Tuesday, April 26, 2016

Smile, breathe and go slow- तीन

‘द स्टोरी ऑफ स्टफ’

वस्तू नेमक्या येतात कुठून? आणि जातात कुठे?

विकत घ्यायच्या, वापरायच्या आणि फेकून द्यायच्या. आपला संबंध वस्तूंशी इतकाच येत असला, तरी त्यांचं जीवनचक्र  इतकं मर्यादित नक्कीच नाही.

आपल्या अवतीभवतीच्या पसार्‍याला कारणीभूत होणार्‍या या वस्तू कुठून येतात आणि कुठे जातात या दोन प्रश्नांच्या दरम्यान अजूनही असंख्य प्रश्न असतात.

एक काळ. अगदी फार जुना नाही. वस्तूंचं मूल्य ती किती पिढय़ा वापरात आहे यावर ठरत होतं. आजोबांपासूनचा रेडिओ, ग्रामोफोन, वीस वर्षे जुना फ्रीज, दहा वर्षांपूर्वीची इस्त्री, पाच वर्षांपूर्वीचं वॉशिंग मशीन. आता हा काळ कमी होत होत सहा महिन्यांवर आला आहे.

सर्वसाधारण माणूस पन्नास वर्षांपूर्वी वापरायचा त्याच्या दुप्पट वस्तू आज वापरतो. वस्तूंचा पुनर्वापर ही संकल्पना आज हद्दपार झाली आहे. वस्तूंचा नियोजनबद्ध टाकाऊपणा, फसवा टिकाऊपणा त्याला कारणीभूत आहे. लवकरात लवकर निरु पयोगी ठरतील अशाच वस्तूंची जाणीवपूर्वक निर्मिती केली जाते. तंत्रज्ञान दर सहा महिन्यांनी निरु पयोगी होतं. ज्या वस्तू झपाटय़ाने खराब होऊ शकत नाहीत त्याबाबतीत ग्राहकांच्या सवयी, फॅशन, लूक बदलायचा. आधुनिकता टिकवण्याच्या आग्रहामुळे मग ग्राहकांची पावलं मॉलकडे वळतात. नवी खरेदी केली जाते.

रोज हजारो जाहिरातींचा मारा त्याकरताच. आपल्याला असमाधानी बनवणा-या जाहिराती.

आपले केस खराब आहेत, कपडे ट्रेण्डी नाहीत, ते मळके आणि जुनाट आहेत. फर्निचर कधीचं बदलायला झालंय, घराचा रंग उडालाय, तुमच्या आयुष्याचाच रंग उडालाय, तुम्ही जुने झाला आहात. हे सगळं सुधारू शकेल. त्याकरता तुम्हाला शॉपिंग करायला हवं. वस्तू खरेदी करायला हव्यात. त्यानंतर हे सगळं नीटनेटकं होऊ शकतं.
आनंदी वृत्ती विकत आणलेल्या वस्तूंच्या पसा:याशी इतकी निगडित खरंच असते का?

वस्तू विकत घेताना आपण त्यांचं योग्य मोल देत असतो का? ते जरु रीपेक्षा जास्त किंवा कमी तर नसतं?

पैशांव्यतिरिक्त नेमक्या कशाकशाच्या बदल्यात आपल्याला त्यांचं मूल्य चुकतं करायला लागतं? वस्तूंना जेव्हा आपण वापरत असतो त्याच वेळी आपल्यालाही कोणी वापरून घेत असतं का? वापरून झाल्यावर किंवा जुन्या झाल्यावर ज्या वस्तू आपण कच-यात फेकून देऊन आपल्या नजरेसमोरून नाहिशा करतो त्या कधीतरी खरंच नाहिशा होऊ शकतात का? फेकून दिल्यावर वस्तू नेमक्या कुठे जातात?

मुळात या गरज नसलेल्या प्रश्नांची जाणीव करून घ्यायची आपल्याला काही गरज आहे का?

याची उत्तरं जाणून घ्यायला आपल्याला वस्तूंची जीवनकहाणी माहिती करून घ्यायला हवी.

अॅन लेनर्ड या अमेरिकन बाईंनी प्रचंड संशोधनानंतर एक लघुपट बनवला. त्याचं नाव  ’स्टोरी ऑफ स्टफ’. आपल्या आयुष्यातली वस्तूंची अनावश्यक गर्दी आणि त्याखाली दबलेले अनेकानेक प्रश्न लोकांसमोर आणण्याचं पहिलं श्रेय या लेनर्डबाईंना जातं.

 जगभरातले वस्तू उत्पादनांचे कारखाने, विक्रीची ठिकाणं, वापरून फेकून दिलेल्या वस्तूंनी भरलेल्या कचरापट्टय़ा तिने धुंडाळल्या आणि त्यातून जन्माला आली वस्तूंच्या प्रवासाची ही कहाणी. छोटीशी, केवळ बावीस मिनिटांची, पण अतिशय परिणामकारक अॅनिमेटेड डॉक्युमेन्टरी.

कच्चा माल-उत्पादन-वितरण-विनियोग-विल्हेवाट हे वस्तूंचं जीवनचक्र  म्हणजेच भौतिकतेचं अर्थशास्त्र. या वस्तूंचे ग्राहक आणि प्रत्यक्ष वापरकर्ते/उपभोगकर्ते (कंझुमर) म्हणून आपला थेट संबंध फक्त विनियोगाच्या टप्प्यावर आहे असं आपण सोयिस्कररीत्या मानतो. उपभोगाच्या सोनेरी जाळ्यात आपण गुरफटलेले असतो. वस्तूंच्या निर्मितीत कच्च्या मालाच्या खाणी, जंगलं अशासारख्या नैसर्गिक स्रोतांमधून केला गेलेला उपसा असतो, याची जाणीव करून घेण्याचे कष्टही आपल्याला नकोसे असतात. उत्पादन-वितरण-उपभोग आणि मग त्यांना फेकून देणं अशा चक्रात पर्यावरणातील अनेक जिवांचं शोषण होत असतं याचं ज्ञान सोडा, साधी जाणीवही आपल्याला नसते.

गरज नसताना भारंभार वस्तू खरेदी करत सुटण्याची, कचरा वाढवण्याची, वस्तूंना फेकण्याची, पुन्हा जमा करण्याची मानसिकता रुजवून माणसाचं रूपांतर निव्वळ ग्राहकामधे करणारी व्यवस्था प्रथम अमेरिकेत आणि तिथून जगभरात रु जत गेली. नागरिक किती खरेदी करतो, खरेदीच्या चक्रात त्याचं योगदान किती जास्त आहे यावर नागरिकाचं महत्त्व, मूल्य ठरू लागलं. खरेदी करा, करत राहा तरच देश, देशाची अर्थव्यवस्था टिकून राहील, अशी परिस्थिती आल्यामुळेच नाइन-इलेव्हनच्या हल्ल्यानंतर हादरलेल्या अवस्थेतही अमेरिका आपली प्रार्थना, शोक मागे टाकून राष्ट्राध्यक्ष बुश यांचा सल्ला स्वीकारून जोमाने खरेदीला भिडली होती.

अशा या वस्तुवादी जीवनशैलीमागचं अर्थकारण, पर्यावरण, समाज संस्कृतीवर त्याचा होत असलेला परिणाम, राजकीय, धंदेवाईक पातळीवरून समाजात ग्राहक वृत्ती खोलवर मुरवण्याकरता केले जाणारे प्रयत्न, त्यावरच्या असलेल्या नसलेल्या उपाययोजना.. हे सारं स्टोरी ऑफ स्टफया लघुपटाने जगासमोर मांडलं.

डिसें.२००७ मध्ये अमेरिकेत शाळा, कॉलेजं, कार्यालयं, घरगुती समारंभ अशा अनेक ठिकाणी हा लघुपट प्रदर्शित झाला. ज्यांनी पाहिला त्यांनी तो इतरांपर्यंत पोचवला. आणि मग बघता बघता या लहानशा लघुपटातून एक प्रचंड चळवळ उभी राहण्याची सुरुवात झाली.

वस्तूंचा वापर, अतिवापर. त्यातच भौतिक, आत्मिक समाधान शोधत राहण्याच्या जीवनशैलीला उबगलेल्या असंख्य लोकांनी ही चळवळ पुढे चालवली. जगातल्या 228 भाषांमध्ये हा लघुपट अनुवादित केला गेला. लघुपटातून पुढे इतरही मालिका निर्माण झाल्या. पाण्याच्या बाटल्यांपासून सौंदर्य प्रसाधनं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्याही कहाण्या लोकांसमोर आल्या. बघणा:या अनेकांनी त्यांच्या कहाण्या, वैयक्तिक पातळीवरचे प्रयत्न या चळवळीला जोडून घेतले. ब्लॉग्जच्या माध्यमातून या कहाण्या प्रसिद्ध होत गेल्या.

निसर्गाचा -हास करून, स्वस्तात श्रम विकणार्या बालमजुरांचं शोषण करून वस्तू निर्माण होतात. त्याचं खरं ‘मूल्य’ त्या वस्तूला लावलेल्या किमतीच्या लेबलपेक्षा कितीतरी जास्त असतं, हे कधी आपल्या ध्यानातही येत नाही. आणि इतकं करूनही आपण पैसा मोजून विकत घेतलेल्या वस्तूंच्या बदल्यात आपलं स्वास्थ्य, आनंद, सुरक्षितता पणाला लावत असतो. अगदी झोपण्याकरता डोक्याखाली घेतलेल्या सिंथेटिक फायबर असलेल्या मऊ मऊ उशांमधून बाहेर पडणारे न्यूरोटॉक्सिन असो, आपल्या मुलांना पॅकेज्ड फूड, कॅण्ड ज्यूस, स्नॅक्समधून मिळणारं शिसं असो. अशा अनेक वस्तूंच्या कहाण्या.

पर्यावरणाचं नुकसान, सामाजिक अन्याय, आरोग्याला धोका याला कारणीभूत आहे. वस्तूंचं अतिरेकी उत्पादन आणि अपरिमित उपभोगाची आपल्याला लागलेली सवय. त्यामुळेच घर, मित्र, नाती, संवाद, गाणी, निसर्ग या साध्या, सहजप्राप्त आनंददायी गोष्टींकडे दुर्लक्ष करून माणसं ग्राहक बनतात, आणि आपला आनंद वस्तूंच्या असण्या-नसण्याशी जोडतात. ही सवय सोडायची असं आपण ठरवलंच तर ते नेमकं साध्य कसं होणार? खरंच शक्य होईल का ते? कोणी केलं आहे का तसं? तर हो. अनेकांनी तसं केलं आहे, अनेक जण तसं करण्याच्या प्रयत्नात आहेत.

कच-याच्या अतिरेकावर उतारा म्हणून स्वीकारलेली कचरामुक्त जीवनशैली. भौतिक आणि मानसिक कसलाच कचरा साठवून ठेवायचा नाही. देऊन टाकायचा, फेकून द्यायचा किंवा त्याचा पुनर्वापर करायचा. आहेत ती साधनं गरजेपुरतीच रोजच्या आयुष्यात वापरायची. आपली शक्ती, ऊर्जा जास्त क्रियाशील, कृतिशील आणि सर्जनशील कामांकरता राखून ठेवायची.

ज्यांना प्रश्न पडले त्यांनी ते सोडवण्याचे प्रयत्न केले. काहींना उत्तरं मिळाली, काहींना अजून प्रश्न पडत गेले उत्तरांचा मागोवा घेताना. उत्तर सोपं नाही. एकेरी नाही, रेडिमेड नाही. पण ते आहे. प्रत्येकाकरता ते वेगळं आहे कदाचित.

- नेटाने असे प्रयत्न करू पाहणा:या काही व्यक्तींची, त्यांच्या प्रयोगांची, त्यांना मिळालेल्या यशपयशाची कहाणी आता यापुढच्या लेखांमध्ये..
--
(*’स्टोरी ऑफ़ स्टफ़’ हा लघुपट आता मराठीतही आणला गेला आहे. इंटरनेटवर पहाण्याकरता तो उपलब्ध आहे.)

पुढच्या भागात-
 नादुरुस्त टीव्ही किंवा फ्रीज दुरु स्त करण्यापेक्षा तो बदलून नवा घेणं आता का आणि कसं फायदेशीर बनवलं गेलं आहे?
 बुटांपासून ते सेलफोनपर्यंत अनेक वापरातल्या गोष्टी चांगल्या स्थितीत असतानाही आपल्याला त्या बदलणं का आणि कसं भाग पाडलं जातं?
 आपल्याला मॉलमधे सवलतीच्या योजनेत आश्चर्यजनक स्वस्त दरात मिळालेल्या वस्तूची किंमत हैतीमधल्या कारखान्यातले कामगार, कॉन्गोमधले खाण कामगार, भारत आणि चीनमधले बालमजूर या प्रत्येकाने आधीच मोजलेली असते. त्यांच्या आरोग्याची, सुरक्षित जीवन जगण्याच्या हक्काचं मोल चुकतं करून! हे कधीतरी आपल्या ध्यानी येतं का?

(लेख लोकमत ’मंथन’ पुरवणीमधे पुर्वप्रकाशित)

No comments: