणं.

आलिशान घर, कार हवीशी वाटते आहे? खुशाल जा आणि खरेदी करा. कुटुंबाकरता चैनीच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत? जा आणि आणा.
करिअरच्या मागे धावायचं आहे? तसं करा.
या गोष्टी तुम्हाला प्राधान्यक्रमाने गरजेच्या वाटत असतील तर नक्कीच करा.
मात्र जाणीवपूर्वक, स्वत: विचार करून या गोष्टींचा तुमच्या आयुष्यातला प्राधान्यक्रम ठरवा.
ग्राहक-संस्कृती, जाहिराती यांच्या मा-याखाली दबून जाऊन स्वत:ची विचारशक्ती हरवून, आपल्या आयुष्यातल्या सर्वात आनंद देणा-या इतर गोष्टींना डावलून हे करू नका,
इतकं साधं मिनिमलिस्ट जीवनशैलीचं सूत्र.

जोशुआ बेकर आपल्या ‘द मिनिमलिस्ट’ ब्लॉगद्वारा हे सूत्र आपल्या किंवा आपल्या मित्रंच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या अनुभवांद्वारे मांडत जातो. जोशुआच्या ब्लॉगला अनेकांनी आपल्या स्वत:च्या अनुभवांच्या कडय़ा जोडून मिनिमलिझमची शृंखला बनवली आहे.
जगताना आपले अनुभव, अडचणी, आनंद, सगळं काही शद्बबद्ध करायचं ही एक महत्त्वाची, कदाचित एकमेव अशी अट आहे जोशुआने घातलेली. इतरांना आपल्या अनुभवातून प्रेरित करण्याकरता, शृंखला जोडली जाण्याकरता हे गरजेचं.

मिनिमलिस्ट जीवनशैली यशस्वीपणो जगणारे अनेकजण या ब्लॉग शृंखलेमधे वाचायला मिळतात.
लिओ बबैता आपली पत्नी आणि सहा मुलांसहित आनंदाने मिनिमलिस्ट आयुष्य जगतो. सहा मुलांपैकी तीन त्याने दत्तक घेतलेली आहेत.
जोशुआ बेकरचं उत्तम करिअर आहे. उपनगरात प्रेमळ कुटुंबासोबत तो राहतो. कारही वापरतो.
कॉलिन राईटजवळ आता फक्त 51 वस्तू आहेत, त्यांच्यासोबत तिची जगभरात भटकंती चालते. त्या कमी करून ३० वर आणायचं तिचं ध्येय आहे. कॉलिन आपल्या या भटकंतीवर आधारित पुस्तकं, लेख लिहिते आणि पैसे कमावते. आणि मग पुन्हा नव्या भटकंतीवर निघते.
टॅमी स्ट्रोबेल आपल्या नव-यासोबत एका अगदी चिमुकल्या घरात राहते. ती कार वापरत नाही.
हे सगळे म्हटलं तर वेगवेगळ्या त-हेचं आयुष्य जगतात, पण जगताना मिनिमलिझमचं तत्त्व जोपासतात. गरजेच्या नाहीत त्या वस्तू घेत नाहीत. साठवत नाहीत आणि पर्यावरणाचं, नैसर्गिक स्रोतांचं जमेल तेवढं रक्षण करण्याचं ब्रीद जपतात.
जोशुआ यालाच आयुष्यावरचा भार कमी करणे, जाडजूड टरफल काढून टाकून आतला मौल्यवान गाभा जपणो म्हणतो. हा गाभा म्हणजे जगण्यातला आनंद, समाधान आणि पर्याय निवडीचे स्वातंत्र्य.

मिनिमलिझममुळे जगणं कंटाळवाणं, एकसुरी होत नाही का, असा अनेकांच्या मनात येणारा प्रश्न.
जोशुआच्या मते, मुळातच रोजच्या जगण्यातला अतिरिक्ततेचा, हव्यासाचा, उपभोगाचा, अडगळीचा रेटा ज्यांना नकोसा झाला आहे, ज्यांना तो दूर करून जगण्याच्या निखळ आनंदावर लक्ष केंद्रित करायचं आहे, जगण्यातून गडबड, कोलाहल काढून टाकायची आहे त्यांच्याकरताच ही जीवनशैली असल्याने या प्रश्नांचे वेगळे काही उत्तर संभवतच नाही.
मिनिमलिझमचा अर्थ काहीजणांकरता स्वच्छता, टापटीप असू शकतो.
काहीजणांकरता ताणविरहित आयुष्य.
मिनिमलिझमच्या अंतिम स्थानार्पयत पोहचण्याकरता प्रत्येकाचा मार्गही वेगळा.
मात्र असे जगणे केव्हाही जास्त शाश्वत आणि निरामय, आरोग्यपूर्ण असते याबाबत मात्र सर्वाचेच एकमत.

मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे एखाद्या संन्यासी, फकिरासारखं नि:संग जगणे नाही. अर्थात ज्यांना तसं जगायचं आहे त्यांना त्यातही आनंदच मिळत असतो. पण मिनिमलिझमचा तो हेतू नाही. यात फक्त जगण्यातला महत्त्वाचा, मौल्यवान गाभा मिळावा म्हणून भोवतालची अडगळ दूर करणो अभिप्रेत आहे.

घरामधे, आयुष्यामधे आनंद सामावायला जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देणे हा मुख्य हेतू. ही अडगळ नेमकी कोणती हे प्रत्येकाने ठरवायचे.

मिनिमलिझम हे कोणतंही आधुनिक फॅड नाही. त्याकरता कोणत्याही गोष्टींचा ‘त्याग’ करणे, कोणत्याही बंधनांमध्ये अडकवून घेणं अपेक्षित नाही. ही फक्त एक पर्यायी जीवनशैली आहे. करिअरच्या मागे धावत राहूनही ती जोपासता येते आणि मनात आलं तर पाठीवर संसार लादून जगभरात कुठेही, कधीही भटकंती करत जाता येऊ शकेल इतका सोपेपणा जगण्यात अपेक्षित असणा-यांनाही ती स्वीकारता येते.

मिनिमलिस्ट जीवनशैली जगताना काही जणांना स्वत:चं घर. कार, टीव्हीसेट या गोष्टी आवश्यक वाटू शकतात, तर काही जणांना अनावश्यक. म्हणूनच काय टाकायचे किंवा काय स्वीकारायचे याचा कोणताही उल्लेख जोशुआ मिनिमलिझमच्या आपल्या व्याख्येत करत नाही. त्याच्या मते मुळात स्वत:हून या जीवनशैलीकडे वळलेल्यांना अशा गोष्टींचं महत्त्व आपोआपच एका टप्प्यावर वाटेनासं होतं.
मात्र तो टप्पा प्रत्येकाने आपापला ठरवायला हवा. जगताना मुक्तपणा, मोकळेपणा जाणवायला हवा हे मिनिमलिस्ट जीवनशैलीचं मुख्य सूत्र.
कसलीही भीती, असुरक्षितता, स्पर्धा, काळज्या, तणाव यांपासून मुक्ती, अपराधभाव, नैराश्य जोपासणा-या ग्राहकसंस्कृतीच्या चंगळवादी जाळ्यात अडकून राहण्यापासून मिळालेली मुक्ती.

(लेख लोकमत ’मंथन’ मधे पूर्वप्रकाशित)

Smile, breathe and go slow.. सात

बिनपैशाचं सुख

कोणतीही चळवळ सुरू व्हायला निमित्त लहानसेच झालेले असते. एखाद्याच्या आयुष्यातली लहानशी घटना त्याला काहीतरी करायला कारणीभूत ठरते आणि मग अनेकांना त्यात आपले प्रतिबिंब दिसायला लागते.
अनेकदा या चळवळी उभ्या राहतात एखाद्या नको इतक्या प्रमाणात प्रसारित झालेल्या गोष्टीच्या विरोधात, काउन्टर इफेक्टच्या स्वरूपात.
जशी अमेरिकेतल्या ‘खरेदी करा, करत राहा. कर्ज काढा, पण खरेदी करा.’ या वावटळीच्या विरोधात उभी राहिलेली ‘खरेदी करू नका’ चळवळ.
जीवनावश्यक सोडून इतर कोणत्याही वस्तू विकतच घ्यायच्या नाहीत ही चळवळ फार जुनी नाही. इंटरनेटवरच्या ब्लॉगजगतात फार तर गेल्या चार-पाच वर्षांमध्ये मूळ धरलेली आणि वेगाने फोफावत गेलेली ही चळवळ. त्याला पुढे अनेक शाखा, उपशाखा फुटल्या. बाय नथिंग चॅलेंज, लिव्हिंग ऑन अ बजेट हे या चळवळीचेच भाग.

2008-09 च्या सुमारास वैयक्तिक पातळीवर हे प्रयोग सुरू झाले. अमेरिकेतल्या आर्थिक मंदीचा हा काळ.
न चुकवता आलेल्या वैयक्तिक कर्जांच्या, क्रेडिट कार्डावरच्या थकबाकीच्या ओझ्याखाली अडकलेले अनेक होते. यांच्यापैकी काहींनी नाइलाजास्तव आलेल्या शहाणपणापोटी का होईना, कर्जफेडीच्या जाळ्यातून बाहेर येण्याकरता काहीही खरेदी न करण्याचे चॅलेंज उचलले. काहींनी वर्षभराकरता, काहींनी फक्त सणासुदींच्या महिन्यांपुरते, काहींनी अक्षरश: डीटॉक्स डायेट असावे तसे खरेदीचे रक्तात भिनलेले विष उतरवायला सुरुवात केली.
24 तास तरी काहीही विकत घ्यायचे नाही, ही सुरुवात. मग थोडे जमू लागल्यावर एक आठवडा, एक महिना आणि मग एक वर्ष ‘बाय नथिंग’चे व्रत अंगीकारले. आता त्यांच्याकरता हीच जीवनशैली बनलेली आहे.

- मग सुरू झाली या वाटेवरले अनुभव शेअर करण्याची धडपड!

किती यश मिळते, काय अडचणी येतात, भरमसाठ खरेदीच्या जन्मजात मोहावर मात करण्याचे प्रयत्न नेटाने कसे निभवायचे, होणारे फायदे, घरच्यांचा, मित्र-मैत्रिणींचा त्याला लागणारा हातभार. असे सगळे मग ब्लॉग्जमधून लिहिले जाऊ लागले. आपल्यावरच्या कर्जाचे ओझे, आपली गेल्या काही वर्षांतली खरेदीची, क्रेडिट कार्डाची बिले, ढासळलेल्या आर्थिक नियोजनाचे आकडे हे सगळे सगळे खरेखुरे जाहीर होऊ लागले.

दारूचे व्यसन सोडण्याच्या प्रयत्नात जे टप्पे सामोरे येतात ते सगळे या खरेदीच्या व्यसनाला सोडवतानाही येत असतात आणि त्यामुळे यातही आप्त सुहृदांची साथ, त्यांच्यासोबतचे शेअरिंग मदतीला येते, असा त्यांना अनुभव अनेकांना येत गेला. तो सातत्याने लिहिला जाऊ लागला.

बघताबघता असे अनेक वैयक्तिक ब्लॉग्ज शृंखलेत गुंफले गेले आणि त्यातून ‘मिनिमलिस्ट’ चळवळ उभी राहिली, जिचे आज सोशल मीडियावर हजारो, लाखो सदस्य आहेत.

कॅनडाच्या केट फ्लाण्डर्सचा ‘ब्लॉण्ड ऑन अ बजेट’ हा ब्लॉग अशापैकीच एक. तिच्यासोबत कॅनडाची मिशेल मॅग्रा, यूकेची कॅथ केली, द मिनिमलिस्ट ब्लॉग लिहिणारा जोशुआ बेकर हे या चळवळीतले सध्याचे बिनीचे ऑनलाईन शिलेदार आहेत.
प्रत्येकाचे या जीवनशैलीकडे वळण्याचे कारण वेगळे असले, तरी त्यातून त्यांनी जे साध्य केले त्यात मात्र विलक्षण सारखेपणा आहे.

कॅनडाच्या केट फ्लाण्डर्सने आपल्या पहिल्या जॉबच्या पहिल्या सहा महिन्यांत स्वत:साठी अपार्टमेंट खरेदी केले आणि ते सजवण्याकरता जी खरेदी सुरू केली तिला अंत नव्हता. फर्निचर, होम डेकॉर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. यातल्या कित्येक गोष्ती तिच्याकडे आधीपासून होत्या, तरी नाविन्याच्या हौसेपायी ती भारंभार खरेदी करत सुटली. लॅपटॉप, कार, म्युङिाक सिस्टीम, इ-रीडर अशा अनेक गोष्टी.. तिच्याकडे होत्या, तरी तिने नव्या घेतल्या.
आपले नवेकोरे घर आयकियाच्या कॅटलॉगसारखे किंवा कोणत्याही इंटेरियर डिझाइनच्या ऑफिसमध्ये लावलेल्या चित्रसारखे देखणो दिसते  याचा तिला विलक्षण आनंद झाला!

- या आनंदाची धुंदी लवकरच उतरली.
तिच्या क्रेडिट कार्डाची बिले आल्यावर!

वरून लागणारा दंड टाळण्यासाठी जेवढी‘मिनिमम अमाउंट’ भरावी लागते, तेवढेच पैसे केटकडे शिल्लक होते.
..मग हा सिलसिला पुढचे सहा महिने चालू राहिला. त्यात अल्कोहोल, कॉफी, बाहेरून मागवलेल्या खाण्याची बिले, मित्र-मैत्रिणींवर बार-पबमधे उधळलेल्या पैशांची भर पडतच होती.

त्या दिवसांची आठवण काढताना केट आपल्या ब्लॉगवर लिहिते, ‘या पूर्ण काळात मी सतत दु:खी असल्याची भावना मनात होती. करत असलेल्या खरेद्यांची बिले सतत माझ्या नजरेसमोर नाचायची आणि तरीही मला स्वत:ला थांबवता येत नव्हते. शेवटी घरासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरता न आल्यामुळे घर गेले, घरातले सामान गराज सेलमधे विकावे लागले.’

- या कठीण काळातून जात असताना केटला  कॉफीचे व्यसन लागले. एकदा फक्त टेकअवे कॉफीचे बिल चारशे डॉलर्स आणि सुपर मार्केटमधल्या अवांतर खरेदीचे बिल  हजार डॉलर्स झालेले तिने पाहिले आणि ती उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली!

तिने ठरवले, की आता यातून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही.

काटेकोर बजेट आखून त्यातच सारे बसवायचे आणि लवकरात लवकर कजर्मुक्त व्हायचे असे ठरवून केटने त्याच रात्री ब्लॉग लिहायला घेतला:‘ब्लॉण्ड ऑन अ बजेट’

बघताबघता तिचे हे प्रांजळ अनुभवकथन जगभरात नावजले जाऊ लागले. केटच्या नावेत बसणारे अनेक जण होते. या वाचकांच्या सहकार्याने तिने जीवनावश्यक गोष्टींकरता एक ठरावीक बजेट तयार केले. त्यात दिवसाला एक डॉलरपेक्षा जास्त खर्च करायची मुभा नव्हती.

या बजेटचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केट करत होती. पण एका रात्रीत बदल घडत नाही. त्यामुळे सुरुवातीला तिने केलेले  ‘पण’ बरगळले, शिक्षा म्हणून उपाशी राहायचीही वेळ आली, पण हळूहळू जमत गेले.

आज पाच वर्षांनी केट संपूर्ण मिनिमलिस्ट जीवनशैली जगते आहे. केवळ एका कारमध्ये मावेल इतकेच सामान तिच्याकडे आहे. तीन वर्षांत केटने  संपूर्ण कर्ज फेडले, त्यानंतर ती जगभरात बॅक पॅकिंग करत फिरून येऊ शकली. तिचे आरोग्य सुधारले. कमीतकमी खाणे, कमीतकमी वस्तू वापरणे आणि जास्तीतजास्त जगण्याचा आनंद मिळवणे आज केटचे जीवनसूत्र बनले आहे.

एकेकाळी शॉपिंग केल्याशिवाय एक दिवसही काढू न शकणारी, कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेली केट सध्या
1 दोन वर्षे काहीही खरेदी न करण्याच्या ’डाएट’वर आहे.
2 तिच्याजवळ कपड्यांचे फक्त २८ जोड आहेत. त्यातले ९ रोजच्या वापरासाठी
3 एक कपडा फाटला/हरवला तरच दुसरा घ्यायचा असा नियम आहे.
4 रोज दोन तासापेक्षा जास्त वेळ फोनवर/सोशल मीडियावर खर्च करायचा नाही, अशा रेशनिंगवर आहे.

- आणि कधी नव्हती एवढ्या आनंदात आहे.

(लेख लोकमत ’मंथन’ मधे पूर्वप्रकाशित)

Smile, breathe and go slow.. सहा

 डम्पस्टर प्रोजेक्ट

जेफ़ विल्सन, अमेरिकेतील ह्यूस्टन, टीलॉट्सन युनिव्हर्सिटीचे डीन. आता त्यांच्या शहरात म्हणजे ऑस्टीन, टेक्सास येथे विल्सनना प्रोफ़ेसर डम्पस्टर अशी नवी ओळख मिळाली आहे. कारण विल्सनचे सध्याचे वास्तव्य एका ३६ स्क्वेअर फ़ूट आकाराच्या डम्पस्टर म्हणजेच एका पत्र्याच्या कचराकुंडीमधे आहे.
अर्थातच या कचराकुंडीत ’घराला’ साजासे शक्य तितके सर्व बदल विल्सनने केलेले आहेत.

विल्सनचे घर झालेली ही पत्र्याची कचराकुंडी त्याच्या युनिव्हर्सिटीच्या आवारात आहे. तिथे रहाण्याकरता त्याने युनिव्हर्सिटीची परवानगीही मिळवली.

प्रोफ़ेसर डम्पस्टर ही विल्सनची ओळख आता त्याच्या शहरापुरतीच किंवा अमेरिकेपुरती मर्यादित नाही. डम्प्सटरमधे रहाण्याच्या त्याच्या या प्रयोगाची दखल जगभरातल्या पर्यावरणप्रेमींनी, समाजशास्त्रद्न्यांनी घेतलेली आहे.
द डम्प्स्टर प्रोजेक्ट या नावाने ओळखला जाणारा विल्सनचा हा प्रयोग नेमका आहे तरी काय?

विल्सन काही वर्षांपूर्वीपर्यंत अडीच हजार स्क्वेअर फ़ूटाच्या घरात सुखाने रहायचा, मग त्याच्या डोक्यात हे ३६ स्क्वेअर फ़ूट जागेमधे रहायचे खूळ, आपली संपूर्ण जीवनशैली बदलण्याचा विचार मुळात का आले?

निमित्त झाले विल्सनच्या घटस्फ़ोटाचे. त्याच्या तोवर सुरळीत चाललेल्या आयुष्याला या घटस्फ़ोटामुळे खिळ पडली. विरक्तीचा झटका आला म्हणा किंवा नव्याने मुक्त, बॅचलर लाईफ़ जगण्याची मिळालेली संधी म्हणूनही विल्सनने आपला मुक्काम पाचशे चौरस फ़ुटाच्या घरात हलवला. आणि मग या लहानशा घरामधे जागा नाही म्हणून त्याने आपले जास्तीचे कपडे, फ़र्निचर इत्यादी फ़ेसबुकवर अगदी तात्पुरती रक्कम घेऊन विकायला सुरुवात केली.
याच सुमारास माणसाला रोजच्या जगण्याकरता नक्की काय लागत असतं हा विचार त्याच्या मनात येत राहिला.

विल्सन पर्यावरण शास्त्राचा प्रोफ़ेसर. वातावरणातील बदल, वैश्विक आरोग्य व कल्याण हे त्याच्या विशेष आवडीचे विषय. आपण पर्यावरण विषयक, कार्बन फ़ूटप्रिन्ट्सबद्दल, हवामानातील बदलाबद्दल विद्यार्थ्यांशी इतकं बोलतो पण कोणत्याही प्रत्यक्ष प्रयोगाशिवाय हे विचार त्यांच्यामधे झिरपणार नाहीत याची त्याला जाणीव होत होती.
पर्यावरणातील बदलांचे दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम मुलांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला हवे असतील तर प्रोफ़ेसर या नात्याने हे प्रयोग आधी स्वत:वर करुन पहायचे त्याने ठरवले.

या सर्व वैचारिक घडामोडीचा परिणाम म्हणजे ३६ चौ.फ़ूट आकाराच्या पत्र्याच्या कचराकुंडीला आपले घर करण्याच्या प्रयोगाची सुरुवात. ४ फ़ेब्रु.२०१४ ते ४ फ़ेब्रु.२०१५ या वर्षभराच्या कालावधीत विल्सन या घरामधे राहिला.

आपली ही कल्पना प्रत्यक्षात येत असताना विल्सन सतत आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे मित्र, नातेवाईक, युनिवर्सिटीमधले विद्यार्थी, इतर अध्यापक यांच्या संपर्कात होता.

सुरुवातीला डोक्यावर फ़क्त टार्पोलिनचे छत होते, पावसाचे पाणी, सूर्याच्या झळा सारख्याच तीव्रतेने घरात दाखल व्हायच्या.
त्यानंतर मग विल्सनने ही कचराकुंडी रहायला योग्य करण्याकरता तिच्यात काय सोयी असाव्या असा प्रश्न मधे ट्विटरवर विचारला.
जवळपास सगळ्यांनी या घरात सर्वाधिक आवश्यकता एअर कंडिशनिंगची असल्याचे मत व्यक्त केले. ऑस्टीनच्या तीव्र उन्हाळ्यात दिवसा १३० डिग्री फ़ॅरनहाईट इतकं तापमान होतं. रात्रीही ते ८० च्या खाली उतरत नसे. अशा परिस्थितीत पुढचे सहा महिने या पत्र्याच्या घरात रहाणे म्हणजे तप्त भट्टीत रहाणे ठरले असते. त्यामुळे मग सर्वात पहिली सोय मध्यम आकाराच्या ए.सी.ची. या घराकरता करण्यात आली.

मात्र विल्सनने त्याचा वापर अगदी गरजेपुरताच मर्यादित ठेवला. त्याकरता अनेक प्रयोग केले.
त्याच्या असं लक्षात आलं कितीही तीव्र उनहळ्यात रात्री ११ च्या पुढे झोपलं तर ए.सी. न लावताही चांगली झोप लागते.

विल्सनकडे आता दोन जोडी पॅंट्स, दोन जोडी शर्ट, बुटांचे तीन जोड, तीन हॅट्स आणि आवड म्हणून ८ ते १० बो टाईज इतकेच कपडे. एका लहानशा पेटीत ते मावतात. ही पेटी त्याने आपल्या बेडखाली सरकवून ठेवलेली आहे. तिथेच तो त्याच्या स्वयंपाकाचे सामान ठेवतो. कॅम्पिंगवर जेवण बनवायला लागते तितकेच साहित्य आणि एक स्टोव. साठवलेल्या कमीतकमी पाण्यामधे दैनंदिन व्यवहार उरकणे वाटते तितके कठीण नाही याचा त्याला अनुभव आला.
दिवसा अतिशय गरम होत असे त्या पत्र्याच्या घरात तेव्हा विल्सन आपलं ऑफ़िस बाहेर मोकळ्यावर थाटून काम करायचा. पुढे स्प्रिन्ग आला तेव्हा हवा आल्हाददायक झाली.
मग पुन्हा उन्हाळा आला.
विल्सनच्या मते हवामानातल्या बदलांना आपल्या शरिराचे नैसर्गिक अनुकूलन कसे होते, शरिर वातावरणातील बदलांना कसा प्रतिसाद देते, आपल्या शारिरीक सवयी किती लवचिक आहेत हे आजमावण्याची ही संधी त्याला पहिल्यांदाच मिळाली.

अजून एक फ़ायदा होता तो म्हणजे उन्हाळ्यात त्याला जेव्हा आपल्या पत्र्याच्या खोपटात रहाणं असह्य व्हायचं तेव्हा विल्सन आजूबाजूच्या वस्त्यांमधे पायी भटकायला जायचा. सार्वजनिक बागा, लायब्र-या त्याने पालथ्या घातल्या. विल्सनच्या मते पूर्व ऑस्टीनचा हा भाग जिथे त्याने आयुष्याची इतकी वर्षं काढली तो कधी नीट पाहिलाही नव्हता. तिथल्या स्थानिक लोकांना तो कधीही भेटलो नव्हता. आता हा सगळा परिसर त्याला त्याच्या घराचे अंगण आहे, आपल्या घराचा विस्तार तिथवर आहे असं विल्सन वाटतं.

या घरात रहाताना आजूबाजूच्या परिसरातून आपण दैनंदिन आयुष्यातल्या नेमक्या किती गरजा भागवू शकतो हा विचार सतत त्याच्या मनात होता.

ज्या गोष्टींकरता सामाजिक सोयी वापरता येणे शक्य आहे त्या वापरायच्या, त्याकरता घराची जागा वापरायची नाही हा त्याचा कटाक्ष. उदा. सार्वजनिक कपडे धुण्याच्या जागा, शॉवर, टॉयलेटकरता सार्वजनिक स्वच्छता गृहे. अशा जागी, तसेच बागा, वाचनालये, कम्युनिटी सेंटर्स इथे भेटणारी लोकं जितकं बौद्धिक मनोरंजन करु शकतात त्याच्या दहा टक्केही घरातल्या लार्ज फ़्लॅट स्क्रीन टीव्हीवरच्या कार्यक्रमांमधून मिळत नाही असा विल्सनचा अनुभव. मोठ्या आलिशान घरात स्वत:ला अडकवून घेतल्यामुळे आपण अशा अनेक जास्त चांगल्या पर्यायांवर काट मारतो.

या घरात रहात असताना अनेक जाणारे येणारे कुतूहलाने बघायला थांबत. विल्सन प्रत्येकवेळी त्यांच्याशी आपला उद्देश, फ़ायदे यावर सविस्तर गप्पा करी. पर्यावरणाचे जतन या द्वारे नेमके कसे होते आहे हे समजावून सांगे. त्याच्या या प्रयोगामधे शैक्षणिक उद्देश सर्वात जास्त महत्वाचा होता.

विल्सन पर्यावरण बदल, जागतिक आरोग्य, पर्यावरण विद्न्यान यावर व्याख्याने देत असे. आपल्या इतक्या वर्षांच्या भाषणबाजीमधून जे साधले गेले नाही ते या अनौपचारिक गप्पांमधून जास्त परिणामकारकरित्या पोचले असे त्याला वाटते.
काही वेळा विद्यार्थी, आसपासची लोकं यांच्याकरता तो आकाशातले तारे बघण्याचा खेळ खेळे. लोक मग तिथेच बाहेर पथारी पसरुन झोपत.

विल्सन यांच्या या प्रयोगाकडे स्थानिक विचारवंत, अभ्यासक आणि सामान्य माणसे गांभिर्यपूर्वक पाहिले. स्थानिक माध्यमिक, प्राथमिक शाळांमधले विद्यार्थी, युनिव्हर्सिटीमधले तरुण गटा गटाने हा प्रयोग पहायला येतात. शैक्षणिक संस्थांमधे या अनुभवावर आधारित विल्सनची व्याख्याने आयोजित केली जातात.

विल्सनच्या हा कचराकुंडीच्या आकाराच्या घरात रहाणे इत्यादी अनेकांना सेन्सेशलिझम, प्रसिद्धीकरता केलेला प्रकार वाटू शकतो पण त्यातून उभ्या राहिलेला द डम्प्स्टर प्रोजेक्ट ज्या पद्धतीने विस्तारला त्यावरुन ही पर्यावरण केंद्रित संकल्पना अनेकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या मनात रुजली आहे, तिला मुळं फ़ुटली आहेत, हे नक्की.

’माफ़क किंमतीमधले असे एक आटोपशीर घर जे जगात कुठेही नेऊन उभारता येईल. जिथे सूर्यप्रकाश भरपूर आहे, जवळ नदीचे वाहते पाणी आहे अशा ठिकाणांच्या शोधात अनेक जण असतात. पण प्रत्येक वेळी आपलं घर, त्याच्या जबाबदा-या मागे टाकून तिथे जाऊन रहाता येणं त्यांना शक्य नसतं. ते स्वप्न यातूनच प्रत्यक्षात उतरवणं शक्य होईल.

दहा अब्ज लोकवस्तीच्या जगात, ती वाढण्याचा वेग ४० टक्के प्रतिवर्षी असताना जगातल्या प्रत्येकाला घर, त्यातल्या सुखसोयींसकट मिळणे हे एक अशक्य कोटीतले स्वप्न आहे. आपण आलिशान घरात गरज नसताना झोपतो आणि निम्म्याहून अधिक लोकांना डोकं टेकण्यापुरतंही घर नाही या विषमतेपेक्षा सर्वांनी लहान घरे बांधली तर ती जास्त जणांना सामावून घेतील.

जगण्याचा व्याप कमी करणे आणि आपली क्रियाशक्ती वाढवणे हा अजून एक हेतू.

विल्सनचा वैयक्तिक प्रयोग संपल्यावरही प्रकल्प चालुच राहिला.
अनेकजणांनी आळीपाळीने त्याच्या या घरात प्रत्यक्ष रहाण्याचा अनुभव घेतला आणि त्यांनी आपल्या शहरामधे अशी लहान घरे वास्तव्याकरता निवडली.
शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या गरजांनुसार अशी लहान घरे डिझाईन करण्याचे प्रोजेक्ट दिले, विद्यार्थ्यांनी त्यात स्वत:च्या कल्पनाशक्तीनुसार अनेक नवनवीन पर्यावरणप्रेमी प्रयोग केले.
काहींनी मेंढ्यांच्या लोकरीचा वापर केला, वातावणातले तीव्र फ़रक यामधे जास्त चांगले साधले जाते याचा अनुभव घेतला.
विल्सन अजूनही अतिशय लहान, २२५ चौ.फ़ूट घरातच सुखाने रहातो.

डम्पस्टर प्रोजेक्टच्या दुस-या टप्प्यात अंतर्गत जी घरे बनली त्यात सर्वसामान्य अमेरिकन लोकांना ज्या सोयीं हव्या असतात त्यांचा समावेश केला आहे. सिंक, किचन, बेड, दिवा, गरजेनुसार उघडझाप करणारे छत जे गरजेनुसार, योग्य वायुविजन, सुरक्षा कुलुपांची सोय इत्यादी.
मात्र या सोयी जास्तीत जास्त पर्यावरण केंद्रित आहेत. यामधे पावसाचे पाणी साठवायला घुमटाकार छत बाहेरच्या बाजूने बसवले जाते.

डम्प्स्टर प्रोजेक्टचा तिसरा टप्पा लवकरच सुरु होईल. ज्यात जास्तीत जास्त पर्यावरण मैत्रीचा प्रयत्न असेल. सौर उर्जा, वारा, पाऊस, प्रकाश, उष्णता या सर्वांचा जास्तीत जास्त वापर करुन घेणारी ही घरे असतील.
तसेच या घरांचे कचराकुंडीसारखे दिसणेही यातून एलिमिनेट होईल. आकारमानापुरता या संकल्पनेचा वापर आम्ही केला, लोकांच्या मनात कुतूहलापेक्षा तीटकारा निर्माण होण्याची शक्यता असेल तर ती नाहिशी होईल.

उर्जा, जागा आणि पाणी यांचा कमीत कमी वापर आणि कच-याची कमीत कमी निर्मिती कशी करावी याचे विल्सनचे हे घर आदर्शवत उदाहरण ठरले.
काही पर्यावरण तद्न्यांच्या मते पत्र्याऐवजी मुळातच जर नैसर्गिक साहित्याचा वापर करुन जर विल्सनने हे घर बांधले असते तर नैसर्गिक वातानुकूलनाचा लाभ त्याला मिळाला असता. मात्र शहरी वातावरणात हवामानाच्या नैसर्गिक बदलांचा जास्तीत जास्त परिणाम अनुभवण्याच्या दृष्टीने आपण तसे केले नाही असे विल्सनचे स्पष्टीकरण.

आपण बाजारपेठेत आपल्यावर लादण्यात येणा-या सर्व वस्तु आपल्या घरात कच-यासारख्या आणून टाकत असतो. या वस्तुंची आपल्याला अजिबात गरज नसते. आपले घर त्या दृष्टीने मुळातच डम्पिंग ग्राउन्ड आपणच बनवलेले आहे. त्याचा प्रतिकात्मक निषेध विल्सनने त्याच्या डम्प्सटर प्रोजेक्टद्वारे केला.

कमीतकमी सोयींमधे आणि वस्तुंच्या वापरात सुखी रहाणे खरोखरच शक्य आहे हा त्याच्या या प्रयोगाचा निश्कर्ष.
विल्सनच्या स्वत:च्या शब्दात सांगायचे तर- “Even at the extreme end of the spectrum a lot less can bring a lot more to your life.”

(लेख लोकमत ’मंथन’ मधे पुर्वप्रकाशित)

Smile, breathe and go slow.. पाच

वॉल्डेनचे तळे

 आयुष्य जास्तीत जास्त सोपे करणे, कमीत कमी वस्तू वापरणे, गरजेपुरतेच जमवणे आणि कोणत्याही ताणतणावाशिवाय आनंदात जगणे हा विचार वाचताना कितीही आकर्षक, हवासा वाटला तरी प्रत्यक्षात वॉल्डेनकाठी जाऊन राहणारा थोरो एखादाच असतो. शहरातल्या दगदगीच्या, घडय़ाळाच्या काटय़ाशी बांधलेल्या दिनक्रमाचा, पैसे मिळवण्याकरता कराव्या लागणा:या कष्टाचा, मग त्या जमा केलेल्या पैशांच्या व्यवस्थापनाचा, त्यातून विकत घेतलेल्या वस्तू, सुखसोयी सांभाळण्याचा, उपभोगाकरता बांधलेल्या आलिशान घरांचा, ती सुस्थितीत राखण्याकरता, सजवण्याकरता पुन्हा कराव्या लागलेल्या कष्टाचा आणि दगदगीचा एका विशिष्ट टप्प्यावर कितीही उबग आला तरी त्या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न लाखामध्ये एकाचाही नसतो.
का?
कारण सुखासीन जीवनशैलीची, उंचावलेल्या राहणीमानाची झालेली सवय मोडणो, पुन्हा साधेपणाकडे येणो जवळपास अशक्य असते असा सर्वांचाच समज असतो.

त्याऐवजी मग प्रश्नाच्या उत्तरांमधून उपटलेले नवे प्रश्नच वाटय़ाला येतात. घेतलेल्या वस्तू ठेवायला घरात जागा कमी पडणे यावर एक सोपा आणि महागडा उपाय अनेकांच्या मनात असतो. मोठे घर घेणे.
पण या उत्तराने प्रश्न सुटत नाही. कारण मर्फीच्या नियमानुसार जितकी मोठी जागा तितका जास्त पसारा. पण हे सहजासहजी मान्य होणारे नसते. हा उपाय अमलात आणला की सगळेच प्रश्न सुटतील. भरपूर जागा होईल भरपूर वस्तू नीट ठेवायला असे वाटत राहते. म्हणून आहे त्यापेक्षा मोठे घर असावे हे स्वप्न बाळगून असतात अनेक जण. राहते घर पुरत नाही या एका विचाराने भारतात. निदान मुंबईसारख्या शहरात अनेकांची आयुष्य असमाधानी केली आहेत.

तरी धडपड करतोच आपण. पण आपल्या अगदी साध्या प्रयत्नांमधेही सातत्य राहतेच असे नाही. कारण बहुतेक वेळा आपल्या मनात त्यासंदर्भातला विचार नुसताच सतत मनात घोळत राहिलेला असतो.
यात माझा समावेश अर्थातच आहे. आजवर विकत घेतलेल्या वस्तू निदान एकदा तरी वापरून झाल्याशिवाय, कपाटात जमवलेल्या साडय़ा वर्षातून निदान एकदा तरी नेसल्याशिवाय, घेतलेली पुस्तके पूर्ण वाचून झाल्याशिवाय नवे काही घ्यायचे नाही हा मनाशी केलेला साधासुधा संकल्पही प्रत्यक्षात अनेकदा मोडतो. घरात नवनव्या वस्तू, कपडे, पुस्तके येतच राहतात.

असे का होते नेमके? क्लटरफ्री, मिनिमलिस्ट लाइफस्टाइलची संकल्पना प्रत्यक्षात आपल्या स्वत:च्या, आपल्या खिशाच्या, आपण ज्यात राहतो त्या पर्यावरणाच्याही भल्याची आहे हे पटूनदेखील ती जगण्याचा विचार दहा टक्केही प्रत्यक्षात उतरतच नाही.

एक दिवस मी माझ्या धावपळीच्या दिनक्रमातून, ताणतणावांमधून स्वत:ला मुक्त करून कुठेतरी लांबवर प्रवासाला, जंगलात निघून जाणार आहे, किंवा एक दिवस शरीरावर चढलेले अतिरिक्त चरबीचे थर भरपूर व्यायाम करून वितळवून टाकणार आहे या शेखचिल्ली स्वप्नांपैकीच हेही अजून एक स्वप्न असते बहुतेकांचे.

प्रत्येक शहरवासीयाच्या मनातले हे आपापले वॉल्डेन.

मिनिमलिस्ट लाइफस्टाइल प्रत्यक्षात जगणे वाचताना वाटते तितके सोपे नाही. सगळ्यांना तसे जगणे शक्य नाही हे एकदा मान्य केले की मात्र प्रश्न सोपा होतो. काही मार्ग सापडू शकतात.

मिनिमलिस्ट जीवनशैलीच्या दिशेने घेऊन जाणारे लहान लहान सोपे रस्ते.

थोरो आपल्या आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर जसे जगला, त्यातून त्याचे जे विचारचिंतन झाले, त्याला जी मन:शांती लाभली हा एक शंभर टक्के पूर्णत्वाला गेलेला आदर्श मानला तरी तिथवर येऊन पोचण्याकरता त्यानेही अनेक लहान लहान प्रयत्न आयुष्यभर केले.
काही वर्षं करिअरमधे ब्रेक घेऊन हिमालयात किंवा जगात कुठेही भटकंती करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारे अनेक असतात. ते प्रत्यक्षात आणण्याकरता त्यांनाही कितीतरी आर्थिक नियोजने, शारीरिक तंदुरुस्ती, कौटुंबिक अडचणींवरचे उपाय शोधून, त्यावर मार्ग काढून मगच असे मुक्तपणे भटकणे साधते.
अर्थात तिथवर पोचण्याच्या मार्गात पण-परंतुचे अडथळे चिक्कार आणि गोंधळ तर पावलोपावली.
या गोंधळावर कोणतेही एक रेडिमेड उत्तर  नाही. आणि हा गोंधळ असणेही पूर्ण नैसर्गिकच.

मग राहते इतकेच शिल्लक की यापैकी इतरांनी काय काय केले आहे यापेक्षा नेमक्या कशाने आपल्याला जास्तीत जास्त आनंद होईल आणि नेमके काय करणे आपल्याला जास्तीत जास्त सोपे/शक्य आहे त्याचा शांतपणे विचार करायचा.
- आणि वेळेची एक चौकट ठरवून त्यानुसार वागायला सुरुवात करायची.

 असे वागत असताना ज्या ज्या वेळी आपल्याला ठरवल्यानुसार वागणे कठीण जाईल, आपला नियम आपण मोडत आहोत असे वाटेल तेव्हा आपले प्रामाणिक उत्तरच आपल्या मदतीला धावून येते, हा माझा वैयक्तिक अनुभव.

माङयापुरता मी एक प्रश्न प्रत्येक नव्या खरेदीच्या वेळी क्रेडिट कार्ड पुढे करण्याआधी स्वत:ला विचारणे बंधनकारक केले आहे-
 ‘खरेच याची गरज आहे का?’ - हा तो प्रश्न.

असा एक प्रश्न अनेक उत्तरे नजरेसमोर आणतो. उदा. घरात मुळातच अशा प्रकारच्या दुस-या वस्तू आहेत, घरातली आधीची वस्तू दुरुस्त करून, बदलून वापरता येणे शक्य आहे, या किमतीत मला इतर काही गरजेच्या वस्तू विकत घेणे शक्य आहे. इत्यादि.

वेगवेगळे सेल लागतात, भरभरून वाहणारे एक्स्पो मोह घालतात, आनंदाचे समारंभ समोर असतात जे साजरे करायला वस्तू हव्याच आहेत घ्यायला असे वाटते. नियम मोडतो, संकल्प धुळीला मिळतो. पण हार मानायची नाही. हा अपवाद होता असे स्वत:ला पटवायचे आणि मग एक वस्तू घरात आली म्हणून तिच्या जागी आधीच्या पाच घराबाहेर काढायच्या, गरजूंना दान करायच्या, पुनर्वापराकरता द्यायच्या. हा नियम पाळायचा.

असे झाले, की एक ना एक दिवस आपल्याला आपल्या भोवतालची अडगळ, पसारा कमीत कमी होऊन आपण मिनिमलिस्ट जीवनशैलीची एक पायरी तरी यशस्वीपणे चढलो आहोत याचे समाधान मिळेल.
याच आशेवर निदान मी तरी आहे. एक ना एक दिवस मला माझे वॉल्डेन सापडेल.

- ते काहींना सापडले आहे.

अमेरिकेतल्या ह्यूस्टन टिलोस्टन विद्यापीठातले एक कलंदर प्रोफेसर डॉ. जेफ विल्सन हे त्यातले एक.
- एकेकाळी तब्बल अडीच हजार चौरस फुटांच्या जागेत राहणारे हे गृहस्थ एक प्रयोग म्हणून चक्क छत्तीस चौरस फुटांच्या एका चौकोनात राहायला गेले आहेत.
आणि ते म्हणतात, मी जास्त सुखी आहे!

- जगभरात चर्चेचा विषय असलेल्या या ‘डम्प्स्टर प्रोजेक्ट’बद्दल पुढच्या लेखात!

नेमके काय हवे आहे?
क्लटरफ्री, मिनिमलिस्ट लाइफस्टाइल आपण जगायला हवी या वरवर साध्या वाटणाा-या ध्येयातही अनेक उपप्रकार असतात. एक साधा प्रश्न आपण स्वत:ला प्रामाणिकपणो विचारायला हवा-
 मिनिमलिस्ट, क्लटरफ्री जीवनशैली मला नेमकी का हवीशी वाटते आहे?
1. साधे राहणीमान हवे आहे?
2. पैसे वाचवायचे आहेत?
3. खरेदी कमीत कमी करायची आहे, पर्यावरणस्नेही जगायचे आहे?
4. धावपळ-दगदग कमी करायची आहे, आहे तो व्याप कमी करून अडगळमुक्त आयुष्य जगायचे आहे?
5. ताण-तणाव कमी करून हवे आहेत, पैसे कमावण्याचा हव्यास व त्याकरता करावे लागणारे कष्ट कमी करायचे आहेत?

..काय नेमके हवे आहे आपल्याला वैयक्तिकपातळीवर? की नेमके काय हवे तेच कळत नाही? की हे सगळेच हवेसे आहे?

 36 चौरस फुटांच्या पत्र्याच्या कचराकुंडीमधे आपलं घर वसवून डॉ. जेफ विल्सन तिथे राहायला गेले, तो हा दिवस. प्रोफेसरांचे हे कचराकुंडीतले घर साधेसुधे नाही. या 36 फुटी पत्र्याच्या घरात त्यांनीे स्वत: बनवलेले कपाट, झोपण्याकरता पलंग, वातानुकूलन, उघडझाप करणारे छप्पर आहे. या लहान जागेत राहताना अगदी गरजेपुरतेच कपडे, खाद्यपदार्थ, वस्तू त्यांना आपल्याजवळ ठेवायला लागतात. तशा ते ठेवतात आणि त्यांना त्या आरामात पुरतात. अडीच हजार चौरस फुटांच्या जागेत राहणारे प्रोफेसर विल्सन आता या 36 चौरस फूट जागेत जास्त सुखी आहेत, कारण.. त्याबद्दल पुढच्या लेखात!

(लेख लोकमत ’मंथन’ पुरवणीमधे पूर्वप्रकाशित)

Smile, breathe and go slow.. चार

अडगळ भोवतालची आणि मनातली!

 जानेवारी 2016 मध्ये फोब्जर्-लीडरशिप कार्यक्रमांतर्गत तिशीच्या आतील स्त्रियांची जी परिषद झाली त्यात ‘आम्हाला आमचे आयुष्य सोपे करायचे आहे’ हा निर्धार त्यात सहभागी झालेल्या सर्व धडाडीच्या, टॉप करिअरिस्ट तरुण स्त्रियांनी व्यक्त केला. त्या ते कसे साध्य करणार आहेत आणि असा निर्धार व्यक्त करण्यामागची त्यांची भूमिका नेमकी काय? यातील अनेकींनी ही साधी आणि सोपेपणाची क्लटरफ्री जीवनशैली जगायलाही सुरुवात केलेली आहे. त्यांचे स्वानुभव काय हे जाणून घ्यायला हवे.

आयुष्य साधेपणाने जगण्याचं ठरवणे म्हणजे आयुष्य पुरेपूर उपभोगण्याचा हक्क स्वत:ला नाकारणे हा होत नाही का? आयुष्याच्या शर्यतीतून बाहेर पडणं आहे का हे? हा प्रश्न यातल्या अनेकींना वारंवार विचारला गेला.
वस्तूंची खरेदी कमीतकमी करणे, आजूबाजूचा पसारा कमीतकमी करणे याचाच दुसरा अर्थ जीवनातला आनंद, उत्साह कमी करत नेणे असा अनेकांचा समज असतो. अपरिग्रह ही गोष्ट आपणही संन्यस्त वृत्तीशी जोडतच असतो.

प्रत्येकीचे उपाय, मार्ग, उत्तरे वेगवेगळी होती. त्यांच्या आजवरच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर, पुढच्या ठरवलेल्या दिशांवर ते मार्ग, त्यांची उत्तरे बेतलेली. मात्र त्यात एक समान सूत्र आहे.

'Their Roaring Thirties : Brutally Honest Career Talk From Women Who Beat The Youth Trap' या पुस्तकाची लेखिका डेनिस रेस्तोरी ही त्यांच्यापैकीच एक.

वयाच्या 28 व्या वर्षी डेनिसनी जेव्हा आयुष्यातली गुंतागुंत, तणाव कमी करायचं, साधेपणाने जगायचं ठरवलं तेव्हा तिला आता तू काम करायचं सोडणार का? करिअर सोडून देणार का असं विचारलं गेलं. कारण जर वस्तू खरेदी करायच्याच नाहीत तर पैसे कमवायचेच कशाला? आणि तणावाचे मुख्य कारण ‘करिअर’ हेच तर असते हा सर्वमान्य दृष्टिकोन.
डेनिसच्या मते नोकरी सोडून देण्याने तिचं आयुष्य सोपं होणार नव्हतं कारण मुळात गुंतागुंतीचं कारण ते नाही. तसं करण्याने उलट तिच्या आयुष्यातला आनंद कमी झाला असता.

उत्तर द्यायला सर्वात कठीण प्रश्न मग आता नेमकं काय करणार?

डेनिसने आयुष्य साधेपणाने घालवायची सुरुवात एका अतिशय सोप्या वाटणा-याा पण करायला अत्यंत कठीण गोष्टीपासून केली. तिने आपला ‘वॉर्डरोब’ तपासला आणि त्यात काही महत्त्वाचे बदल केले.

त्यातला पहिला होता- कपडय़ांच्या बाबतीत आपल्या आजीच्या ‘फ्रेंच’ जीवनशैलीचे अनुकरण.
म्हणजेच कपडय़ांच्या बाबतीत अतिशय चोखंदळ बनणे. मोजकेच परंतु उच्च अभिरुचीचे कपडे जवळ बाळगणे. जे जास्तीत जास्त टिकतील. कुठेही, कधीही वापरले तरी त्याचा ‘क्लास’ कमी न होणे.

हे वाचत असताना मला आठवलं कुलाबा कॉजवे किंवा बान्द्रय़ाच्या लिंकिंग रोडवरून, फॅशन स्ट्रीटवरून स्वस्तात मस्त मिळणारे ढीगभर कपडे आणण्याची एका वयातली गरज. नुसते कपडेच नाही. पर्सेस, चपला, बेल्ट, जंक दागिने अनेक गोष्टी. तिथे जाऊन खरेदी करून आलं की आपल्याकडे आता काय भारी वॉर्डरोब जमलाय, एकदम फॅशनेबल असं मनाला समाधान वाटे, जे जेमतेम आठवडाभर टिके. त्यानंतर मग कपाटात एकदा वापरून बोळा झालेले स्कर्ट्स, रंग फिका पडलेले कुर्त्यांचे ढीग जमा होत. चपलांच्या कपाटात पाय ठेवायला जागा नाही, पण ऐनवेळी कामाला येणार बाटाच्या दुकानातल्या दणकट चपलाच.

आई सांगून थकायची की बाई गं, मोजकेच पण चांगल्या क्वालिटीचे, शिवून घेतलेले कपडे असूदे जवळ. पुढे कालांतराने ते पटलं. ब्रॅण्डेड कपडे महाग वाटले तरी ते उत्तम टिकतात, त्यांची चमक कमी होत नाही. त्यात ‘क्लास’ असतो वगैरे.
आता ब्रॅण्डेड कपडेही केवळ परवडतात म्हणून भारंभार आणणे सुरू झाल्यावर मात्र चक्र  पुन्हा बिघडलं.

डेनिसने तिच्या आजीचं फॅशन स्टेटमेण्ट स्वीकारलं. एखादा एकदम हटके दागिना, रेशमी स्कार्फ, व्हिण्टेज ब्रोच, आगळ्या घडणीची अंगठी किंवा कानातले इतकंच पुरेसं असतं लक्षवेधी ठरायला. प्रत्येक लग्नात, समारंभाला ‘वेगळी’, कोणी न बघितलेली साडी किंवा नवा, महागडा ड्रेस अंगावर मिरवण्यापेक्षा ही युक्ती नक्कीच उपयोगाची.

दुसरी गोष्ट जी अनेक वेळा अनेकांनी सांगूनही ख-या अर्थाने वापरली जात नाही ती म्हणजे ‘नाही’ म्हणण्याचे महत्त्व.
‘नाही हा शब्द योग्य वेळी, योग्य ठिकाणी वापरता येणो हे आयुष्य साधे, सोपे करण्याच्या दृष्टीने, आतला, बाहेरचा तणाव, गुंतागुंत कमी करण्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा, जीवनावश्यक आहे ते तो प्रत्यक्ष वापरायला लागल्याशिवाय नाहीच कळत. नव्या वर्षाच्या कामाचं काटेकोरपणे केलेलं नियोजन का बारगळतं, अनेक नव्या योजनांचे संकल्प पुरे व्हायला कठीण नसतानाही अर्धवट का राहतात यामागचं एकमेव कारण म्हणजे ‘नाही’ म्हणायला न जमल्याने अनेक ऐनवेळी गळ्यात पडलेली कामं.

स्वानुभव सांगायचा तर ठरवलेल्या प्रोजेक्टवर काम चालू असतानाच मधेच एखादा लेख लिहिण्याचे काम अंगावर घेतल्याने, इंटरेस्टिंग व्यक्तीची मुलाखत घ्यायचा चान्स मिळाल्याचा मोह आवरणो कठीण झाल्यामुळे माझे हातातले नियोजित प्रकल्प वर्षानुवर्षे रेंगाळले आहेत. कामे वेळेत पूर्ण न होणे, त्यामुळे ताणतणाव वाढणे. आयुष्य गुंतागुंतीचे झाले आहे वाटायला हे पुरेसं असतं.

तिसरी गोष्ट जी वस्तूंच्या बाबतीत खरी तीच नातेसंबंधांच्याही. खंडीभर बॉयफ्रेण्ड्स, मित्रमैत्रिणींची गर्दी अवतीभवती करण्यापेक्षा मोजकेच, आयुष्य समृद्ध करणारे मित्रमैत्रिणी जोडणे, जे आहेत ते जपणे महत्त्वाचे मानणे. फेसबुकसारख्या व्हर्चुअल जगामधेही तीन-चार हजारांची मित्रयादी मिरवण्याचा शौक, शेकडो ग्रुप्स जॉइन करण्याचा उत्साह कालांतराने ओसरतो. अशी मित्रयादी सांभाळणे कठीण. प्रत्येकाने सातत्याने अपडेट केलेली स्टेटस, टाकलेले फोटो, ते आज कुठे जेवताहेत, कॉफी पिताहेत, त्यांच्या आयुष्यातल्या बारीक सारीक घडामोडी, घटना ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात काडीचाही फरक पडणार नसतो, त्या जाणून घेण्यात आपले कित्येक तास खर्च होणार, प्रतिक्रिया नोंदवणे, आलेल्या उत्तराला प्रत्युत्तर देणे, त्यांच्या एका ‘लाइक’ला उत्तर म्हणून सभ्यपणामुळे तुम्ही चार ‘लाइक’ देणे. या सगळ्याला अंत नाही.
प्रत्यक्ष आयुष्यातही हे तितकंच कठीण. इथेही आपले काही कमी ग्रुप्स जोडलेले नसतात. ऑफिसमधले, कॉलनीतले कमी म्हणून की काय शाळा-कॉलेजातलेही ग्रुप्स जे आता व्हॉट्सअॅप नावाच्या कटकटीमुळे पुन्हा तुमच्या आयुष्यात डोकावलेले असतात, एखादा रिडर्स क्लब असतो, जीममधला मित्रसमुदाय असतो, मॉर्निंग वॉकर्सचा ग्रुप असतो, भिशी असते, ट्रीप्स, प्रवासात ओळखी घट्ट झालेले असतात, जोडीदाराचे मित्र-मैत्रिणी तुम्हालाही चिकटलेले असू शकतात, ट्रेनमधले असतात.
रोजच्या आयुष्यातही अवती भवती भरपूर मित्र-मैत्रिणींची गर्दी असते ज्यातले खरे मित्र दोन टक्केही नसतात. इतरांशी संबंध राखण्याचा, घरी जाण्याचा, बोलावण्याचा, फोनवरून विचारपूस करण्याचाही एक ताण असतो जो झेपत नसतो. नुसती ही गर्दी आजूबाजूला असण्याचाही तो ताण असतो.

एकटं पडण्याच्या भीतीतून आपण आजूबाजूला ही गर्दी जमवलेली नाही ना याचा काटेकोर, स्पष्ट विचार करायला हवा. एकटय़ाने गोष्टी करण्यात, मग तो प्रवास असो, सिनेमा पाहणो असो, हॉटेलात जाणे असो. आपल्याला सोबत हवीच हा मनाचा हट्ट कमी केला तर एकटेपणाने या गोष्टी करण्यात किती मोठा आनंद, शांतता आहे, सोपेपणा आहे हे सहज समजून येईल.

अनेक नाती, मैत्री टॉक्सिक झालेली असतात, चिघळलेली असतात. ती बाळगून काही फायदा नाही उलट तोटा असतो. जगण्यातले अनारोग्य वाढते त्यांच्यामुळे.

जगण्यातील अडगळ दूर करायची तर या युक्त्या नक्कीच उपयोगी पडतील.

नीटनेटक्या, आवरलेल्या, कमीत कमी सामान असणाा-या घरात प्रसन्न, सकारात्मक वाटणो ही अत्यंत साधी, प्राथमिक, प्राचीन जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये, जीवनशैलींमध्ये समान मानली गेलेली गोष्ट.

जे घराचे तेच आयुष्याचे.

आवराआवर ही गोष्ट, पसारा कमीतकमी असणो, क्लटर नसणे ही गोष्ट जास्तीत जास्त नैसर्गिक जीवनशैलीच्या जवळ नेणारी आहे. निसर्गाशी स्वत:ला जोडलेले ठेवण्याकरता फार काही आगळेवेगळे, भव्यदिव्य करायची गरज नाही. फक्त पसारा आवरून ठेवायला हवा. भोवतालातला
आणि स्वत:च्या आतला.

(लेख लोकमत ’मंथन’पुरवणीमधे पूर्वप्रकाशित)

Smile, breathe and go slow- तीन

‘द स्टोरी ऑफ स्टफ’

वस्तू नेमक्या येतात कुठून? आणि जातात कुठे?

विकत घ्यायच्या, वापरायच्या आणि फेकून द्यायच्या. आपला संबंध वस्तूंशी इतकाच येत असला, तरी त्यांचं जीवनचक्र  इतकं मर्यादित नक्कीच नाही.

आपल्या अवतीभवतीच्या पसार्‍याला कारणीभूत होणार्‍या या वस्तू कुठून येतात आणि कुठे जातात या दोन प्रश्नांच्या दरम्यान अजूनही असंख्य प्रश्न असतात.

एक काळ. अगदी फार जुना नाही. वस्तूंचं मूल्य ती किती पिढय़ा वापरात आहे यावर ठरत होतं. आजोबांपासूनचा रेडिओ, ग्रामोफोन, वीस वर्षे जुना फ्रीज, दहा वर्षांपूर्वीची इस्त्री, पाच वर्षांपूर्वीचं वॉशिंग मशीन. आता हा काळ कमी होत होत सहा महिन्यांवर आला आहे.

सर्वसाधारण माणूस पन्नास वर्षांपूर्वी वापरायचा त्याच्या दुप्पट वस्तू आज वापरतो. वस्तूंचा पुनर्वापर ही संकल्पना आज हद्दपार झाली आहे. वस्तूंचा नियोजनबद्ध टाकाऊपणा, फसवा टिकाऊपणा त्याला कारणीभूत आहे. लवकरात लवकर निरु पयोगी ठरतील अशाच वस्तूंची जाणीवपूर्वक निर्मिती केली जाते. तंत्रज्ञान दर सहा महिन्यांनी निरु पयोगी होतं. ज्या वस्तू झपाटय़ाने खराब होऊ शकत नाहीत त्याबाबतीत ग्राहकांच्या सवयी, फॅशन, लूक बदलायचा. आधुनिकता टिकवण्याच्या आग्रहामुळे मग ग्राहकांची पावलं मॉलकडे वळतात. नवी खरेदी केली जाते.

रोज हजारो जाहिरातींचा मारा त्याकरताच. आपल्याला असमाधानी बनवणा-या जाहिराती.

आपले केस खराब आहेत, कपडे ट्रेण्डी नाहीत, ते मळके आणि जुनाट आहेत. फर्निचर कधीचं बदलायला झालंय, घराचा रंग उडालाय, तुमच्या आयुष्याचाच रंग उडालाय, तुम्ही जुने झाला आहात. हे सगळं सुधारू शकेल. त्याकरता तुम्हाला शॉपिंग करायला हवं. वस्तू खरेदी करायला हव्यात. त्यानंतर हे सगळं नीटनेटकं होऊ शकतं.
आनंदी वृत्ती विकत आणलेल्या वस्तूंच्या पसा:याशी इतकी निगडित खरंच असते का?

वस्तू विकत घेताना आपण त्यांचं योग्य मोल देत असतो का? ते जरु रीपेक्षा जास्त किंवा कमी तर नसतं?

पैशांव्यतिरिक्त नेमक्या कशाकशाच्या बदल्यात आपल्याला त्यांचं मूल्य चुकतं करायला लागतं? वस्तूंना जेव्हा आपण वापरत असतो त्याच वेळी आपल्यालाही कोणी वापरून घेत असतं का? वापरून झाल्यावर किंवा जुन्या झाल्यावर ज्या वस्तू आपण कच-यात फेकून देऊन आपल्या नजरेसमोरून नाहिशा करतो त्या कधीतरी खरंच नाहिशा होऊ शकतात का? फेकून दिल्यावर वस्तू नेमक्या कुठे जातात?

मुळात या गरज नसलेल्या प्रश्नांची जाणीव करून घ्यायची आपल्याला काही गरज आहे का?

याची उत्तरं जाणून घ्यायला आपल्याला वस्तूंची जीवनकहाणी माहिती करून घ्यायला हवी.

अॅन लेनर्ड या अमेरिकन बाईंनी प्रचंड संशोधनानंतर एक लघुपट बनवला. त्याचं नाव  ’स्टोरी ऑफ स्टफ’. आपल्या आयुष्यातली वस्तूंची अनावश्यक गर्दी आणि त्याखाली दबलेले अनेकानेक प्रश्न लोकांसमोर आणण्याचं पहिलं श्रेय या लेनर्डबाईंना जातं.

 जगभरातले वस्तू उत्पादनांचे कारखाने, विक्रीची ठिकाणं, वापरून फेकून दिलेल्या वस्तूंनी भरलेल्या कचरापट्टय़ा तिने धुंडाळल्या आणि त्यातून जन्माला आली वस्तूंच्या प्रवासाची ही कहाणी. छोटीशी, केवळ बावीस मिनिटांची, पण अतिशय परिणामकारक अॅनिमेटेड डॉक्युमेन्टरी.

कच्चा माल-उत्पादन-वितरण-विनियोग-विल्हेवाट हे वस्तूंचं जीवनचक्र  म्हणजेच भौतिकतेचं अर्थशास्त्र. या वस्तूंचे ग्राहक आणि प्रत्यक्ष वापरकर्ते/उपभोगकर्ते (कंझुमर) म्हणून आपला थेट संबंध फक्त विनियोगाच्या टप्प्यावर आहे असं आपण सोयिस्कररीत्या मानतो. उपभोगाच्या सोनेरी जाळ्यात आपण गुरफटलेले असतो. वस्तूंच्या निर्मितीत कच्च्या मालाच्या खाणी, जंगलं अशासारख्या नैसर्गिक स्रोतांमधून केला गेलेला उपसा असतो, याची जाणीव करून घेण्याचे कष्टही आपल्याला नकोसे असतात. उत्पादन-वितरण-उपभोग आणि मग त्यांना फेकून देणं अशा चक्रात पर्यावरणातील अनेक जिवांचं शोषण होत असतं याचं ज्ञान सोडा, साधी जाणीवही आपल्याला नसते.

गरज नसताना भारंभार वस्तू खरेदी करत सुटण्याची, कचरा वाढवण्याची, वस्तूंना फेकण्याची, पुन्हा जमा करण्याची मानसिकता रुजवून माणसाचं रूपांतर निव्वळ ग्राहकामधे करणारी व्यवस्था प्रथम अमेरिकेत आणि तिथून जगभरात रु जत गेली. नागरिक किती खरेदी करतो, खरेदीच्या चक्रात त्याचं योगदान किती जास्त आहे यावर नागरिकाचं महत्त्व, मूल्य ठरू लागलं. खरेदी करा, करत राहा तरच देश, देशाची अर्थव्यवस्था टिकून राहील, अशी परिस्थिती आल्यामुळेच नाइन-इलेव्हनच्या हल्ल्यानंतर हादरलेल्या अवस्थेतही अमेरिका आपली प्रार्थना, शोक मागे टाकून राष्ट्राध्यक्ष बुश यांचा सल्ला स्वीकारून जोमाने खरेदीला भिडली होती.

अशा या वस्तुवादी जीवनशैलीमागचं अर्थकारण, पर्यावरण, समाज संस्कृतीवर त्याचा होत असलेला परिणाम, राजकीय, धंदेवाईक पातळीवरून समाजात ग्राहक वृत्ती खोलवर मुरवण्याकरता केले जाणारे प्रयत्न, त्यावरच्या असलेल्या नसलेल्या उपाययोजना.. हे सारं स्टोरी ऑफ स्टफया लघुपटाने जगासमोर मांडलं.

डिसें.२००७ मध्ये अमेरिकेत शाळा, कॉलेजं, कार्यालयं, घरगुती समारंभ अशा अनेक ठिकाणी हा लघुपट प्रदर्शित झाला. ज्यांनी पाहिला त्यांनी तो इतरांपर्यंत पोचवला. आणि मग बघता बघता या लहानशा लघुपटातून एक प्रचंड चळवळ उभी राहण्याची सुरुवात झाली.

वस्तूंचा वापर, अतिवापर. त्यातच भौतिक, आत्मिक समाधान शोधत राहण्याच्या जीवनशैलीला उबगलेल्या असंख्य लोकांनी ही चळवळ पुढे चालवली. जगातल्या 228 भाषांमध्ये हा लघुपट अनुवादित केला गेला. लघुपटातून पुढे इतरही मालिका निर्माण झाल्या. पाण्याच्या बाटल्यांपासून सौंदर्य प्रसाधनं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्याही कहाण्या लोकांसमोर आल्या. बघणा:या अनेकांनी त्यांच्या कहाण्या, वैयक्तिक पातळीवरचे प्रयत्न या चळवळीला जोडून घेतले. ब्लॉग्जच्या माध्यमातून या कहाण्या प्रसिद्ध होत गेल्या.

निसर्गाचा -हास करून, स्वस्तात श्रम विकणार्या बालमजुरांचं शोषण करून वस्तू निर्माण होतात. त्याचं खरं ‘मूल्य’ त्या वस्तूला लावलेल्या किमतीच्या लेबलपेक्षा कितीतरी जास्त असतं, हे कधी आपल्या ध्यानातही येत नाही. आणि इतकं करूनही आपण पैसा मोजून विकत घेतलेल्या वस्तूंच्या बदल्यात आपलं स्वास्थ्य, आनंद, सुरक्षितता पणाला लावत असतो. अगदी झोपण्याकरता डोक्याखाली घेतलेल्या सिंथेटिक फायबर असलेल्या मऊ मऊ उशांमधून बाहेर पडणारे न्यूरोटॉक्सिन असो, आपल्या मुलांना पॅकेज्ड फूड, कॅण्ड ज्यूस, स्नॅक्समधून मिळणारं शिसं असो. अशा अनेक वस्तूंच्या कहाण्या.

पर्यावरणाचं नुकसान, सामाजिक अन्याय, आरोग्याला धोका याला कारणीभूत आहे. वस्तूंचं अतिरेकी उत्पादन आणि अपरिमित उपभोगाची आपल्याला लागलेली सवय. त्यामुळेच घर, मित्र, नाती, संवाद, गाणी, निसर्ग या साध्या, सहजप्राप्त आनंददायी गोष्टींकडे दुर्लक्ष करून माणसं ग्राहक बनतात, आणि आपला आनंद वस्तूंच्या असण्या-नसण्याशी जोडतात. ही सवय सोडायची असं आपण ठरवलंच तर ते नेमकं साध्य कसं होणार? खरंच शक्य होईल का ते? कोणी केलं आहे का तसं? तर हो. अनेकांनी तसं केलं आहे, अनेक जण तसं करण्याच्या प्रयत्नात आहेत.

कच-याच्या अतिरेकावर उतारा म्हणून स्वीकारलेली कचरामुक्त जीवनशैली. भौतिक आणि मानसिक कसलाच कचरा साठवून ठेवायचा नाही. देऊन टाकायचा, फेकून द्यायचा किंवा त्याचा पुनर्वापर करायचा. आहेत ती साधनं गरजेपुरतीच रोजच्या आयुष्यात वापरायची. आपली शक्ती, ऊर्जा जास्त क्रियाशील, कृतिशील आणि सर्जनशील कामांकरता राखून ठेवायची.

ज्यांना प्रश्न पडले त्यांनी ते सोडवण्याचे प्रयत्न केले. काहींना उत्तरं मिळाली, काहींना अजून प्रश्न पडत गेले उत्तरांचा मागोवा घेताना. उत्तर सोपं नाही. एकेरी नाही, रेडिमेड नाही. पण ते आहे. प्रत्येकाकरता ते वेगळं आहे कदाचित.

- नेटाने असे प्रयत्न करू पाहणा:या काही व्यक्तींची, त्यांच्या प्रयोगांची, त्यांना मिळालेल्या यशपयशाची कहाणी आता यापुढच्या लेखांमध्ये..
--
(*’स्टोरी ऑफ़ स्टफ़’ हा लघुपट आता मराठीतही आणला गेला आहे. इंटरनेटवर पहाण्याकरता तो उपलब्ध आहे.)

पुढच्या भागात-
 नादुरुस्त टीव्ही किंवा फ्रीज दुरु स्त करण्यापेक्षा तो बदलून नवा घेणं आता का आणि कसं फायदेशीर बनवलं गेलं आहे?
 बुटांपासून ते सेलफोनपर्यंत अनेक वापरातल्या गोष्टी चांगल्या स्थितीत असतानाही आपल्याला त्या बदलणं का आणि कसं भाग पाडलं जातं?
 आपल्याला मॉलमधे सवलतीच्या योजनेत आश्चर्यजनक स्वस्त दरात मिळालेल्या वस्तूची किंमत हैतीमधल्या कारखान्यातले कामगार, कॉन्गोमधले खाण कामगार, भारत आणि चीनमधले बालमजूर या प्रत्येकाने आधीच मोजलेली असते. त्यांच्या आरोग्याची, सुरक्षित जीवन जगण्याच्या हक्काचं मोल चुकतं करून! हे कधीतरी आपल्या ध्यानी येतं का?

(लेख लोकमत ’मंथन’ पुरवणीमधे पुर्वप्रकाशित)

Smile, breathe and go slow.. दोन

..खूप झालं!

न होणारे, वजन कमी-जास्त होईल तेव्हा घालू म्हणून ठेवून दिलेले, आठवणीखातर ठेवलेले कपडे काढून टाकणं, जुन्या सवयीच्या, प्रेमाने घेतलेल्या, दिलेल्या वस्तू फेकून देणं सोपं नाही. आठवणींचा पसारा तर सगळ्यात मोठा आणि त्या पसा-याचा भारही. आवरायचा प्रयत्न करतानाच कळत जातं.

आपल्या आवरशक्तीबाहेरचा आहे हा पसारा. कशाला जमवतो आपण एवढय़ा वस्तू? वापरापेक्षा जमवण्याचा हा हव्यास का?

जगण्याला आलेल्या अतिवेगाने भोवंडलेली (काही) माणसं आता त्या निर्दय बसमधून उतरून जाण्याचे मार्ग शोधू लागली आहेत. हे सोपं नाही. समजणं अवघड, पटणं दुष्प्राप्य आणि प्रत्यक्ष आचरणात आणणं तर अशक्यच्या जवळ जाणारं.

- पण जगात शोधत गेलं तर हे जमवू पाहणारी काही माणसं भेटतात. छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी सुरुवात करताना दिसतात. विचार आणि भावनांना, स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांना कात्री लावणं सोपं नसतंच. म्हणून मग सुरुवात वस्तूंपासून करतात.

वस्तूंचा अनावश्यक पसारा कमी करायचा.

पसारा आहे, खूपच आहे ही भावना मुळात जन्मते ती नेमकी का आणि तिचं नक्की स्वरूप काय याच्या मुळाशी सहज जाता येत नाही. अनेक थर लागतात अधे मधे. कोलाहल, कच:यामधे आपण गुदमरतो आहोत ही जाणीव अस्वस्थ करणारी नक्कीच.

पसारा आहे हे मान्य केल्यावर मग पुढे काय? त्याकडे दुर्लक्ष करणं, तो नाहीच असं समजून वावरत राहणं एका मर्यादेनंतर आपल्याला अशक्य होतं. त्यावरचा पहिला उपाय म्हणजे तो आवरण्याचा प्रयत्न करणं, नजरेसमोरून नाहिसा करण्याचा प्रयत्न करणं.

घरात सगळ्यात जास्त पसारा, गोंधळ असणारं किंवा तो आहे असं कायमच वाटणारं ठिकाण म्हणजे आपलं कपडय़ांचं कपाट. मुळावर घाव घातला की बाकी सोपं या विचाराने कपाट आवरायला घेतलं.

कपाटात खूप गोष्टी आहेत, गरजेपेक्षा कितीतरी जास्त. त्या कधीच वापरल्या जाणार नाहीयेत ही मनाच्या एका कोप-यात सदैव जिवंत असणारी टोचणी ठळक होत जाते.

साडय़ांचे अनेक फोल्डर्स. लग्नात घेतलेल्या, अजूनही रेशीम, जरी, रंग धड असलेल्या पण आपण पुढच्या आयुष्यात कधीही नेसणार नाही हे माहीत असलेल्या साडय़ा, अॅण्टिक पदाला पोचलेली आजेसासूबाईंची विरलेली पैठणी, मंगळागौरीत हौसेने घेतलेली, पुन्हा घडीही न उलगडलेली नऊवारी, काही नारायण पेठी, चंदेरी, पटोला. जागा अडवून बसलेल्या. या साडय़ांची कुशन कव्हर्स, पडदे वगैरे बनवून त्यांचा पुनर्वापर करायचे डू इट युअरसेल्फ(डीआयवाय) व्हिडीओज लॅपटॉपमधे साठवून ठेवलेले आहेत. आयुष्यात कधीतरी खूप वेळ असेल तेव्हा नक्की करायच्या अनेक गोष्टींपैकी ही एक. काही शिफॉन, गार्डन, कलकत्ता, माहेश्वरी, कोटा, कोशा, नल्लीतल्या, जयपूरच्या, चेन्नईच्या. प्रदर्शनांमधून घेतलेल्या, बनवून घेतलेल्या, लग्नाच्या वाढदिवसांच्या, भेट मिळालेल्या. प्रत्येकाकरता पेटीकोट, ब्लाऊजेस. त्याचेही आता दोन-तीन सेट. न होणारे, होणारे, नव्या स्टाईलचे. त्यात रेडिमेडचीही भर.

मग ओढण्या, स्टोल्स. चुडीदार, सलवार, पतियाळा, लेगिन्ग्जचे ढीग, कुर्ते, टय़ुनिक्स, टॉप्स, जीन्स, ट्राउझर्स, स्कर्ट्स. दागिने. सोने, चांदी, प्रेशस-सेमी प्रेशस स्टोन्स, बीड्स, जन्क, कॉश्च्यूम.

अत्यंत सिस्टीमॅटीकली वॉर्डरोब, किचन रॅक्स, पुस्तकांची कपाटं लावणं ही एक कला आहे. वापरात नसलेल्या वस्तू निर्दयपणे टाकून देणं जमवायला लागतं त्याकरता.

हा सगळा कचरा आपण निर्माण केलेला आहे, आपणच आपला पैसा, वेळ, ऊर्जा खर्च करून जमा केलेला आहे. या वस्तू ना धड गरजेच्या, ना धड अडगळीच्या. अस्वस्थता वाढतच जाते.

हे सगळं गरजेचं आहे, फेकून द्यावंसं वाटत नाही याचाही एक ताण येतोच.

नुकत्याच आवरून झालेल्या वॉर्डरोबमधे आता भरपूर जागा झालेली आहे. मन किंचित हलकं झालेलं असलं तरी मनावर ताण अजूनही आहे. जागा रिकामी झाली की त्यात नवनवी भर पडत राहणारच आहे हे माहीत असण्याचा ताण. रिकाम्या झालेल्या जागा दुप्पट वेगाने भरून निघतात हा नियम आहे. माहिती, वस्तू जमवायच्या, साठवून ठेवायच्या, फेकून द्यायच्या, पुन्हा जमवायच्या ही नशा असते आणि त्यातून बाहेर पडावंसं वाटलं तरी पडता येत नाही.

मुंबईत या सिझनला असंख्य हस्तमागाची प्रदर्शनं भरत असतात, तिकडे वळण्यावाचून पावलांना कसं रोखायचं?

थोरोचं वॉल्डेन पुन्हा आठवतं. पसारा आवरण्यात ऊर्जा घालवण्यापेक्षा तो कमी करण्यात, पुन्हा निर्माण न करण्यात मन घाला असं तो लिहितो. हे कसं साधायचं?

याचंही काही शास्त्र आहे, तंत्र आहे. काहींनी प्रयत्नपूर्वक, अनुभवातून साध्य केलेलं. चुका करत, इतरांच्या उदाहरणांवरून शिकत. अगदी मोजक्या लोकांच्या स्वभावात ते उपजतही असतं. या महिन्यात मुंबईत आणि इतरही शहरांमधल्या मॉल्समधे डिस्काउंटची रेलचेल असते. प्रचंड गर्दी उसळते. सारासार विचार हरवून बसलेले लोक. ट्रॅफिक जाम. लोक वेडे होऊन धक्काबुक्की करत मॉलमधे घुसतात. कपडय़ांचे, वस्तूंचे ढिगारे बघता बघता त्या अवाढव्य मॉल्स, डिपार्टमेण्टल स्टोअर्समधून लोकांच्या घरांमधे जाऊन बसतात. साचतात. त्यांचे ढीग तयार होतात. जुन्यावर नवे रचले जातात.

प्रत्येकाला वस्तू जमवायचीच गरज वाटते आहे. हाताशी वेळ, पैसा, सोय असताना स्वत:ची गरज, आवड, छंद का पुरवायचा नाही?

मिनिमलिस्ट, गो स्लो लाइफस्टाईलची गरज वाटायला लागणं हे नेमकं कशाचं लक्षण?

फॉर्टी इज न्यू थर्टी, सिक्स्टी इज न्यू फॉर्टीच्या जमान्यात कोणाचंही ‘वय’ तर कधीच होत नाही. आकर्षक, प्रेङोण्टेबल दिसण्याची, सततच्या नावीन्याची, बदलाची आवड अर्ली टीनएजपासून लेट एटीजपर्यंत विस्तारत गेलेली आहे. त्यात गैर काहीच नाही. पण मग हव्यासाला, वस्तू जमवण्याला बंधारा नक्की कोणत्या मर्यादेत घालण्याची अपेक्षा बाळगायची?

वस्तूंचा वापर, अतिवापराचा वीट प्रथम आला तो (अर्थातच) पश्चिमेकडे. यंत्रयुगातून आलेली पहिलीवहिली समृद्धी उपभोगणा-या युरोप-अमेरिकेत हे घडणं स्वाभाविकच. गेल्या दशकभरात या दोन्ही खंडात उपभोगवादाविरोधातल्या जनचळवळींना वाढता पाठिंबा मिळतो आहे. खरेदीचा विस्फोट होणा-या थॅन्क्स गिव्हिंग,ख्रिसमसच्या मेगा डिस्काउंट सेलच्या विरोधात ब्लॅक फ्रायडे, नो शॉपिंगसारख्या चळवळी सुरू झाल्या आहेत. नो सोडा, नो प्रोसेस्ड फूड असे मार्ग शोधले जात आहेत. कोणी निसर्गाकडे परत चला म्हणतात, कोणी स्मॉल इज लेस किंवा रिच लाइफविथ लेस स्टफ म्हणतात. वैयक्तिक प्रयत्नही अनेक आहेत. साधेपणात समृद्धी मानायला लागलेली सामान्य माणसं. काही आलिशान घरांचा त्याग करून दीडेकशे चौरस फुटांच्या घरात, बॅकपॅकमधे मावेल इतक्याच सामानावर राहतात. काही जण एकही ‘लेबल’ न वापरण्याचं, गरजेच्या अत्यावश्यक वस्तू सोडून काहीच खरेदी न करण्याचं ठरवतात. काटेकोर बजेटवर राहतात, क्रेडिट कार्डचा वापर बंद करतात.

- या सा-याचा आरंभबिंदू शोधता येईल का?

व्यक्तिगत स्तरावर हे अवघड आहे, पण या  ‘लेस स्टफ’च्या मोहिमेला सामाजिक स्तरावर आवाज दिला तो एका गाजलेल्या लघुपटाने. ‘स्टोरी ऑफ स्टफ’ ही अमेरिकन अॅनिमेटेड डॉक्युमेण्टरी. लहानशी, केवळ बावीस मिनिटांची.

ऐन लिओनार्द या अमेरिकन बाईंनी प्रचंड संशोधनानंतर बनवलेल्या या डॉक्युमेण्टरीबद्दल पुढच्या लेखात.

(लेख लोकमत ’मंथन’ पुरवणीमधे पूर्वप्रकाशित)

Smile, breathe and go slow.. एक

सगळा पसारा..
घरात सगळ्यांनाच सुट्टी आहे, लॉन्ग वीकेण्ड. त्यामुळे निवांत दोनेक तास हाताशी मिळाले आहेत. खूप काही मार्गी लावता येईल या वेळात. दिवाळी अंकांची थप्पी घरात आहे, अनेक न वाचलेल्या, रॅपरही न उघडलेल्या पुस्तकांनी भरलेली रॅकही हाताशीच आहे. आयपॅडच्या किंडल अॅपवर मिळालेली हजारो ईबुक्स. लिस्ट पाहूनच मनावरचं दडपण वाढतंय. कधी वाचणार हे सगळं? रोजचे पेपरही पूर्ण पाहिले जात नाहीत. महत्त्वाच्या लिंक्स फेसबुकवर शेअर करतंच कोणी ना कोणी. त्या वाचल्या जातात. मग फेसबुकवर चक्कर होते. तासभर जातोच. मग रूटीन असल्यासारख्या उघडलेल्या बाकीच्या खिडक्या. पिण्टरेस्ट, इस्टाग्राम, ट्वीटर. कोणीतरी ऑनलाइन भेटलं. मधेच व्हॉट्सअॅपवर मेसेजेस. लाइमरोड आणि मिन्त्रवरच्या ऑनलाइन सेलचा आज शेवटचा दिवस असल्याचा मेसेज पॉपअप होतो. जीमेल उघडलंच नाही, कारण अनेक मेल्सना उत्तरं द्यायची राहिलीत. हा एक ताण तर कायमच. निवांत वेळ बघता बघता उडून गेला. मनाच्या तळाशी अस्वस्थतेचा अजून एक नवा थर रचला जातो. मग सुरू होते चिडचिड. नुकतीच दिवाळीच्या निमित्ताने घराची आवराआवर काढली होती, त्यावेळी ‘आता यांचं काय करायचं नेमकं?’ असा हताश प्रश्न पडल्याने होती तशीच ठेवून दिलेली न वापरलेल्या वस्तूंची रास. त्यात कॉस्मेटिक्सपासून मातीच्या भांडय़ांपर्यंत आणि हातमागाच्या साडय़ांपासून हौशीने घेतलेली एक्झॉटिक पायपुसणी, बेडशिट्सपर्यंत बरंच काही. कशाकरता घेऊन ठेवलं हे आपण याला उत्तर नाहीच. मग आता उस्तवारीची जबाबदारी मनावर एक नवा ताण निर्माण करते आहे, तो का ङोपवत नाही? अगदी आत्तापर्यंत जेवण हा प्रकार किती सोपा होता. पोळी, भाजी, आमटी, भात, कोशिंबीर, चटणी. पण आता जगासोबतच स्वयंपाकघरही कधीच ग्लोबल झालं आहे. आज पोळीभाजी, उद्या अरेबिक स्टाईलचे मल्टीग्रेन पराठे, परवा ग्रील्ड तोफू, मग फक्त सूप आणि सॅलडच, रविवारी थाय करूया. या सगळ्यात फ्रीज, फ्रिजर खच्चून भरत जातात. ग्रोसरीची कामं अतोनात वाढतात. कोप:यावरच्या वाण्याकडे पटकन जाता-येता किंवा फोनवरही यादी देता येत होती. पण आता ते पुरत नाही. मल्टीनॅशनल क्युझिनला हवे असणारे पदार्थ ऑनलाइन शोधत राहणो सोयीचे होते. कुसकुस, किन्वाच्या रेसिपीज पाहाव्या की आपल्या स्थानिक ज्वारीच्या रव्याच्या, पनीरच्या, नाचणीच्या पहाव्या? चिया सीड्स चांगल्या हेल्थकरता, काय म्हणतात त्यांना हिंदी-मराठीत? स्थानिक पर्याय कोणता आहे त्यांना? फ्लॅक्स सीड्स म्हणजे आळशी की जवस? बसा शोधत. पिंटो बिन्स म्हणजे नेमकं काय? अगदी साधा चिवडा करायचा तरी वाटतं निशा-मधुलिकाच्या किंवा इतर फूड ब्लॉग्जमधे काही वेगळी टीप दिली असेल तर बघूया. जेवणाच्या ताटात सगळे रंग हजर आहेत का, छुप्या कॅलरीज, प्रोसेस्ड पदार्थ जास्त नाहीत ना झालेले, तेल नेमकं कोणतं. एरवी करायला आवडणारा स्वयंपाक आता या सतराशे भानगडींमधे सोपा आनंद घालवून बसतो आहे. घरातली अनुभवी, म्हातारी माणसं जे सांगतात तेच सल्ले, टिप्स व्हिडीओजवर बघत बसायचे, लहान मुलांकरता योग्य गेम्स, होमवर्क साइट्स शोधत राहायच्या, कागदाच्या चिटो-यावर लिहिलेल्या कामाच्या यादीऐवजी मोबाइल, लॅपटॉप वर टू डू लिस्ट स्टिकी नोट्सवर अपडेट करायच्या, आणि मग त्याच्या सतत वाजणा-या रिमाइंडर अलार्मचा ताण सोसत राहायचा. साध्या स्वयंपाकापासून फायनान्स-बजेटिंगपर्यंत प्रत्येक प्रश्नाची उत्तरं माहितीच्या जंजाळात धुंडाळत राहायची. जगाच्या दुस:या टोकाला आलेल्या त्सुनामीचे, भूकंपाचे, युद्धाचे दर मिनिटाचे हृदय विदारक अपडेट्स समोर पाहत राहायचे, ज्या मुला अगर मुलीसोबत आपण शाळेतल्या दहा वर्षांमधे एकदाही बोललो नाही त्यांनीे फॉरवर्ड केलेले जोक्स, ट्रिपचे फोटो न बघता डिलिट करत राहायचे. रिलॅक्स व्हायलाही टेक्नॉलॉजीचाच आधार घ्यावा लागतो; रिलॅक्स होणं म्हणजे काय तर आयपॉडवर गाणी ऐकणं नाहीतर फोनवर कँडी क्रश. कशाला मुळात हे सगळं? अस्वस्थता माहिती तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल नाही. अतीव जिज्ञासा, हाव यामुळे असमाधानीपणाकडे झुकणा-या मनस्थितीबद्दलची आहे. फेव्हरिट्सच्या फोल्डरमधे शेकडय़ांनी लिंक्स स्टोर केल्या आहेत. अगदी क्वचितच त्यातली एखादीही पुन्हा उघडून बघितली जाते. कितीतरी गोष्टी नंतर वाचू म्हणून सेव्ह करून ठेवल्या आहेत. डोक्यात आलेल्या लिहिण्याच्या अनेक कल्पना एके ठिकाणी नोट डाउन केलेल्या आहेत, त्यातलं दहा टक्केही प्रत्यक्षात आलेलं नाही. असंख्य गाणी, करू कधीतरी म्हणून जमवलेली फ्लॉवर क्राफ्टची पुस्तकं, स्टेन ग्लास पेंटिंगकरता काचा असं इतकं जमवून शेवटी फावला वेळ मिळाला की घालवला कशात जातो आहे तर सोशल मीडियावर. तिथून काहीच मिळत नाही असं नाही. हजारो मुव्हीज, डॉक्युमेंटरीजचा, ईबुक्सचा खजिना उपलब्ध होतो, अगदी ब्लॉग्जवरूनही खूप काही खाद्य मिळतं, पिंटरेस्टसारख्या साइटवर सुंदर आर्ट, क्राफ़्टसंदर्भात प्रेरणादायी गोष्टी मिळत राहतात. पण हे सगळं रिचवायलाच जमत नाहीये. सगळं जमवत राहायचं, मग आधी जमवलंय त्याचं काय, ते कधी ऐकणार, पाहणार, करणार? सगळं नुसतंच भराभर गिळत राहायचं. यात रवंथ कुठेच होत नाहीये. हल्ली बरीचशी आर्ट एक्ङिाबिशन्सही ऑनलाइन बघितली जातात. आर्टिस्ट्स, लेखक, कलाकारांच्या मुलाखतीही ऑनलाइन वाचायच्या. स्काईपवर भेटी घ्यायच्या. वेळ नाही या सबबीखातर गोष्टी बघायचं, अनुभवायचंही टाळलं जात आहे. व्हच्यरुअल माहिती मिळते आहे. घरात कुठे ना कुठे सतत लॅपटॉप, डेस्कटॉप, गाणी, टीव्ही, फोन, वायफाय चालू असतं. सतत कनेक्टेड असतो आपण. बाहेरच्या जगाशी. सगळंच अती झालं आहे. सोशल मीडियात वावरणं, ईमेल्सना वेळच्या वेळी उत्तरे देणं, मेसेजेस चेक करणं टाइमलाइनवर शेअर केले गेलेले व्हिडीओज बघणं, पोस्ट्स वाचणं, लाइक करणं किंवा आलेल्या प्रतिसादांना धन्यवाद देणंसुद्धा मनावर ताण आणतं. कदाचित अती तिथे माती हेच खरं. काहीही करायला घ्या, असंख्य पर्याय समोर असतात सतत. वाचन, विचार, खरेदी, हॉटेल्स, रेस्तां, कपडे, करिअर, हॉलिडेज अगदी रिलॅक्स होण्याचेही कितीतरी पर्याय. दर क्षणी निर्णय घेण्याचा, अपडेटेड राहण्याचाही ताण. याला फक्त टेक्नॉलॉजीचं अॅडीक्शन जबाबदार असेल का? - नाही बहुतेक. मनाच्या तळाशी सातत्याने रचत गेलेल्या अस्वस्थतेच्या थरांखाली मनाची एकाग्रता उद्ध्वस्त झालेली आहे. ते एकदा इथे स्थिरावायचा प्रयत्न करतंय, एकदा तिथे. तसं पाहता बोट ठेवण्यासारखं काहीच झालेलं नाही. कामे, वैयक्तिक नाती व्यवस्थित निभावली जाताहेत. टेक्नॉलॉजीची मदत त्याकरताही होतच असते. पण मनाला ठणका लागलाय. नको नको वाटतं कधीकधी. किती धावणार आपण? आणि कुठे निघालो आहोत नक्की? भस्मासुरासारखं सगळं घाईघाईने गिळंकृत करून नक्की काय मिळवायचंय आपल्याला? - अशा प्रश्नांनी अस्वस्थ असाल, घुसमटून गेला असाल तुम्हीही, तर पश्चिमेकडून एक झुळूक येते आहे. खरंतर ती आपल्या पूर्वेचीच, पण येते आहे ‘तिकडून’. या नव्या जीवनशैलीचं ब्रीद आहे Smile, breathe and go slow अट एकच. वस्तूंचा सोस, वेगाचा हट्ट सोडायचा आणि अखंड धावत सुटलेल्या जगाच्या बसमधून पुढल्या स्टॉपला खाली उतरून जायचं. अशा खाली उतरून गेलेल्या, आनंदाने मागे राहिलेल्या माणसांना गवसणारा नवा सुंदर, साधासा, निर्मळ आनंद शोधण्याची ही सफर.. (लोकमत ’मंथन’ पुरवणीमधे पूर्वप्रकाशीत.)

Monday, April 04, 2016

शर्वरीच्या कविता

गेले दोन-तीन दिवस ’शर्वरीच्या कविता’ आसपास आहेत. 'ऋतूरंग’च्या अरुण शेवतेंनी त्यांच्या मुलीवर, शर्वरीवर लिहिलेल्या कविता. बापाने मुलीवर, मुलीकरता लिहिलेल्या. फ़ार गोड, साध्यासुध्या, मनात खोलवर उतरणा-या लहान लहान ओळी. 
या आधी गुलझारांच्या ’बोस्कीच्या कविता’ वाचल्या होत्या. त्यातला लोभस कोवळेपणा कधीही जून न होणारच नाही असा. ’शर्वरीच्या कविता’ पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा मी गेले होते. गुलझार आले होते. त्यांनी त्यावेळी ’शर्वरीच्या कविता’ ऑन द स्पॉट त्यांच्या खास शैलीत हिंदीमधे अनुवादित केलेल्या ऐकतानाच जाणवलं जातकुळी किती सारखी आहे दोन्ही बापांच्या मनातल्या मुलीवरच्या प्रेमाची.
’फ़ादर्स डे’ च्या दिवशी लेकीला काय भेट द्यावी या विचारात असताना अचानक सुचलेली यातली पहिली कविता. “खरंच सांगतो तू जन्माला येणार म्हणून माझा जन्म झाला”.. आणि मग हा प्रवास “या जगात मी नसताना तुझी दुपार कशी असेल, तुझी संध्याकाळ कशी असेल या विचारानेच उन्मळून जातो..” इथवर येऊन पोचतो तेव्हा माझ्यातल्या मुलीचं मन गलबलून जातं. 

नुकत्याच हात सोडून एकट्यानेच निघून गेलेल्या माझ्या वडिलांच्या मनात कधीतरी असंच काहीसं आलेलं असणार..
जगातल्या सगळ्या मुलींच्या मनातली बापावरच्या प्रेमाची जातकुळीही एकच तर असणार.