Thursday, January 10, 2013

साथी हाथ बढाना..


रामकिंकर बैज

काही वर्षांपूर्वी शांती-निकेतनला दिलेल्या भेटीत विश्वभारती विद्यापीठातील कला भवनाच्या प्रांगणात रामकिंकर बैज यांचे संथाळी कुटुंब भेटले होते. तिथेच आसपास कारखान्यातला भोंगा ऐकून लगबगीने कामाला पळणारे कामगार होते. एका भव्य वृक्षाच्या समोर त्या वृक्षाच्या उंच खोडाशी स्पर्धा करणा-या उंचीची डौलदार, शेलाटी सुजाता होती









हे सगळेजण आजूबाजूच्या खास शांतीनिकेतनी शिक्षीत, कलाप्रेमी, सुसंस्कृत भद्रलोकांच्या गर्दीत आज काहीसे उपरे वाटत असले, आज त्यांना जाळीच्या, कुंपणाच्या संरक्षणात ठेवल्याने परके वाटत असले तरी एकेकाळी ते इथल्या मातीतच जन्मलेले, इथल्या स्थानीक संस्कृतीशी नाते जोडलेले इथले मुळ रहिवासी होते. त्यांना रामकिंकर बैजने जन्माला घातले होते. रामकिंकर बैज. .बंगालमधल्या संथाळी लोकवस्तीचे आगर असलेल्या बांकुरामधे जन्मलेला आणि पौगंडावस्थेत प्रवेश केल्यापासूनचे आपलं सर्व आयुष्य शांतीनिकेतनामधेच व्यतीय केलेला, गुरुदेव रविन्द्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बोसांच्या छत्रछायेत आपली कलाकारकीर्द जोपासलेला आणि आपली तीव्र सामाजिक-राजकीय संवेदना आपल्या कलाकृतींच्या आविष्कारात जोपासणारा शिल्पकार रामकिंकर बैज..

रामकिंकर बैज यांनी साकारलेले, कलाभवनाच्या प्रांगणातले संथाळी कुटुंब, प्रौढ कष्टकरी नवरा-बायकोचे जोडपे, त्यांची मुलं, सोबतीने चालणारा एक कुत्रा अशा या शिल्पसमुहाला पाहून नजर आणि पाय खिळले नाहीत असा कलारसिक शांतीनिकेतनाने आजवर पाहीला नसणार. नंतरच्या काळात गरीब, श्रमजिवी कुटुंबाचे कष्ट, हाल-अपेष्टा साकारणारी अनेक चित्रं, शिल्प स्वातंत्र्योत्तर भारतात, सामाजीक जाणीव असणा-या कलावंतांनी निर्माण केली. मात्र रामकिंकर बैज यांचे हे संथाळी कुटुंब त्या सर्वांहून वेगळे, अद्वितीय. केवळ आद्य श्रमजीवी कुटुंब म्हणून हे संथाळी कुटुंब थोर ठरत नाही, श्रमजिवींचे हाल, कष्ट हुबेहूब साकारली म्हणून ते जिवंत ठरत नाही. रामकिंकर बैज यांनी या श्रमजीवी संथाळी कुटुंबाच्या श्रमांना ज्या अप्रतिम डौलाने, सुसंवादी मेळाने साकारले आहे, त्यांच्या श्रमांना जी प्रतिष्ठा, मान बहाल केला आहे तो अद्वितीय आहे.
मी जेव्हा हा शिल्पसमुह पाहीला तेव्हा या प्रथमदर्शनी मातीच्या वाटणा-या, स्थानिक दगडमाती, खडी आणि सिमेन्ट यांच्या मिश्रणातून बनवलेल्या नैसर्गीक खडबडीत पृष्ठभागाच्या शिल्पावर उलटून गेलेल्या सत्तर वर्षांच्या पावसापाण्याचे, उन्हाचे स्पष्ट आघात उमटलेले होते. लॅटराइटची सच्छिद्रता अधीकच ठळक झाली होती. कॉन्क्रिटमधून खडी निखळत होती, शिल्प निश्चितच सुस्थितीत नव्हते. मात्र तरीही त्या शिल्पसमुहाने पायांना आणि नजरेला खिळवून ठेवले.
मुळात १९३८ साली हे जेव्हा इथे उभारले गेले असेल तेव्हा आजूबाजूच्या स्थानिक संथाळी आदीवासींच्या, इथल्या मातीतल्या अनागरी संस्कृतीशी हे किती एकजीव असणार हे कोणी वेगळे सांगायची गरजच नव्हती. जणू साठ-सत्तर वर्षांपूर्वी, इथल्या पायवाटेवरुन दिवस कलायला आल्यावर लगबगीने आपल्या झोपडीकडे परतणाने कष्टाळू संथाळी कुटुंब चालत्या जागी, उचललेल्या पावलांनिशी कालौघात गोठून राहीले होते. त्यातली डोक्यावर टोपली घेतलेली, आपल्या डाव्या हाताने कमरेवरचे मुल सांभाळणारी संथाळी स्त्री, तिच्या बाजूने चालणा-या पुरुषाच्या खांद्यावर बांबूची काठी, त्याला अडकवलेल्या टोपलीतल्या तराजूला लोंबकळणारा लहान मुलगा, सोबतीने चाललेला इमानी कुत्रा. शिल्पसमुह भव्य आहे. प्रत्यक्ष आकारापेक्षा दीडपटीने मोठे यातले आकार आहेत. कदाचित त्यामुळेही हे सर्वसामान्य कुटुंब आत्ताच्या या वास्तव जगातले वाटता तेव्हाचे वाटते, जेव्हा रामकिंकरने त्यांना निर्माण केले.
संथाळी कुटुंबाची अभावग्रस्तता, दारिद्र्य वेगळे वर्णन करायची गरज नाही. जेमतेम लजारक्षणापुरते वस्त्र त्यांच्या अंगावर आहे. बाजारहाटाच्या दिवशी बहुधा आपल्या श्रमाने पिकवलेला काही भाजीपाला विकायला हे जोडपं भल्या पहाटे रवाना झालं असणार. दिवसभर उन्हात बसून जे काही विकल गेलं त्यातनं तेल-मिठ विकत घेऊन आता दिवस कलायला आल्यावर चटचट घराकडं परतून, पोटाला शिजवून चार घास खायची घाई झालेलं हे कुटुंब. बाईच्या डोक्यावरच्या टोपलीत जे सामान आहे त्यात गुंडाळलेली एक चटई आहे. बाजारात सामान मांडायला, दुपारी लवंडायला उपयोगी चटई. पश्चिम बंगालातलं जमीन कसणारं हे संथाळी कष्टकरी जोडपं. रामकिंकर जन्मला होता अशाच एका कुटुंबात. शिल्पसमुहातली हुबेहूब वास्तवता प्रत्यक्ष जगण्यातून जन्मलेली होती. रामकिंकर बैज या शिल्पकाराला नंतरच्या काळात ज्या अनेक गोष्टींमुळे नावाजले गेले, ज्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे ते भारतातील एक महान, सर्जनशील वास्तववादी शिल्पकार म्हणून ओळखले गेले ती सारी वैशिष्ट्ये या संथाळ कुटुंबामधे दृगोच्चर होतात. या शिल्पसमुहात एक विलक्षण जिवंत नाट्यमयता आहे. हे शिल्प केवळ आयुष्यातला एक क्षण जिवंतपणे गोठवून ठेवणारे नाही, एक संपूर्ण जीवनकहाणी यात आपल्या नजरेसमोर जशीच्या तशी साकार होते. या कहाणीला एक सुरुवात आहे आणि अंतही आहे. उचललेल्या पावलांची गती, गुडघ्यांमधून वाकलेले पाय, हातांचे स्नायू, मानेचा बाक यातून हालचालींमधला अधिरेपणा, घरी परततानाची लगबग, दिवसभराच्या श्रमांमुळे आलेला थकवा, जीवनातला अभाव, काहीशी दैवाधिनता आणि या सर्वावर मात करणारी अंगभूत उर्जा, श्रमातून पोट भरताना उपजलेला आत्मविश्वास, रग, जीवन रसरसून जगण्याची तरुण उर्मी, परस्परांमधला सुसंवादी मेळ आणि या सगळ्यातलं नाट्य बघताना रामकिंकर बैज यांच्या अप्रतिम शिल्पकारागिरीने मन चकीत होतं. सूर्यास्त व्हायच्या आत, आजूबाजूचा परिसर अंधारात बुडून जायच्या आत घर गाठण्याची या संथाळी शेतकरी कुटुंबाची जिद्द मनाला एक अजब दिलासाही देऊन जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या, आधुनिकतेकडे जाण्याची पावले उचलायला नुकती सुरुवात करणा-या भारतीय सामाजिक संस्कृतीचा इतिहास या संथाळी कुटुंबाच्या प्रवासात आहे.
शांतिनेकतनचा परिसर तुझ्या कलाकौशल्याने भरुन टाक- रबिन्द्रनाथांनी दिलेला आदेश तरुण रामकिंकरने शिरोधार्य मानला आणि मग इथे जागोजागी साकारली ही शिल्पे.. निसर्गात विलक्षणरित्या सामावून जाणारी, मानवी आयुष्याची कहाणी प्रतिबिंबीत करणारी शिल्पे आणि कलाकृती. संथाळी लोकजीवन अजरामर करुन ठेवणारी, जिवंत, सळसळत्या कष्टकरी आयुष्याची नाट्यमय शिल्पे. कला फक्त नजरेला सुखवायला नाही, तिचा उद्देश केवळ रसिकांचे मन रमवणे इतकाच नाही. कला हे जीवनाचे एक अंग आहे, जीवन त्यात प्रतिबिंबीत व्हायलाच हवे असे मानणा-या, कला आणि सामाजिकता, कला आणि राजकीय विचारसरणी यांचे अभिन्नत्व आपल्या कला-आविष्कारात करणा-या कलावंतांच्या मांदियाळीतील आद्य कलावंत रामकिंकर बैज. बंगाली राष्ट्रीयत्वाशी, इथल्या मातीशी जोडलेली त्यांच्या कलेची नाळ कधीही तुटली नाही, मात्र तरीही आधुनिक जगाची, युरोपियन शैलीची कलाभाषाही त्यांनी आपलिशी केली होती.
पाश्चात्य शिल्प-चित्रभाषा समजावून घेऊन ती आपल्या कलाविष्कारात अंतर्भूत करणारा पहिला आधुनिक भारतीय शिल्पकार. आपली राजकीय, डावी विचारसरणी आपल्या कलाकृतींमधून निर्भिडपणे मांडणारा, शांतीनिकेतनातल्या सभ्य, भद्रलोकांच्या नाराजीला धुडकावून लावणारा हा पहिला विद्रोही कलाकार. शांतीनिकेतनातली आपली शिल्पे जगभरातल्या बाजारपेठेत मांडली जाणार नाहीत, स्थानिक दगडमातीच्या मिश्रणातील ही शिल्पे दीर्घकाळ टिकणारही नाहीत याची जाणीव रामकिंकर यांना नव्हती का? निश्चितच होती. पण स्वत;च्या आनंदाकरता, स्वत:च्या विचारसरणीला अनुसरुन केलेले कलावंताचे काम त्याला पैसा नाही पण समाधान मिळवून देते, आणि ते चिरकाल टिकते असे मानणा-या पिढीतला हा शेवटचा कलाकार.
ऋत्विक घटक यांनी रामकिंकर बैज यांच्यावर बनवलेल्या लघूपटामधे एक विलक्षण संवाद आहे. रामकिंकर यांच्या झोपडीसदृश घरातल्या शिल्पशाळेत धुवांधार पाऊस सुरु झाला की छतातून पाण्याची गळती सुरु होई. दगडामातीच्या शिल्पांवर होणारा अभिषेक थांबवायला रामकिंकर आपली आगामी प्रदर्शनाकरता रंगवलेली काही तैलचित्रे, जी विकली जाऊन काही पैसे मिळण्याची शक्यता असे, ती तैलचित्रे छतावरच्या गळणा-या छिद्रांवर लावून ठेवत. घटक ते दृश्य बघून थक्क झाले. ही प्रदर्शनात ठेवण्याकरता केलेली तैलचित्रे असं केल्याने खराब नाही का होणार असे ते वृद्ध रामकिंकरना विचारतात. रामकिंकर त्यांना सांगतात, तैलरंग पाण्याने खराब नाही होत. आणि झाले तर झाले. छतातली ही भोकं बुजवायला, छत शाकारायला गवत लागतं, ते जास्त महाग आहे, मला परवडत नाही.
स्वतंत्र भारताच्या संपत्तीचा साठा सामावून घेणा-या भारतीय रिझर्व बॅन्केच्या दिल्ली येथील प्रमुख, भव्य इमारत संकुलाच्या प्रवेशद्वाराशी रामकिंकर बैज यांच्या हातातील छिन्नीच्या कौशल्यातून साकार झालेली अप्रतिम कलात्मक यक्ष-यक्षिची दोन शिल्पे आहेत. कुबेराचा खजिना सांभाळणारे हे यक्ष-यक्षी. ज्या हातांनी त्यांना निर्माण केले त्याच हातांनी गळणा-या छतातील छिद्रे बुजवायला उपयोगी पडणारी तैलचित्रेही रंगवली. जीवापाड श्रम करुन जेमतेम पोट भरण्याइतकंही कमावू शकणारे, तरीही श्रमाला परमेश्वर मानणारे संथाळी कष्टकरी जोडप्याला मानाने, प्रतिष्ठेने शांतीनिकेतनात उभारणारे कलात्मक हातही हेच. रामकिंकर बैज यांचे.
<    राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयातर्फ़े रामकिंकर बैज यांच्या शिल्प-चित्रकलेचा संग्रह पहाण्याची अनमोल संधी या नोव्हेंबर महिन्यात कला-रसिकांना प्राप्त झाली आहे. मुंबईच्या एनजिएमएमधे रामकिंकर बैज रेट्रोस्पेक्टीव्ह सध्या भरलेले आहे

लोकमत ’मंथन’च्या ’चित्रभाषा’ सदराकरीता प्रथम प्रकाशित. 


     

No comments: