Thursday, January 10, 2013

रेन्वा

चित्रकार चित्र नेमका काढतो तरी कसा हा सामान्य रसिकाच्या मनातला सनातन प्रश्न. यात चित्र काढण्यामागची तांत्रिकता जाणून घेण्यापेक्षा चित्र-निर्मितीमागच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या, कशा जन्मतात हे त्याला समजून घ्यावसं वाटतं. चित्रांमधले आकार आले कुठून, त्यातले रंग, त्यांचा पोत, कुठून येतं हे सगळं. चित्र आवडलं की हे प्रश्न मनात उमटणं अगदी साहजिक. आवडत्या चित्राबद्दलची आत्मियता मग त्याला चित्रकारापर्यंत नेऊन पोचवते. मात्र प्रत्यक्ष चित्रकारालाही त्याच्या नेणीवेच्या पातळीवर घडून गेलेली ही निर्मितीप्रक्रिया नेमकेपणाने शब्दांमधे उलगडून सांगता येतेच असं नाही.
शा वेळी दुसरा एखादा तितकाच सर्जनशील, प्रतिभावंत कलाकार जेव्हा त्याच्या स्वत:च्या माध्यमातून हे सनातन कोडे उकलायचा प्रयत्न करतो तेव्हा अद्भूताचा अनुभव येतो.

गेल्या आठवड्यात फ़िल्म फ़ेस्टीवलमधे रेन्वा हा सिनेमा पहायला मिळाला. अभिजात इम्प्रेशनिस्ट चित्रकार रेन्वाच्या आयुष्यावरचा हा तितकाच अभिजात सिनेमा. मनातल्या असंख्य अनुत्तरीत प्रश्नांना उत्तरे मिळवून देणारा, अद्भूताचा उलगडा व्हावा असा हा सिनेमा.

फ़्रेन्च चित्रकार पियर-ऑगस्त रेन्वा. समृद्ध, झळाळते रंग, नैसर्गिक छाया-प्रकाशाचा मनोरम खेळ ही खास इम्प्रेशनिस्ट वैशिष्ट्ये घेऊन नटलेले रेन्वाचे कॅनव्हास सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत त्याने चितारलेल्या सौंदर्यपूर्ण नग्न स्त्री-देहांकरता. सौंदर्यपूर्ण न्यूड्स कॅनव्हासवर रंगवण्याची रुबेन, टिशियनची परंपरा अधिक सहज, अधिक नैसर्गिक आणि अर्थातच सुंदर, इम्प्रेशनिस्ट शैलीत पुढे नेली रेन्वाने. रेन्वाची न्यूड्स आकर्षक सहजतेनं मानवी त्वचेवरचे सूर्यकिरणांचे नैसर्गिक रंग खुलवतात, भोवतालच्या निसर्गात ती एकरुप होऊन जातात.
 चित्रकाराचे चित्र कॅनव्हासवर जितके सहज, नैसर्गिक दिसते तितकेच ते काढण्यामागची त्याची मेहनत अपरंपार असते. चित्रातली सहजता एका रात्रीतून आलेली नसते. त्याकरता तो स्वत:शी, आयुष्याशी असंख्य वर्षं झगडलेला असतो. चित्रकार जेव्हा अशा साधनेत मग्न असतो तेव्हा त्याच्या कुटुंबियांचे, जवळच्या माणसांचे काय होते नेमके? आणि सर्वात महत्वाचे जिच्या प्रत्यक्ष देहावरुन, अस्त्तित्वातून कोरुन हे आकार चित्रकाराने कॅनव्हासवर जिवंत केले, त्या मॉडेलचे काय?
 रेन्वा आयुष्यभर श्वासविकाराने ग्रस्त होता आणि यात भर म्हणूनच की काय पण उत्तरार्धात त्याला -हुमेटॉइड आर्थ्रायटीसने घेरले. बोटांचे सुजलेले सांधे, पायावर उभे रहाता येणंही अशक्य. पण रेन्वा झगडत राहीला. बोटांना बॅन्डेज बांधून त्यात आपले ब्रश खोचून रंगवत राहीला. खूर्चीवर बसून प्रवास करत राहीला. एकामागून एक चित्र रंगवत राहीला. आता बास करा पापा, तुमचं वेदनांनी जर्जर शरिर हा चित्रनिर्मितीचा ताण नाही सहन करु शकत, असं आपल्या वडिलांना कळवळून विनवणा-या आपल्या मुलाला तो शांतपणे सांगतो- "वेदना संपतील एक दिवस, सौंदर्य चिरकाल टिकेल".

चित्रकार रेन्वाचा मुलगाही तितकाच अभिजात आणि प्रतिभावंत कलाकार. चित्रपटाच्या पडद्यावरची दृश्ये नैसर्गिक छाया-प्रकाशात चित्रित करणारा जागतिक किर्तीचा फ़्रेन्च दिग्दर्शक जॉं रेन्वा. रेन्वाच्या नंतरच्या काळातल्या अनेक, बेदर्स सारख्या गाजलेल्या, अभिजात पेंटींगमधली मॉडेल हीच पुढे जाऊन मुलाच्याही चित्रपटनिर्मितीमागची प्रेरणा ठरली. सिनियर रेन्वाच्या प्रतिभेने भारलेली आन्द्रे ज्युनियर रेन्वाच्या प्रेमात पडते, त्याला आपल्या प्रसिद्ध बापाच्या छायेखालून बाहेर पडून स्वत:चे स्वप्न शोधण्याची प्रेरणा देते. रेन्वा पिता-पुत्र आणि आन्द्रे यांच्यातले हे विलक्षण गुंतागुंतीचे, अनेक स्तरांचे नातेसंबंध कलावंताच्या अजब मनोव्यापारांचा मागोवा घेणारं ठरतं. कला-निर्मितीमागची रहस्यमय गुढांपैकी निदान काही गाठी तरी उलडतात.
 रेन्वासारख्या चित्रकाराची चित्रभाषा, त्याची आणि त्याच्या सिनेदिग्दर्शक मुलाची मनोभाषा समजावून घ्यायला दृश्यभाषेची मदत व्हावी हा एक पोएटिक जस्टिसच आहे सामान्य चित्ररसिकाच्या दृष्टीने. चित्राची कहाणी ही अनेक अर्थांनी चित्रकाराची स्वत:चीच कहाणी असते शेवटी हेच खरं.

No comments: