Tuesday, April 26, 2016

Smile, breathe and go slow.. चार

अडगळ भोवतालची आणि मनातली!

 जानेवारी 2016 मध्ये फोब्जर्-लीडरशिप कार्यक्रमांतर्गत तिशीच्या आतील स्त्रियांची जी परिषद झाली त्यात ‘आम्हाला आमचे आयुष्य सोपे करायचे आहे’ हा निर्धार त्यात सहभागी झालेल्या सर्व धडाडीच्या, टॉप करिअरिस्ट तरुण स्त्रियांनी व्यक्त केला. त्या ते कसे साध्य करणार आहेत आणि असा निर्धार व्यक्त करण्यामागची त्यांची भूमिका नेमकी काय? यातील अनेकींनी ही साधी आणि सोपेपणाची क्लटरफ्री जीवनशैली जगायलाही सुरुवात केलेली आहे. त्यांचे स्वानुभव काय हे जाणून घ्यायला हवे.

आयुष्य साधेपणाने जगण्याचं ठरवणे म्हणजे आयुष्य पुरेपूर उपभोगण्याचा हक्क स्वत:ला नाकारणे हा होत नाही का? आयुष्याच्या शर्यतीतून बाहेर पडणं आहे का हे? हा प्रश्न यातल्या अनेकींना वारंवार विचारला गेला.
वस्तूंची खरेदी कमीतकमी करणे, आजूबाजूचा पसारा कमीतकमी करणे याचाच दुसरा अर्थ जीवनातला आनंद, उत्साह कमी करत नेणे असा अनेकांचा समज असतो. अपरिग्रह ही गोष्ट आपणही संन्यस्त वृत्तीशी जोडतच असतो.

प्रत्येकीचे उपाय, मार्ग, उत्तरे वेगवेगळी होती. त्यांच्या आजवरच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर, पुढच्या ठरवलेल्या दिशांवर ते मार्ग, त्यांची उत्तरे बेतलेली. मात्र त्यात एक समान सूत्र आहे.

'Their Roaring Thirties : Brutally Honest Career Talk From Women Who Beat The Youth Trap' या पुस्तकाची लेखिका डेनिस रेस्तोरी ही त्यांच्यापैकीच एक.

वयाच्या 28 व्या वर्षी डेनिसनी जेव्हा आयुष्यातली गुंतागुंत, तणाव कमी करायचं, साधेपणाने जगायचं ठरवलं तेव्हा तिला आता तू काम करायचं सोडणार का? करिअर सोडून देणार का असं विचारलं गेलं. कारण जर वस्तू खरेदी करायच्याच नाहीत तर पैसे कमवायचेच कशाला? आणि तणावाचे मुख्य कारण ‘करिअर’ हेच तर असते हा सर्वमान्य दृष्टिकोन.
डेनिसच्या मते नोकरी सोडून देण्याने तिचं आयुष्य सोपं होणार नव्हतं कारण मुळात गुंतागुंतीचं कारण ते नाही. तसं करण्याने उलट तिच्या आयुष्यातला आनंद कमी झाला असता.

उत्तर द्यायला सर्वात कठीण प्रश्न मग आता नेमकं काय करणार?

डेनिसने आयुष्य साधेपणाने घालवायची सुरुवात एका अतिशय सोप्या वाटणा-याा पण करायला अत्यंत कठीण गोष्टीपासून केली. तिने आपला ‘वॉर्डरोब’ तपासला आणि त्यात काही महत्त्वाचे बदल केले.

त्यातला पहिला होता- कपडय़ांच्या बाबतीत आपल्या आजीच्या ‘फ्रेंच’ जीवनशैलीचे अनुकरण.
म्हणजेच कपडय़ांच्या बाबतीत अतिशय चोखंदळ बनणे. मोजकेच परंतु उच्च अभिरुचीचे कपडे जवळ बाळगणे. जे जास्तीत जास्त टिकतील. कुठेही, कधीही वापरले तरी त्याचा ‘क्लास’ कमी न होणे.

हे वाचत असताना मला आठवलं कुलाबा कॉजवे किंवा बान्द्रय़ाच्या लिंकिंग रोडवरून, फॅशन स्ट्रीटवरून स्वस्तात मस्त मिळणारे ढीगभर कपडे आणण्याची एका वयातली गरज. नुसते कपडेच नाही. पर्सेस, चपला, बेल्ट, जंक दागिने अनेक गोष्टी. तिथे जाऊन खरेदी करून आलं की आपल्याकडे आता काय भारी वॉर्डरोब जमलाय, एकदम फॅशनेबल असं मनाला समाधान वाटे, जे जेमतेम आठवडाभर टिके. त्यानंतर मग कपाटात एकदा वापरून बोळा झालेले स्कर्ट्स, रंग फिका पडलेले कुर्त्यांचे ढीग जमा होत. चपलांच्या कपाटात पाय ठेवायला जागा नाही, पण ऐनवेळी कामाला येणार बाटाच्या दुकानातल्या दणकट चपलाच.

आई सांगून थकायची की बाई गं, मोजकेच पण चांगल्या क्वालिटीचे, शिवून घेतलेले कपडे असूदे जवळ. पुढे कालांतराने ते पटलं. ब्रॅण्डेड कपडे महाग वाटले तरी ते उत्तम टिकतात, त्यांची चमक कमी होत नाही. त्यात ‘क्लास’ असतो वगैरे.
आता ब्रॅण्डेड कपडेही केवळ परवडतात म्हणून भारंभार आणणे सुरू झाल्यावर मात्र चक्र  पुन्हा बिघडलं.

डेनिसने तिच्या आजीचं फॅशन स्टेटमेण्ट स्वीकारलं. एखादा एकदम हटके दागिना, रेशमी स्कार्फ, व्हिण्टेज ब्रोच, आगळ्या घडणीची अंगठी किंवा कानातले इतकंच पुरेसं असतं लक्षवेधी ठरायला. प्रत्येक लग्नात, समारंभाला ‘वेगळी’, कोणी न बघितलेली साडी किंवा नवा, महागडा ड्रेस अंगावर मिरवण्यापेक्षा ही युक्ती नक्कीच उपयोगाची.

दुसरी गोष्ट जी अनेक वेळा अनेकांनी सांगूनही ख-या अर्थाने वापरली जात नाही ती म्हणजे ‘नाही’ म्हणण्याचे महत्त्व.
‘नाही हा शब्द योग्य वेळी, योग्य ठिकाणी वापरता येणो हे आयुष्य साधे, सोपे करण्याच्या दृष्टीने, आतला, बाहेरचा तणाव, गुंतागुंत कमी करण्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा, जीवनावश्यक आहे ते तो प्रत्यक्ष वापरायला लागल्याशिवाय नाहीच कळत. नव्या वर्षाच्या कामाचं काटेकोरपणे केलेलं नियोजन का बारगळतं, अनेक नव्या योजनांचे संकल्प पुरे व्हायला कठीण नसतानाही अर्धवट का राहतात यामागचं एकमेव कारण म्हणजे ‘नाही’ म्हणायला न जमल्याने अनेक ऐनवेळी गळ्यात पडलेली कामं.

स्वानुभव सांगायचा तर ठरवलेल्या प्रोजेक्टवर काम चालू असतानाच मधेच एखादा लेख लिहिण्याचे काम अंगावर घेतल्याने, इंटरेस्टिंग व्यक्तीची मुलाखत घ्यायचा चान्स मिळाल्याचा मोह आवरणो कठीण झाल्यामुळे माझे हातातले नियोजित प्रकल्प वर्षानुवर्षे रेंगाळले आहेत. कामे वेळेत पूर्ण न होणे, त्यामुळे ताणतणाव वाढणे. आयुष्य गुंतागुंतीचे झाले आहे वाटायला हे पुरेसं असतं.

तिसरी गोष्ट जी वस्तूंच्या बाबतीत खरी तीच नातेसंबंधांच्याही. खंडीभर बॉयफ्रेण्ड्स, मित्रमैत्रिणींची गर्दी अवतीभवती करण्यापेक्षा मोजकेच, आयुष्य समृद्ध करणारे मित्रमैत्रिणी जोडणे, जे आहेत ते जपणे महत्त्वाचे मानणे. फेसबुकसारख्या व्हर्चुअल जगामधेही तीन-चार हजारांची मित्रयादी मिरवण्याचा शौक, शेकडो ग्रुप्स जॉइन करण्याचा उत्साह कालांतराने ओसरतो. अशी मित्रयादी सांभाळणे कठीण. प्रत्येकाने सातत्याने अपडेट केलेली स्टेटस, टाकलेले फोटो, ते आज कुठे जेवताहेत, कॉफी पिताहेत, त्यांच्या आयुष्यातल्या बारीक सारीक घडामोडी, घटना ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात काडीचाही फरक पडणार नसतो, त्या जाणून घेण्यात आपले कित्येक तास खर्च होणार, प्रतिक्रिया नोंदवणे, आलेल्या उत्तराला प्रत्युत्तर देणे, त्यांच्या एका ‘लाइक’ला उत्तर म्हणून सभ्यपणामुळे तुम्ही चार ‘लाइक’ देणे. या सगळ्याला अंत नाही.
प्रत्यक्ष आयुष्यातही हे तितकंच कठीण. इथेही आपले काही कमी ग्रुप्स जोडलेले नसतात. ऑफिसमधले, कॉलनीतले कमी म्हणून की काय शाळा-कॉलेजातलेही ग्रुप्स जे आता व्हॉट्सअॅप नावाच्या कटकटीमुळे पुन्हा तुमच्या आयुष्यात डोकावलेले असतात, एखादा रिडर्स क्लब असतो, जीममधला मित्रसमुदाय असतो, मॉर्निंग वॉकर्सचा ग्रुप असतो, भिशी असते, ट्रीप्स, प्रवासात ओळखी घट्ट झालेले असतात, जोडीदाराचे मित्र-मैत्रिणी तुम्हालाही चिकटलेले असू शकतात, ट्रेनमधले असतात.
रोजच्या आयुष्यातही अवती भवती भरपूर मित्र-मैत्रिणींची गर्दी असते ज्यातले खरे मित्र दोन टक्केही नसतात. इतरांशी संबंध राखण्याचा, घरी जाण्याचा, बोलावण्याचा, फोनवरून विचारपूस करण्याचाही एक ताण असतो जो झेपत नसतो. नुसती ही गर्दी आजूबाजूला असण्याचाही तो ताण असतो.

एकटं पडण्याच्या भीतीतून आपण आजूबाजूला ही गर्दी जमवलेली नाही ना याचा काटेकोर, स्पष्ट विचार करायला हवा. एकटय़ाने गोष्टी करण्यात, मग तो प्रवास असो, सिनेमा पाहणो असो, हॉटेलात जाणे असो. आपल्याला सोबत हवीच हा मनाचा हट्ट कमी केला तर एकटेपणाने या गोष्टी करण्यात किती मोठा आनंद, शांतता आहे, सोपेपणा आहे हे सहज समजून येईल.

अनेक नाती, मैत्री टॉक्सिक झालेली असतात, चिघळलेली असतात. ती बाळगून काही फायदा नाही उलट तोटा असतो. जगण्यातले अनारोग्य वाढते त्यांच्यामुळे.

जगण्यातील अडगळ दूर करायची तर या युक्त्या नक्कीच उपयोगी पडतील.

नीटनेटक्या, आवरलेल्या, कमीत कमी सामान असणाा-या घरात प्रसन्न, सकारात्मक वाटणो ही अत्यंत साधी, प्राथमिक, प्राचीन जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये, जीवनशैलींमध्ये समान मानली गेलेली गोष्ट.

जे घराचे तेच आयुष्याचे.

आवराआवर ही गोष्ट, पसारा कमीतकमी असणो, क्लटर नसणे ही गोष्ट जास्तीत जास्त नैसर्गिक जीवनशैलीच्या जवळ नेणारी आहे. निसर्गाशी स्वत:ला जोडलेले ठेवण्याकरता फार काही आगळेवेगळे, भव्यदिव्य करायची गरज नाही. फक्त पसारा आवरून ठेवायला हवा. भोवतालातला
आणि स्वत:च्या आतला.

(लेख लोकमत ’मंथन’पुरवणीमधे पूर्वप्रकाशित)

No comments: