बिनपैशाचं सुख
कोणतीही चळवळ सुरू व्हायला निमित्त लहानसेच झालेले असते. एखाद्याच्या आयुष्यातली लहानशी घटना त्याला काहीतरी करायला कारणीभूत ठरते आणि मग अनेकांना त्यात आपले प्रतिबिंब दिसायला लागते.
अनेकदा या चळवळी उभ्या राहतात एखाद्या नको इतक्या प्रमाणात प्रसारित झालेल्या गोष्टीच्या विरोधात, काउन्टर इफेक्टच्या स्वरूपात.
जशी अमेरिकेतल्या ‘खरेदी करा, करत राहा. कर्ज काढा, पण खरेदी करा.’ या वावटळीच्या विरोधात उभी राहिलेली ‘खरेदी करू नका’ चळवळ.
जीवनावश्यक सोडून इतर कोणत्याही वस्तू विकतच घ्यायच्या नाहीत ही चळवळ फार जुनी नाही. इंटरनेटवरच्या ब्लॉगजगतात फार तर गेल्या चार-पाच वर्षांमध्ये मूळ धरलेली आणि वेगाने फोफावत गेलेली ही चळवळ. त्याला पुढे अनेक शाखा, उपशाखा फुटल्या. बाय नथिंग चॅलेंज, लिव्हिंग ऑन अ बजेट हे या चळवळीचेच भाग.
2008-09 च्या सुमारास वैयक्तिक पातळीवर हे प्रयोग सुरू झाले. अमेरिकेतल्या आर्थिक मंदीचा हा काळ.
न चुकवता आलेल्या वैयक्तिक कर्जांच्या, क्रेडिट कार्डावरच्या थकबाकीच्या ओझ्याखाली अडकलेले अनेक होते. यांच्यापैकी काहींनी नाइलाजास्तव आलेल्या शहाणपणापोटी का होईना, कर्जफेडीच्या जाळ्यातून बाहेर येण्याकरता काहीही खरेदी न करण्याचे चॅलेंज उचलले. काहींनी वर्षभराकरता, काहींनी फक्त सणासुदींच्या महिन्यांपुरते, काहींनी अक्षरश: डीटॉक्स डायेट असावे तसे खरेदीचे रक्तात भिनलेले विष उतरवायला सुरुवात केली.
24 तास तरी काहीही विकत घ्यायचे नाही, ही सुरुवात. मग थोडे जमू लागल्यावर एक आठवडा, एक महिना आणि मग एक वर्ष ‘बाय नथिंग’चे व्रत अंगीकारले. आता त्यांच्याकरता हीच जीवनशैली बनलेली आहे.
- मग सुरू झाली या वाटेवरले अनुभव शेअर करण्याची धडपड!
किती यश मिळते, काय अडचणी येतात, भरमसाठ खरेदीच्या जन्मजात मोहावर मात करण्याचे प्रयत्न नेटाने कसे निभवायचे, होणारे फायदे, घरच्यांचा, मित्र-मैत्रिणींचा त्याला लागणारा हातभार. असे सगळे मग ब्लॉग्जमधून लिहिले जाऊ लागले. आपल्यावरच्या कर्जाचे ओझे, आपली गेल्या काही वर्षांतली खरेदीची, क्रेडिट कार्डाची बिले, ढासळलेल्या आर्थिक नियोजनाचे आकडे हे सगळे सगळे खरेखुरे जाहीर होऊ लागले.
दारूचे व्यसन सोडण्याच्या प्रयत्नात जे टप्पे सामोरे येतात ते सगळे या खरेदीच्या व्यसनाला सोडवतानाही येत असतात आणि त्यामुळे यातही आप्त सुहृदांची साथ, त्यांच्यासोबतचे शेअरिंग मदतीला येते, असा त्यांना अनुभव अनेकांना येत गेला. तो सातत्याने लिहिला जाऊ लागला.
बघताबघता असे अनेक वैयक्तिक ब्लॉग्ज शृंखलेत गुंफले गेले आणि त्यातून ‘मिनिमलिस्ट’ चळवळ उभी राहिली, जिचे आज सोशल मीडियावर हजारो, लाखो सदस्य आहेत.
कॅनडाच्या केट फ्लाण्डर्सचा ‘ब्लॉण्ड ऑन अ बजेट’ हा ब्लॉग अशापैकीच एक. तिच्यासोबत कॅनडाची मिशेल मॅग्रा, यूकेची कॅथ केली, द मिनिमलिस्ट ब्लॉग लिहिणारा जोशुआ बेकर हे या चळवळीतले सध्याचे बिनीचे ऑनलाईन शिलेदार आहेत.
प्रत्येकाचे या जीवनशैलीकडे वळण्याचे कारण वेगळे असले, तरी त्यातून त्यांनी जे साध्य केले त्यात मात्र विलक्षण सारखेपणा आहे.
कॅनडाच्या केट फ्लाण्डर्सने आपल्या पहिल्या जॉबच्या पहिल्या सहा महिन्यांत स्वत:साठी अपार्टमेंट खरेदी केले आणि ते सजवण्याकरता जी खरेदी सुरू केली तिला अंत नव्हता. फर्निचर, होम डेकॉर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. यातल्या कित्येक गोष्ती तिच्याकडे आधीपासून होत्या, तरी नाविन्याच्या हौसेपायी ती भारंभार खरेदी करत सुटली. लॅपटॉप, कार, म्युङिाक सिस्टीम, इ-रीडर अशा अनेक गोष्टी.. तिच्याकडे होत्या, तरी तिने नव्या घेतल्या.
आपले नवेकोरे घर आयकियाच्या कॅटलॉगसारखे किंवा कोणत्याही इंटेरियर डिझाइनच्या ऑफिसमध्ये लावलेल्या चित्रसारखे देखणो दिसते याचा तिला विलक्षण आनंद झाला!
- या आनंदाची धुंदी लवकरच उतरली.
तिच्या क्रेडिट कार्डाची बिले आल्यावर!
वरून लागणारा दंड टाळण्यासाठी जेवढी‘मिनिमम अमाउंट’ भरावी लागते, तेवढेच पैसे केटकडे शिल्लक होते.
..मग हा सिलसिला पुढचे सहा महिने चालू राहिला. त्यात अल्कोहोल, कॉफी, बाहेरून मागवलेल्या खाण्याची बिले, मित्र-मैत्रिणींवर बार-पबमधे उधळलेल्या पैशांची भर पडतच होती.
त्या दिवसांची आठवण काढताना केट आपल्या ब्लॉगवर लिहिते, ‘या पूर्ण काळात मी सतत दु:खी असल्याची भावना मनात होती. करत असलेल्या खरेद्यांची बिले सतत माझ्या नजरेसमोर नाचायची आणि तरीही मला स्वत:ला थांबवता येत नव्हते. शेवटी घरासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरता न आल्यामुळे घर गेले, घरातले सामान गराज सेलमधे विकावे लागले.’
- या कठीण काळातून जात असताना केटला कॉफीचे व्यसन लागले. एकदा फक्त टेकअवे कॉफीचे बिल चारशे डॉलर्स आणि सुपर मार्केटमधल्या अवांतर खरेदीचे बिल हजार डॉलर्स झालेले तिने पाहिले आणि ती उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली!
तिने ठरवले, की आता यातून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही.
काटेकोर बजेट आखून त्यातच सारे बसवायचे आणि लवकरात लवकर कजर्मुक्त व्हायचे असे ठरवून केटने त्याच रात्री ब्लॉग लिहायला घेतला:‘ब्लॉण्ड ऑन अ बजेट’
बघताबघता तिचे हे प्रांजळ अनुभवकथन जगभरात नावजले जाऊ लागले. केटच्या नावेत बसणारे अनेक जण होते. या वाचकांच्या सहकार्याने तिने जीवनावश्यक गोष्टींकरता एक ठरावीक बजेट तयार केले. त्यात दिवसाला एक डॉलरपेक्षा जास्त खर्च करायची मुभा नव्हती.
या बजेटचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केट करत होती. पण एका रात्रीत बदल घडत नाही. त्यामुळे सुरुवातीला तिने केलेले ‘पण’ बरगळले, शिक्षा म्हणून उपाशी राहायचीही वेळ आली, पण हळूहळू जमत गेले.
आज पाच वर्षांनी केट संपूर्ण मिनिमलिस्ट जीवनशैली जगते आहे. केवळ एका कारमध्ये मावेल इतकेच सामान तिच्याकडे आहे. तीन वर्षांत केटने संपूर्ण कर्ज फेडले, त्यानंतर ती जगभरात बॅक पॅकिंग करत फिरून येऊ शकली. तिचे आरोग्य सुधारले. कमीतकमी खाणे, कमीतकमी वस्तू वापरणे आणि जास्तीतजास्त जगण्याचा आनंद मिळवणे आज केटचे जीवनसूत्र बनले आहे.
एकेकाळी शॉपिंग केल्याशिवाय एक दिवसही काढू न शकणारी, कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेली केट सध्या
1 दोन वर्षे काहीही खरेदी न करण्याच्या ’डाएट’वर आहे.
2 तिच्याजवळ कपड्यांचे फक्त २८ जोड आहेत. त्यातले ९ रोजच्या वापरासाठी
3 एक कपडा फाटला/हरवला तरच दुसरा घ्यायचा असा नियम आहे.
4 रोज दोन तासापेक्षा जास्त वेळ फोनवर/सोशल मीडियावर खर्च करायचा नाही, अशा रेशनिंगवर आहे.
- आणि कधी नव्हती एवढ्या आनंदात आहे.
(लेख लोकमत ’मंथन’ मधे पूर्वप्रकाशित)
No comments:
Post a Comment