Wednesday, May 02, 2012

सिनेमा सिनेमा..

मला सिनेमा बघायला आवडतो, त्यावर लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला आवडतं, जो सिनेमा पाहिलेला नाही त्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं, जे सिनेमे आवडले नाहीत, त्यांच्यावरही बोलायला आवडतं, ते का आवडले नाहीत त्याबद्दल विचार करायला आवडतं. थोडक्यात सांगायचं तर मला सिनेमा कसाही आवडतोच.
काही सिनेमे बुद्धीने बघायचे, काही नजरेने, काही मनाने. काही उगीचच.
काही सिनेमे कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही, काही सिनेमे नक्की का आवडले हे समजत नाही, समजावूनही देता येत नाही.
प्रत्येकाचा सिनेमा वेगळा, प्रत्येकाकरता सिनेमा वेगळा. एकच सिनेमा एकाला आवडतो, एकाला नाही. आपल्याला सिनेमा का आवडला हे कोणी कोणाला पटवून द्यायला जाऊ नये. दुस-याने सांगून सिनेमा समजत नाही, दुसर्‍याला आवडला म्हणून तिसर्‍याला आवडेलच असं नाही.
सिनेमाला जितका जबरदस्त नॉस्टेलजिया चिकटून असतो तितका इतर कोणत्याच गोष्टीला नाही. सिनेमाचा नॉस्टेलजिया म्हणजे खरं तर तो सिनेमा ज्या दिवसांमधे बघीतला, ज्यांच्यासोबत बघीतला त्यांचा नॉस्टेल्जिया असतो. सिनेमाला आजूबाजूच्या जगाचे संदर्भ चिकटून असतात आणि आवडत्या सिनेमांच्या तुकड्यांसोबतच ते मनात येतात.
सिनेमा आठवतात आणि आवडतात तेव्हा अनेकदा त्यातले तुकडे तुकडेच आठवतात. आवडत्या सिनेमांवर बोलताना किंवा लिहिताना त्यांचं मग एकसंध कोलाज मनात तयार होतं. सिनेमा पॅराडिसोमधल्या त्या शेवटच्या दृश्याप्रमाणे ते विलोभनीय असतं.
सिनेमांमधल्या प्रत्येक आवडत्या गोष्टींचं एक स्वतंत्र युग असतं. एखादं युग दिलिपकुमारचं, एखादं शम्मी कपूरचं.. बहुतेकदा राजेश खन्ना, अमिताभ, शाहरुखसारख्या सुपरस्टार्सचं. दिग्दर्शकांचेही एक स्वतंत्र युग. गुरुदत्त पासून ऋषिकेश मुखर्जीं, बासू चटर्जींचे, कधी ते बिमलदा, राज कपूर, व्ही.शांताराम यांचं. कधी एसजे, एलपी, ओपी, आरडी अशा मधाळ संगितकारांचं.. किंवा लता-आशा-रफ़ी-किशोरचं.
खरं तर हे प्रत्येकाचं वैयक्तिक एक युग असतं. त्या त्या वयात आपण त्यातून प्रवास करतो. त्यात बासू भट्टाचार्यांच्या अमर-मानसी ट्रिलॉजीचे, गुलझारच्या सिनेमांचे, सत्यजित रेंच्या चारुलता, पाथेरपांचालीचेही स्वतंत्र तुकडे.. माझ्याबाबतीत कधी ते कृष्ण-धवल सिनेमांचं कधी इस्टमन कलर्सचं. बहुतेकदा ते सिक्स्टीजच्या सिनेमांमधेच घोटाळत राहिलेलं. 
सिनेमांचे ऋतू वेगळे आणि त्यातल्या आठवणींचे तुकडेही वेगळे. कुणाच्या कोलाजमधे मधुबाला असते कुणाच्या वहिदा, कधी देवचा स्टायलिश रोमान्स मनात उरतो कधी शर्मिला टागोरच्या खळ्या, स्मिताच्या नजरेचे, अमोल पालेकरच्या साधेपणाचे, राजेश खन्नाच्या हळव्या लुक्सचे काही तुकडे असतात. अमिताभच्या मैं और मेरी तनहाईचे, लालजर्द गालिच्यावर नाचणार्‍या पाकिझाचे, तारोंका जाल मेरे दिल निसार पुछो ना हाल मेरे दिल का.. म्हणणा-या नुतनच्या सावळ्या, प्रसन्न हास्याचे.. तेरा मेरा प्यार अमर, फ़िर क्युं मुझको लगता है डर.. म्हणणा-या साधनाच्या विलोभनीय साध्या सौंदर्याचे असतात.. चंद्र आकाशात असतो, दुधाळ चंदेरी प्रकाश तिच्या अंगाखांद्यावरुन निथळत असतो.. कधी त्यात आख्खा मोगलेआझमही असतो. त्याचे तुकडे करणंच अशक्य.
माझ्या मनातल्या कोलाजवर जास्तीत जास्त तुकडे ब्लॅक ऍन्ड व्हाईट हिंदी सिनेमाचे आहेत, मधाळ आणि मॅजिकल तुकडे.. काळजात रुतून बसलेले. ब्लॅक ऍन्ड व्हाईट सिनेमांमधे काहीतरी अनोखी जादू होती. अनाडीतल्या वो चांद खिला.. मधे चंद्राच्या प्रकाशात नहाणारी नुतन, आणि जाने क्या तुने कही.. म्हणत मान वेळावून मागे पहाणारी वहिदा पहावी तर कृष्णधवलच.
या कोलाजमधे ’हम नशे में है संभालो हमे तुम.. असा आसमानावर तरंगणारा लताचा आवाजही आहे आणि त्यासोबतच्या लाखो चमकत्या चांदण्याही आहेत.
सिनेमा आपण नक्की का बघतो हा विचार माझ्या डोक्यात जाणीवपूर्वक कधी आलेला आठवत नाही, तसा तो कोणी करत असेल असंही वाटत नाही. हिंदी सिनेमा इतक्या आपल्या डीएनए मधेच फ़िट बसवलेला आहे.
भानू अथैयांच्या स्टुडिओत मी अनेकदा गेले आहे. तिथे माझं भान हरपून जातं. कारण आजूबाजूला सगळीकडे माझ्या आवडत्या सिनेमांच्या खुणा पसरुन असतात. साहिब बिबि और गुलाममधल्या मीना कुमारीची छोट्या बहुच्या रेशमी साडीतली, अनोख्या बंगाली घडणीच्या दागिन्यांनी सजलेली, भांगात सिंदूर भरलेलं भारवून टाकणारी तस्बिर असते, वक्त, पाकिझा, संगम या सिनेमांमधल्या पोषाखांच्या डिझाईन्सने भरलेली स्केचबुक्स असतात आणि भानूकडे तर हजारो आठवणींचा अनमोल खजिनाच असतो. मला पाऊलही उचलवत नाही तिथून. भानू शम्मी कपूरच्या देखणेपणाबद्दल, चार्मबद्दल बोलत असते, वहिदा रेहमानच्या ग्रेसफ़ुल हालचालींबद्दल बोलत असते आणि मी फ़क्त ऐकत असते.
तेव्हा मला हिंदी सिनेमा किती आवडतो हे पुन्हा एकदा समजतं.
माझा आवडता हिंदी सिनेमा अशा तुकड्यांमधे आहे. कधी तो गाण्याच्या टेकिंगमधे असतो, कधी दिग्दर्शनात, कधी सेट-डिझाइनिंगमधे, कधी कॉस्च्युम डिझाइनिंगमधे. गीतकारांच्या शब्दांमधल्या भावनेत, संगीतकारांच्या स्वरांत आणि गायक गायिकांच्या आवाजाच्या समुद्रात माझे असंख्य आवडते सिनेमे डुबक्या मारतात.
मेरा सायामधल सुनिल दत्त कातर, हळव्या आठवणींच्या जाळ्यात गुरफ़टून असतो, त्याला सारखी सारखी साधनाची आठवण येते, तशी मला आत्ता सिनेमातल्या आवडत्या दृश्यांची येतेय. कारण मला हिंदी सिनेमा आवडतो.
हिंदी सिनेमा पिढ्यांमधला पूल आहे.
आई तिने पाहिलेल्या सिनेमांच्या, देव आनंदच्या, राजकपूरच्या आवाराच्या गोष्टी सांगते, मी शाळेत असताना आम्ही एकमेकींसोबत बघितलेल्या अमिताभ बच्चनच्या, ऋषिकेश मुखर्जींच्या आणि अमोल पालेकरच्या सिनेमांच्या कहाण्या आम्ही मिळून आता माझ्या मुलींना सांगतो तेव्हा त्यात सिनेमाची कथानकं नसतात, पण तरीही त्या सिनेमांच्याच कहाण्या असतात. माझ्या आईला सिनेमांचं जबरदस्त वेड. आम्ही बहुतेकवेळा दर शुक्रवारी रिलिज होणार्‍या सिनेमांपैकी निदान एक तरी पहायचोच. ठाण्याला थिएटर्स खूप. आणि त्यातलं मल्हार तर घराच्या अगदीच जवळ.
माझ्या मुलींना माहीत असतं सिनेमातलं अमुक एक दृश्य आलं, गाण्यांमधला अमुक एक शब्द, कडवं आलं की आई असेल तिथून येणार आणि स्क्रिनवर नजर खिळवणार, त्या मग त्याकरताच हाका मारुन मारुन बोलावतात.
हिंदी सिनेमा नॉस्टेल्जिया जागवतो.
दादरच्या शारदामधे काश्मिर की कलीतलं एकही गाणं ऐकू आलं नव्हतं. म्युझिक सुरु झालं रे झालं की पब्लिक उभं राहून आरडाओरडा करत टाळ्या पिटत गाणी म्हणायला लागायची. तो माहोल अनुभवताना अंगावर काटा उमटला.
राज कपूर 'तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी..' गाताना समोर बसलेल्या टवटवीत चेहर्‍याच्या नुतनकडे बघत मिश्किलपणे डोळ्यांतून हसत एक भुवई उंचावत 'मै जो मरता हूं तो क्या, और भी मरते होंगे..' म्हणतो तेव्हा कलिजा खलास होतो.
राजेश खन्ना 'वो शाम मस्तानी मदहोश किये जाय.. ' गात नायिकेभोवती रुंजी घालत फिरतो तेव्हा हृदय (माझंच) आनंदाने भरुन जातं.
अमिताभ बच्चन जखमी नजरेने पहात कोणतेही संवाद म्हणतो तेव्हा काळजाच्या आत हलतं.
माझा रोमान्स हिंदी सिनेमातल्या या सगळ्या चार्मिंग, हॅन्डसम नायकांसोबत सुरु झाला तो आजतागायत.
हिंदी सिनेमाच तुम्हाला ही मुभा देत असतो. आपला हिरो शोधण्याची.
जेम्स बॉन्डचे सिनेमे बघण्याचं, शोधून शोधून मॅटिनीला लागलेले सिनेमे बघण्याचं कॉलेजातलं वेड आठवतं तेव्हा खरे आठवतात त्यावेळचे धमाल, उनाडक्यांचे दिवस, पावसातल्या भटकंतीचे, बिनाकारणाने खिदळत रहाण्याचे, स्वत:ला ग्रेट समजत माना उंचावत रस्त्यातून बघितलेल्या सिनेमावर ’अभ्यासू’ चर्चा करत चालण्याचे दिवस.
आणि मग होणार्‍या नवर्‍यासोबत इरॉस, एक्सलसियरमधे बघितलेले, आता नावही आठवत नसलेले सिनेमे. नंतरही अनेकदा त्याच्या सोबत डिव्हिडी प्लेयरवर बघितलेले सिनेमे.
नवर्‍याच्या आणि माझ्या सिनेमांच्या आवडी फ़ार जुळत नाहीत, पण काही फ़रक पडत नाही आम्हाला, सिनेमांची आवड कॉमन आहे इतकंच पुरतं.
सिनेमा जास्तीतजास्त पाहिला जातो कॉलेजच्या वर्षांमधे. मी सुद्धा सर्वात जास्त संख्येने सिनेमे ८०-९० याच दशकात पाहीले. का कुणास ठाऊक नंतरची बरीच वर्षं ८० ते ९० हे दशक सिनेमांच्या दृष्टीने सर्वात टुकार दशक असं वाटायचं. त्यामागचं कारण कदाचित सुमार गाणी’ हे असण्याची शक्यता आहे. आवडती, वारंवार ऐकायला येणारी, गाजलेली गाणी सगळी ६० ते ७० दशकातली. गाण्यांच्या बाबतीत म्हणजे जर ६० ते ७० हे दशक सुवर्णाचे मानले तर ८० ते ९० हे दशक तद्दन प्लास्टीकचे.
अर्थात हिंदी सिनेमांमधे ख-या अर्थाने कटेम्पररी सिनेमाचे युग सुरु झाले ८० ते ९० या काळातच. अंकुर, निशांतने सत्तरच्या दशकात सुरु केलेली नव्या, समांतर सिनेमाची चळवळ हिंदी सिनेमाच्या पारंपारिक प्रेक्षकांपासून जरा दूरच राहीली होती. मात्र या दशकातल्या कटेम्पररी, नव्या विषयाच्या सिनेमांच्य बाबतीत असं झालं नाही. कथा, चष्मेबद्दूर, अर्थ, सिलसिला, अर्धसत्य, मासूम, उत्सव, सारांश, उमराव जान, अंकुश, पुष्पक, मिर्चमसाला, कयामत से कयामत तक, तेजाब, मिस्टर इंडिया, मैने प्यार किया.. असे अनेक तर्‍हांचे सिनेमे या दशकात येऊन गेले आणि त्याचा ठसा अजूनही आहे. कलात्मक आणि व्यावसायिकतेचं उत्तम भान या दशकातल्या सिनेमांना होतं. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला.

कोणते सिनेमे बघायला जास्त आवडतात या प्रश्नाचं उत्तर माझ्याबाबतीत सोपं आहे. मानवी नात्यांची गुंतागुंत, स्त्री-पुरुष नात्यातले आकर्षणाचे, प्रेमाचे, दुराव्याचे, तिरस्काराचे, पुन्हा एकमेकांकडे परतून येण्याचे, प्रगल्भतेचे पैलू ज्या सिनेमांमधून दिसतात ते सिनेमे मला बघायला जास्त आवडतात. माणसांमधलं अमूर्त नातं पडद्यावर खुलत जाताना बघायला मला आवडतं.
मात्र सिनेमामधे परिसरही दिसायला हवा. त्यात प्रवास हवा. नात्यांचा आणि माणसांचा.
सिनेमा म्हणजे नटनट्या नाही, कथानकही नाही. सिनेमा या सगळ्याच्या पलीकडचा असतो.
जागतिक सिनेमा बघताना हे पलिकडचं दिसायला आणि समजायला लागलं.
प्रत्येकाचा सिनेमा वेगळा. प्रत्येकाची सिनेमा बघण्याची कारणे वेगळी. प्रत्येकाकरता सिनेमाचा अर्थही वेगळा. सिनेमांवर अभ्यासूपणाने, बारिकसारीक संदर्भांसहीत, तांत्रीक गोष्टी, दिग्दर्शन, अभिनय सर्वांवरच लिहिणारे, बोलणारे, चर्चा करणारे, चर्चासत्र भरवणारे असंख्य जण आजूबाजूला असतात.
सिनेमावर कोणी जुन्या आठवणी उगाळत, नव्या सिनेमांवर कडवटपणे लिहितात, कोणी एखादा दिग्दर्शक पकडून त्याच्या सिनेमांची चिरफ़ाड करत, स्क्रिप्ट उतरवून काढल्यासारखे लेख लिहितात, कोणी गाणी एके गाणी करत त्यावरच लिहितात, कोणी निरस तांत्रिक बाबींवरच चर्चा करतात.. कोणी अती भावूकपणे डोळ्यातून टिपं गाळणारे लेख लिहितात, कोणी उथळ लिहितात, कोणी भरभरुन लिहितात.. मी सगळंच वाचते. कारण मला हिंदी सिनेमा आवडतो.
दोन्ही हातांनी हिंदी सिनेमाच्या डिव्हिडीज उलट्या पालट्या करताना मनाला विलक्षण आनंद होत असतो.. मनातलं कोलाज झगमगून उठत असतं.
त्या त्या दिवसांतले मित्र-मैत्रिणी, जातात, रहातात, अधून मधून भेटतात किंवा कायमचेही दुरावतात. पण सिनेमा कायमच सोबत रहातो.
भारतीय सिनेमाचे आजचे वय शंभर वर्षांहूनही कितीतरी जास्त आहे. आजवर या सिनेमामुळे मनाला असीम आनंद मिळाला. सिनेमांचं ऋण मनावर सुखाचं ओझं ठेवून आहे, ते अंशतःही उतरवण्याची इच्छा नाही मात्र या निमित्ताने आवडत्या सिनेमांवर लेख लिहून निदान कृतज्ञता तरी व्यक्त करणे मस्ट आहे.
आठवणींमधे रुतून बसलेल्या, कायम सोबत असणार्‍या, आवडत्या सिनेमांबद्दल इतरांना सांगूनच सिनेमाचं देणं फ़ेडता येऊ शकेल कदाचित.

वाचत रहा..

Monday, April 30, 2012

द लास्ट हार्वेस्ट


गुरुदेव रविन्द्रनाथ ठाकूर महाकवी, श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिक, संगीतकार; साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त होणारे पहिले आशियाई आणि एकमेव भारतीय साहित्यिक. नानाविध कलांनी समृद्ध असे त्यांचे आयुष्य होते. रविन्द्रनाथांच्या समृद्ध कलाआयुष्यात चित्रकलेचा बहर सर्वात शेवटी आला. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दोन दशकांमधे (१९२८ सालापासून), वयाची साठी उलटून गेल्यावर त्यांनी पेंटींग्ज करायला सुरुवात केली.
हे वर्ष त्यांच्या दीडशेव्या जन्मशाताब्दीचं.
त्यांची चित्रे म्हणजे रेषांमधे लिहिलेल्या कविता होत्या; त्यांच्या शब्दांमधून व्यक्त होणा-या कवितांपेक्षा खूपच निराळ्या. ताल तोच होता मात्र स्वर वेगळे होते.
रविन्द्रनाथांचे पुतणे अवनिन्द्रनाथ आणि गगेन्द्रनाथ उत्कृष्ट चित्रकार होते. त्यांचे मोठे बंधू ज्योतिन्द्रनाथही सुंदर चित्रे काढत. रविन्द्रनाथ पेंटींगकडे वळले एका उपजत प्रेरणेतून. पौर्वात्य कला, आदिवासी कला आणि पाश्चिमात्य कला यांची सखोल ओळख त्यांना होती मात्र त्यांनी कोणतेही औपचारिक कलाशिक्षण घेतले नव्हते. कलाविष्कारांना आवश्यक असणारा उपजत ताल त्यांच्या अंतरात्म्यातच होता; अत्यंत देखणे सुलेखन ते करत असत. आपल्या हस्तलिखितामधे लिहित असताना झालेल्या चुका, गिरवलेले शब्द, मधल्या रिकाम्या जागा भरुन काढताना जन्मजात कलाकार असणारे रविन्द्रनाथ रेघोट्यांनी सुंदर, मनमोहक रेखाचित्रं बनवत. कधी त्या रेघोट्यांची फ़ुलपाखरं बनत, कधी आकाशात विहरायला उत्सुक पक्षी, कधी झाडं, झाडांआडून डोकावणारा चंद्र.. त्यामुळेच त्यांचे पेंटींगकडे वळणे ही सर्वात शेवटी घडलेली आणि सर्वात सहज अशी आत्मप्रेरणा होती. पाश्चात्य कला-अभ्यासक आणि समीक्षक स्टेला क्रॅमिरिश, ज्या रविन्द्रनाथांच्या फ़ार मोठ्या चाहत्याही होत्या, त्यांच्या पेंटींगसंदर्भात म्हणाल्या होत्या- त्यांचे हात प्रशिक्षित नाहीत; अंतरात्म्यातून उपजलेले लाभलेले वळण घेऊन ते कागदावर फ़िरतात. रविन्द्रनाथांची चित्रे आपल्या रेषा आणि आकार स्वत: शोधत जातात.
डूडल्स चितारण्यातून सुरु झालेली आपली चित्रकला त्यांनी जोपासली मात्र खूप निष्ठेने. पुढच्या पंधरा वर्षांच्या काळात त्यांनी जवळपास २५०० पेंटींग्ज चितारली. १९३७ सालात एकदा ते खूप आजारी पडले होते, अगदी कोमात जाण्याइतके. त्यांची चित्रकलेवरची निष्ठा इतकी की शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी सर्वात पहिल्यांदा एका आगळ्या निसर्गदृश्याचे पेंटींग त्यांनी चितारले. रविन्द्रनाथ आयुष्यभर विविध कलांमधून स्वत:ला व्यक्त करत गेले आणि तरीही सर्वात उशिरा भेटलेल्या चित्रकलेबद्दल त्यांच्या मनात एक वेगळीच आत्मियता होती, आत्माविष्कारातले चित्रकलेचे वेगळे महत्व उलगडून सांगताना ते म्हणतात-
मनुष्याला स्वत:च्या मनातल्या खूप गोष्टी शब्दांच्या माध्यमातून संपूर्णपणे आणि प्रामाणिकपणे व्यक्त करणे जमत नाही. त्यामुळे तो वेगळ्या माध्यमाच्या शोधात असतो, वेगळी भाषा तो शिकू पहतो; कधी ती स्वरांची असते, कधी रेषा आणि रंगांची. कोणत्याही युगात, कोणत्याही वातावरणातील मनुष्य या भाषेच्या साहाय्याने स्वत:ला संपूर्णपणे व्यक्त करु शकतो, ही त्या माध्यमांची ताकद. ही केवळ बौद्धीकतेला आव्हान देणारी, विचारवंतांची मिरासदारी असणारी भाषा नाही, ही व्यक्तिमत्वाची भाषा आहे. सामान्यातल्या सामान्यलाही उमजू शकेल अशी ही कलेची लिपी असलेली भाषा आहे. प्रत्येक मनुष्याने अशी ती आत्मसात करायला हवी, निदान काही प्रमाणात तरी.

सुरुवातीच्या काही वर्षांमधे आपली चित्रकला प्रदर्शित करण्याबाबतीत हा महाकवी खूप संकोचत होता. मात्र आपल्या चित्रांमधून आपण भाषेची बंधनं पार करुन सर्वांपर्यंत पोचू शकतो याची जाणीव झाल्यावर वयाची पर्वा न करता त्यांनी जगभराचा दौरा केला. १९३० सालातल्या मे महिन्यात प्रथम पॅरिसमधे आणि नंतर पुढल्या सहा महिन्यांमधे लंडन, बर्मिंगहॅम, बर्लिन, ड्रेस्डेन, म्युनिक, कोपनहेगन, मॉस्को, बोस्टन, न्यूयॉर्क, फ़िलाडेल्फ़िया या ठिकाणी रविन्द्रनाथांच्या पेंटींग्जची प्रदर्शने भरली. आपल्या चित्रकलेच्या प्रदर्शनाचा असा वादळी दौरा करणारे त्या काळातले ते पहिले भारतीय चित्रकार.
पुढील काळातील सर्व भारतीय आधुनिक चित्रकारांना, ज्यांना आपल्या कलेला परदेशापर्यंत पोचवण्याची इच्छा होती, त्यांच्याकरता रविन्द्रनाथ प्रेरणादायी ठरले.

रविन्द्रनाथ म्हणत माझ्या संगीत आणि साहित्याची नाळ त्यातल्या प्रादेशिकतेच्या, भाषेच्या संदर्भामुळे बंगालशी, भारताशी घट्टपणे जोडलेली आहे, मात्र माझी चित्रकला अशा भाषिक मर्यादांमधे बद्ध नाही, ती सगळ्या जगाशी नात जोडू शकतात. त्यांच्या पेंटींग्जमधून वैश्विक मानवता फ़ार सहजतेनं आणि परिपक्वतेनं डोकावली. इतर माध्यमांमधील कलाविष्कारांपेक्षा त्यांची पेंटींग्ज जागतिक कलेशी सर्वात जास्त जोडली गेली होती. कदाचित त्यामुळेच रविन्द्रनाथांची पेंटींग्ज जेव्हा पहिल्यांदा पाश्चात्य जगात प्रदर्शित झाली तेव्हा त्यांना ती जवळची वाटली.
ज्या शहरांमधे ते गेले तिथे बोलली जाणारी प्रत्येकच भाषा काही त्यांना येत नव्हती, अनेकदा दुभाष्याची गरज भासे, पण आपली चित्रकला मात्र कोणत्याही दुभाष्याच्या मदतीवाचूनही या शहरांमधल्या लोकांपर्यंत पोचू शकते याचा त्यांना मनापासून आनंद होत असे. अर्थात याचा अर्थ असा नाही की या अनोळखी मुलुखांमधे त्यांच्या पेंटींग्जबद्दल कुणाला काही प्रश्नच पडले नाहीत. अनेकांना वाटे की या पेंटींग्जमधे काही ’गूढ’ अर्थ भरलेला आहे; आणि म्हणून ते ती उलगडू पहात. पण रविद्रनाथांना असे काही अर्थ कोणी आपल्या चित्रांमधून शोधू नये असं मनापासून वाटे, त्यांनी स्वत:ही असा कोणता विशिष्ट अर्थ मनात धरुन ही पेंटींग्ज केलेली नव्हती. मनुष्यप्राणी सोडले तर बाकी सृष्टीत नीरव मौन भरलेलं आहे, ते मौन मनुष्याकडून भंग केलं जाऊ नये, आकाशातले ग्रहतारे, हिरवंगार गवत, रंगीत फ़ुलं कोणताही आवाज करत नाहीत, मग त्यांचं सौंदर्य व्यक्त करताना मनुष्यानेही त्यांच्या शांततेचा मान ठेवून कोणताही अर्थहीन कोलाहल करता कामा नये. सृष्टीत जो अर्थ भरलेला आहे, तो आणि तितकाच माझ्या चित्रांमधेही आहे, जर निसर्ग पहाताना कोणी प्रश्न विचारत नाहीत, निसर्ग कशाचंही स्पष्टीकरण करत नाही, तर ते मी तरी का करावं असं ते म्हणत.
मात्र काहीवेळा शब्द आणि रंग-रेषा एकत्रितच त्यांच्या मनात उमटत, अशावेळी आपल्या पेंटींग्जना साजेशी कविता ते करत. ’व्हेल्ड वुमन’ या आपल्या पेंटींगमधल्या स्त्रीच्या सखोल, गडद चेह-याबद्दल ते लिहितात-
वेदना आता शमली आहे
तरी दु:ख कायम आहे
वादळी पावसाचा दिवस उलटून गेल्यावर
येणारी संथ संध्याकाळ..
रविन्द्रनाथांची पेंटींग्ज त्यांच्या बाकी सर्व कलाविष्कारांपेक्षा खूप वेगळी होती, त्यांच्या चित्रभाषेची लिपी वेगळी होती.
निसर्ग, मानवी आकृत्या रविन्द्रनाथांच्या पेंटींग्जमधून व्यक्त झाले त्या रुपात जे त्यांच्या अंतरात्म्याने अवलोकित केले. अद्न्यातात भ्रमण करणारे कमल-पक्षी, सर्पाकृती शरिरे, तीव्र कोनांच्या भौमितिक आकृत्या.. या सगळ्यातून अंतर्मनातली वेदना, अस्वस्थपणाचे प्रकटीकरण होतं.
त्यांच्या पेंटींग्जमधे अनेकदा मुखवट्यांसारखे चेहरे असणा-या आकृत्या, अमानवी आकार दिसत; ही माझ्या स्वप्नांमधली भुते आहेत, शब्दांमधून ती प्रकटायला घाबरतात, मात्र रेषांमधे आपणहून येतात असं जे विधान त्यांनी केलं होतं ते चित्रकाराच्या आत्मप्रेरणांबद्दल काहीतरी खूप विचारात पाडणारं होतं.
जपानी चित्रांचा एक मोहक ठसा त्यांच्या पेंटींग्जवर आढळतो. गडद, चमकदार काळा रंग, सिलोनी फ़ुलपाखरांसारखा गर्द निळा, जावामधल्या प्राचीन बाटीक चित्रांमधला नाजूक तपकिरी रंग, वृद्ध वृक्षांच्या खोडांनी आत्मीयतेनं जोपासलेल्या शैवालांसारखा हिरवा, उत्तरेकडच्या भक्कम डोंगर उतारांवरच्या लायकेनसारखा हलका राखाडी, अश्विनातल्या पक्व, सोनेरी भातशेतीचा प्रसन्न, चमकदार पिवळा रंग रविन्द्रनाथांचा आवडता होता. मात्र गर्द तपकिरी आणि गडद काळाही त्यांच्या चित्रांमधे अनेकदा दिसे. भारताच्या मातीचा आणि त्यातल्या माणसांचा हा रंग होता; त्यांच्या चित्रांमधे येणे हे साहजिकच होते. पौर्वात्य कलेचे अभ्यासक आनंद कुमारस्वामी रविन्द्रनाथांच्या चित्रांना आधुनिक आदीम भारतीय कलेचा आविष्कार म्हणत असत.
माझ्या हातून घडलेल्या चुकांना मी लाजेने मान खाली घालून बसू देत नाही, मी त्यांना नृत्य करायला लावतो, नव्या आविष्काराचे रुप त्यांना देतो, चुकांमधूनच नवे सृजन घडते.
रविन्द्रनाथांच्या पेंटींग्जमधला भारतीय निसर्ग, वातावरण परदेशी नजरांना रिझवण्याकरता चितारलेले नव्हते. अवनिन्द्रनाथांच्या चित्रांमधे दिसणारा भारत नजरेला सुखवणारा, अभिमान वाटावा असा होता; असा भारत होताच पण यापेक्षाही खोलवरचा भारत होता जो रविन्द्रनाथांच्या चित्रांमधून दिसला, त्यात विचारात पाडणारी वेदना होती, मनाला स्पर्शणारे कारुण्य होते, भारतीय मातीत जन्मलेल्यांना फ़ार सहजतेनं त्या चित्रांशी नातं जोडता येत होतं.
राष्ट्रीयत्वाची भावना रविन्द्रनाथांमधे प्रखर स्वरुपाची होती, ब्रिटिश वसाहतवादी वृत्तीला त्यांचा तीव्र विरोध होता मात्र हा विरोध व्यक्त करण्याचा त्यांचा मार्ग वेगळा होता आणि माध्यमही वेगळे होते. सांस्कृतिक पोलादी पडद्याआड आपली कला दडवून ठेवणेही त्यांना मान्य नव्हते, जागतिक कलाविष्काराला त्यांची कला आत्मविश्वासाने आणि म्हणूनच बरोबरीने भिडत होती. रविन्द्रनाथांची कला, त्यांनी स्थापन केलेल्या शांतीनिकेतनसारख्या कलासंस्थांचा आधुनिक भारताला जगाच्या जवळ नेण्यात फ़ार मोठा वाटा आहे.
मात्र नंतरच्या काळात त्यांच्या कविता, कथा जगभरात अनुवादित होऊन पोचल्या आणि त्यांची चित्रे मात्र फ़ार कमी लोकांपर्यंत पोचली ही एक आयरनी.

Monday, April 16, 2012

हमारी अमृता


उन्हाळा लखलखायला लागला की मला अमृता शेरगिलची चित्रं आठवतात.
एका एप्रिलमधे दिल्लीच्या एनजीएमएमधे मी तिची चित्रे पाहिली होती. त्यामुळेही असेल कदाचित.
वसंत ऋतूत फ़ुलणार्‍या अमलताश आणि पलाशांचे उष्ण उन्हाळी रंग मिरवणारे अमृता शेरगिलचे कॅनव्हास.
उबदार ज्वालाफ़ुलांच्या लाल-केशरी, हळद पिवळ्या आणि अम्लान हिरव्या छटांमधे लपेटलेल्या स्त्रियांच्या समुहानी भरलेले ते कॅनव्हास.


कधी त्यात तीन मुली, कधी दोन. झुल्यावर बसणार्‍या, सहेलीच्या लग्नात तिचा साजशृंगार करणार्‍या, काही लाल व्हरांड्यात फ़ुलकारीची चादर अंथरुन गप्पा करणार्‍या, कधी एकटी- बाजल्यावर विश्रांती घेत पहुडलेली, केशरी पडद्याआड संकोचाने नहाणारी, काही नोकराण्या, एखादी नवी नवरी, किंवा चारपाईवर पसरलेली एखादी नखशिखांत जर्द गुलाबी.. पांढर्‍या मशिदीच्या भिंतीपल्याडच्या अंगणात प्राचीन कहाण्या सांगणार्‍या फ़किराभोवती कोंडाळं केलेल्या.. बायका मुली. म्लान आणि अबोल.
पॅरिसमधे चित्रकलेचं शिक्षण संपवून भारतात परतलेली अमृता चित्रं काढण्याकरता जिथे राहिली त्या सिमला आणि सरायामधल्या, किंवा आजूबाजूच्या पहाडी गावांमधल्या, खास भारतीय काळ्यासावळ्या वर्णाच्या, अंगावरच्या कपड्यांमधील झळाळत्या रंगछटांच्या आड आपल्या चेहर्‍यावरची उदासी, अस्वस्थ मौन दडवू पहाणार्‍या स्त्रिया आणि मुली. दबलेली लैंगिकता आणि एक अनामिक घुसमट त्या गडद रंगसंगतीच्या थरांआड कुठेतरी. समवयस्कांसोबत असतानाही आपापल्या वाट्याचं दु:ख एकेकट्यानी, मुकाट भोगणार्‍या
स्त्रिया. कोणीही हसत नाहीत, एकही उत्फ़ुल्ल नाही. चेहर्‍यावरचे भाव चित्रविषयांना आणि रंगसंगतीला विपरीत.
अमृताच्या चित्रांमधला हा विरोधाभास तिच्या व्यक्तिमत्वातूनच आला होता का? संपूर्ण पाश्चात्य, अत्याधुनिक व्यक्तिमत्वाच्या अमृताच्या धमन्यांमधून भारतीय रक्त वहात होते, पॅरिसला चित्रशिक्षण पूर्ण केलेल्या अमृताने चित्र काढली भारतातल्या लोकांची, गोगॅं आणि सेझांच्या चित्रशैलीचा प्रभाव असणार्‍या अमृताला मोहात पाडले अजिंठा-वेरुळच्या शिल्पांनी आणि भित्तीचित्रांनी.
युरोप सेझां आणि मातिझचा असेल, पण भारत माझ्या एकटीचा आहे असं उन्मत्त वाटू शकणारं, ठाशीव आत्मविश्वासू विधान करणारी अमृता शेरगिल. आधुनिक भारतीय चित्रकलेच्या इतिहासातले पहिले प्रकरण स्वत:च्या नावाचे करुन तिने आपले हे उदगार सार्थही केले.
अमृताला सामान्य भारतीय स्त्रियांची दैवाधीन विवशतेची आंतरिक सहसंवेदना जाणवली होती. ही जाण चित्रांमधून दाखवणारी, सर्वार्थाने आधुनिक, वैविध्यपूर्ण, प्रयोगशील चित्रकार.
शिमला आर्ट ऍकेडमीने उत्कृष्ट स्त्री-चित्रकार म्हणून केलेला गौरव मी चित्रकार आहे त्याचा गौरव करा. स्त्री म्हणून नको. असं सांगून नाकारणारी अमृता.
अल्पायुषी, वयाची तीन दशकंही न ओलांडू शकलेले, पण आत्यंतिक जिनियस असे काही कलाकार मनाच्या एक उदास कोप-यात कायमच अस्वस्थ हुरहूर जागवत ठाण मांडून बसून राहीलेले आहेत. त्यात मधुबाला, स्मिता पाटील, मेरिलिन मन्रो असते आणि व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ सोबत अमृता शेरगिल असते. अवघं अठ्ठावीस वर्ष आयुष्य लाभलेली अमृता जीवन जगली ते मात्र भरभरून, पॅशनेट, सर्व रंगांना आसुसलेपणाने स्वत:त शोषून घेत, निर्भिड, स्वच्छंदी.. म्हणूनच वादळी आणि वादग्रस्तही. गोगॅंच्या नुसत्या चित्रशैलीचाच नाही, त्याच्या बेदरकारपणे आयुष्य जगण्याच्या वृत्तीचाही तिला मोह होता बहुधा.
कसली अनामिक वेदना, उदास दु:ख तिच्या अंतर्यामी होतं, तिच्या वरवरच्या बेछूट, बेदरकार स्वभावामागे कोणता एकाकीपणा दडलेला होता जो तिच्या चित्रांमधल्या स्त्रियांच्या चेहर्‍यांमधून उमटला? तिच्या सुरुवातीच्या चित्रांमधले रंग हळवे आहेत, तरुण कोवळ्या वयातली उदास दु:ख त्यात प्रतिबिंबीत होतात. झुकलेले चेहरे, गहिर्‍या अनामिक दु:खाने भरलेले डोळे.
थ्री गर्ल्समधील गोलसर, तारुण्याचा गोडवा असलेले चेहरे, अंगावरच्या गडद रंगाच्या पोशाखांचा घोळदारपणा, त्यातून जाणवणारे मोहक सौष्ठव आणि भविष्यातील अनिश्चितता, वैवाहिक आयुष्य सुरु करण्याच्या आधीची हुंड्याची, न बघीतलेल्या नवर्‍याची, अनोळखी सासरची चिंता चेहर्‍यावर स्पष्ट उमटलेली.
झुल्यावर बसलेल्या तरुण मुलीच्या पायाचा तळवा अलगद जमिनीवर टेकलेला, दोन्ही हातांनी झुल्याच्या दोर्‍या हातात पकडलेल्या, पोशाखांचे आनंदी, सेन्शुअस रंग, चेहर्‍याचा नाजूकपणा, आता झुला हवेत उंच जाणार अशी अपेक्षा वातावरणात भरुन राहिली आहे, पण एरवी अशा चित्रांमधे मुलींच्या चेहर्‍यावर उतू जाणारा उत्फ़ुल्ल आनंद असतो, खट्याळ हास्य असतं ते मात्र कुठेही नाही. वयानुरुप उत्सुक, अधिर्‍या हालचालींना कोणते दडपण थोपवून धरत आहे?
झुल्यावर झुलण्याच्या आनंदापेक्षाही तीव्र आहे बांधलेपणाचे सूचन.. बाजूलाच पडलेल्या, घरात वापरायच्या लाकडी खडावांमधून व्यक्त होते.
टेकवलेल्या पायाच्या तळव्याची काव्यात्मकता, उच्च भावनीक तीव्रतेचं सूचन त्यानंतर असंच व्यक्त झाल रेंच्या चारुलतामधून.
नवधूचा शृंगार करणार्‍या मैत्रीणींचे समुह चित्र मोहक रंगसंगतीचे. चित्ररचनेमधे आनंद भरुन आहे. स्त्रियांच्या चेहर्‍यावर अनामिक गहिरे भाव आहेत, त्यातल्या गौरवर्णीय नववधूच्या शृंगारसोहळ्यातील सारे रंग, गंध उमलून येत आहेत असं वाटतं. वधूच्या समोर बसलेल्या गडद, रंगीबेरंगी चोळी घातलेल्या युवतीच्या स्निग्ध चेहर्‍यावर परिपक्व, विचारमग्न भाव.
चित्राची पिवळसर हिरवी पार्श्वभूमी, बैंगणी, गुलाबी, हिरव्या अशा शुभ रंगांचा सुखद सोहळा, त्यातून उठून दिसणारा शुभ्र वर्ण, आजूबाजूच्या अविवाहित सख्या, त्यांचे सावळे वर्ण विरोधाभासाकरता, कदाचित जात-आर्थिक उच्चनीचतेचा भेदही असेल, पण या सर्वांमधून एक स्नेहमय प्रवाह वाहतो आहे.
अमृता शेरगिलची सगळीच चित्रं म्हणजे काही अद्वितीय मास्टरपीसेस नाहीत, तिच्या चित्रांना लाभलेलं यश हे तिच्या स्वत:च्या दृष्टीने अनेकदा अपयशही होतं. पण ती सातत्याने नवे प्रयोग करु पहात होती, पाश्चात्य प्रभावातून मुक्त होत स्वत:ची शैली शोधू पहात होती, स्वत:ला त्या चित्रांमधून शोधत होती, कधी अपयशाने खंतावत होती, कठोरपणे आत्मपरिक्षण करत होती.
भारतात आल्यावर तिच्या सुरुवातीच्या चित्रांमधे न्यूड्स, पोर्ट्रेट्स, निसर्गचित्रे, स्टील लाइफ़ वगैरे विषय आहेत. या चित्रांमधली रचना अचूक आहे, पाश्चात्य कलाशिक्षणातून ती अर्थातच तिला साध्य झाली आहे, पण तिची चित्रं पुन्हा पुन्हा बघाविशी वाटतात कारण त्यांच्यातली इमोशनल इन्टेन्सिटी.
आपल्या थोडक्या आयुष्यातही लिजन्ड बनलेल्या अमृताच्या रसरसत्या जीवनेच्छेचे उन्मादी रंग कॅनव्हासवर पसरलेले आपल्याला दिसतात. तिच्या चित्रांवर नजर मंतरल्यासारखी खिळून रहाते.
जिनियस जन्मत नाही, तो घडतो. व्यक्ती आपल्या मेहनतीने आणि कष्टाने जिनियस बनते. अमृता जिनियस होती. आणि त्यामागे तिची मेहनत, अभ्यास, चिकाटी होती. मात्र अमृताच्या खाजगी आयुष्याची, तिच्या मुक्त, बेफ़िकिर लैंगिक आयुष्याची, गर्भपातांची चवीने चर्चा करुन, तिच्या फटकळ, उर्मट स्वभावाच्या वर्णनांनी आपल्या पुस्तकाची पानच्या पानं खर्च करुन तिच्या तथाकथीत मित्रांनी, समीक्षकांनी आणि नातलगांनीही तिच्या या मेहनतीची, परिश्रमांची दखल घेतली नाही. चित्रकला, चित्रकार, कलेमागच्या प्रेरणा, मानवी जीवन, तत्त्वज्ञान यावर सखोल चिंतन करणारी तिची पत्रे वाचली गेली ती केवळ तिच्या आयुष्यात येऊन गेलेल्या सुप्रसिद्ध व्यक्तींनी तिला खाजगी पत्रांतून काय लिहिले हे जाणून घेण्याकरता.
मनस्वी अमृताच्या खाजगी आयुष्याची चर्चा तिच्या चित्रांपेक्षा जास्त केली गेली हे दुर्दैव. तिचे आणि चित्ररसिकांचेही.
अमृता शेर-गिलच्या चित्रांमधल्या झळाळत्या रंगांमधे लपेटलेल्या, समुहात राहूनही एकाकी असलेल्या स्त्रियांच्या चेहर्‍यांवरचे अबोध भाव कधी कधी फार स्पष्टपणे उलगडतात.

Wednesday, March 28, 2012

पिवळ्या घरातले दोघेजण


अजरामर पन्नास चित्रं, जी प्रेक्षकांनी पुन्हा पुन्हा पाहिली, त्यांचा अल्बम पहात असताना देदिप्यमान, विलक्षण प्रतिभेची चुणूक प्रत्येक रेषेवर, रंगाच्या प्रत्येक फटका-यावर दिमाखानं मिरवणा-या मायकेल ऍन्जेलो, लिओनार्दोच्या भव्य चित्रांना मागे टाकून अचानक व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या आर्ल्समधल्या बेडरुमचं साधसुधं चित्रं समोर येतं.


व्हॅन गॉघच्या सुप्रसिद्ध सूर्यफ़ुलांना, सोनेरी गव्हाच्या शेतांना, एकाकी पायवाटेवरच्या सायप्रस वृक्षांना मागे टाकून ही वर वर सामान्य दिसणारी खोली पुढे येते.
असं काय आहे या पिवळ्या रंगानी रंगवलेल्या खोलीत की जगभरातल्या लोकांना पुन्हा पुन्हा ही खोली न्याहाळाविशी वाटावी?
द यलो रुमअत्यंत साधी आहे, कुणाची तरी वाट पहाणारी, तयारीत सज्ज असलेली ही खोली, सोबतीची अपेक्षा करणारी. दोन खुर्च्या, दोन उशा.. बंद खिडकी, विरुद्ध रंगांचे, जाडसर रंगवलेले ठळक पॅचेस, काहीसं विचित्र वाटणारं पर्स्पेक्टीव्ह कारण मागच्या भिंतीचा कोन जरासा तिरपा.
फ़्रान्सच्या दक्षिणेच्या आर्ल्स या खडकाळ, वैराण प्रदेशात चित्र काढण्याकरता व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ येऊन राहीला त्यावेळी तो यलो हाऊसमधे रहात होता. तो आर्ल्समधे होता त्यापैकी नऊ महिने त्याचा मित्र, जो स्वत: प्रतिभावंत चित्रकार होता, तो पॉल गोगॅं त्याच्या सोबत होता.
अस्वस्थ मनोवृत्तीचा, अशक्त कुडीचा व्हिन्सेन्ट आणि कणखर स्वभावाचा, बलदंड गोगॅं, त्यांची व्यक्तिमत्वे, स्वभाव वेगळे. मैत्री, आपुलकी, स्पर्धा, असूया यांचं एक विलक्षण स्फोटक रसायन त्या दोघांत होतं.
गोगॅंने आर्ल्सला यावं, यलो हाऊसमधे रहावं, दोघांनी उघड्या निसर्गात लांबवर भटकत जाऊन चित्रं रंगवावी, एकमेकांच्या सोबतीने रहावं याचा गॉघने आर्ल्समधे आल्यापासूनच ध्यास घेतला होता. गोगॅंला इकडे येण्याबद्दल आग्रह करणारी पत्रे तो आपला भाऊ, थिओला वारंवार पाठवत होता. गोगॅं अखेर यायला तयार झाला. त्याचं आगमनाची विलक्षण उत्कंठतेनं वाट पहाणा-या व्हिन्सेन्टच्या मनावर आता त्याच्या स्वभावानुसार तणाव आला. गोगॅंला आर्ल्स आवडेल का? त्याचा अपेक्षाभंग तर होणार नाही इकडे आल्यावर? हा वैराण प्रदेश पाहून तो चिडणार, वैतागणार तर नाही?
या अस्वस्थतेला मागे सारत त्याने यलो हाऊसमधली खोली सुसज्ज करायला सुरुवात केली. मनावरचा ताण कमी करायला त्याला काही वेगळे व्यवधान हवेच होते.
खोली सजवण्याकरता व्हिन्सेन्टने मनापासून कष्ट केले. ही खोली कलाकारांची वाटावी, त्यातल्या फ़र्निचरपासून भिंतीवर टांगलेल्या चित्रांपर्यंत प्रत्येकाला वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व असावे, खोलीत मनाला निवांतपणा मिळावा असं त्याला वाटत होतं. फ़िकट व्हायोलेट रंगाच्या भिंती, लालसर तपकिरी जमीन, ताज्या लोण्याच्या पिवळसर रंग असलेल्या लाकडाचे पलंग आणि खुर्च्या, पलंगावरची चादर आणि उशांचे अभ्रे लिंबाच्या पिवळसर हिरव्या रंगाचे, गडद लाल पांघरुण, हिरव्या खिडक्या, जांभळा दरवाजा. खोलीत फर्निचर फ़ार नाही. सदैव आर्थिक चणचण असणा-या व्हिन्सेन्टकडे खोलीत भपकेबाज फ़र्निचर आणण्याइतके पैसे अर्थातच नव्हते. लाकडी पलंग, दोन खुर्च्या, कपडे टांगायला स्टॅन्ड, लाकडी ड्रेसिंग टेबल, केस विंचरायला ब्रश, दाढीचे सामान, आरसा.. इतकंच. पण झळाळत्या रंगांनी ती भरुन गेली आहे. खोलीचं ऐश्वर्य आहे भिंतीवर टांगलेली व्हिन्सेन्टने स्वत: रंगवलेली चित्रं. त्यात त्याचं स्वत:चं व्यक्तिचित्र आहे आणि त्याची लाडकी सूर्यफ़ुलंही आहेत.
व्हिन्सेन्टच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी गोगॅ आर्ल्सच्या वास्तव्याबद्दल लिहिताना या चित्रांबद्दल लिहितो- "माझ्या पिवळ्या खोलीत, जांभळ्या डोळ्यांची सूर्यफ़ूलं, पिवळ्या पार्श्वभूमीवर झळाळत असायची, त्यांचे देठ पिवळ्या टेबलावरच्या, पिवळ्या फ़ुलदाणीत बुडालेले. चित्राच्या कोप-यात चित्रकाराची सही होती: व्हिन्सेन्ट. खोलीतल्या पिवळ्या पडद्याआडून सोनेरी सूर्यप्रकाश जेव्हा या फ़ुलांवर पडायचा तेव्हा संपूर्ण खोली सोन्यासारख्या झळझळीत स्फ़ुरदिप्तीने भरुन जायची; रोज सकाळी माझ्या पलंगावरुन उठताना मनात विचार यायचा, फ़ार सुंदर वास असणार या फ़ुलांना."
आर्ल्समधल्या यलो हाऊसमधल्या या खोलीत व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या आयुष्यातला सर्वात वादळी, अस्वस्थ, वेदनादायी आणि सर्वात सर्जकही असा कालखंड कोंडलेला आहे. इथल्या वास्तव्यातच व्हिन्सेन्टने आपल्या मित्रावर, पॉल गोगॅंवर प्राणघातक हल्ला केला, नंतर आलेल्या मानसिक तणावाच्या झटक्यात स्वत:चा कान वस्त-याने कापला. वाहत्या रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर पडून राहीला. व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या एकाकी, वेदनामय आयुष्याच्या सगळ्या जखमा या खोलीत उघड्या पडल्या.
दोन सर्वस्वी भिन्न व्यक्तिमत्वाचे चित्रकार, दोघांनी काही काळ एकत्र राहून भरपूर चित्रं काढली, कल्पनांची देवाणघेवाण केली, त्यांच्यात वाद झाले, काही हिंसक पातळीवर पोचले. या सर्व दिवसांचे पोत, कधी मुलायम, कधी ठाशीव, अनेकदा खडबडीत असे या चित्राला आहेत. व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघचं हे सिन्ग्युलर बायोग्राफ़िकल वर्क. त्याच्या आयुष्यासारखंच नाट्यपूर्ण, एकाकी आणि झळझळीत, प्रतिभावंतही.
आर्ल्समधल्या द यलो हाऊसची कहाणी जाणून घेतल्यावर साध्यासुध्या, कुणाची तरी वाट पहात असणा-या या पिवळ्या खोलीला विलक्षण करुण संदर्भ प्राप्त होतात. ‘एव्हरी आर्ट इज बायोग्राफ़िकल’ हे फ़ेलिनीचे वाक्य बेडरुम इन आर्ल्सच्या बाबतीत आत्यंतिक खरे वाटते.
व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघने चितारलेले गव्हाच्या शेतावरचे, आरती प्रभूंच्या काळ्या पक्ष्यांच्या तिरप्या भरारीची आठवण जागवणारे कावळे, रस्त्यावरचा एकाकी सायप्रस पहाताना कोणत्याही संदर्भांवाचूनही मनाला खिन्नता, उदासी येतेच पण जेव्हा संदर्भ कळतात तेव्हा मन जखमी होते. आपल्या भावनांची तीव्रता शतपटींने वाढते. मग त्याच्या अस्थिर, जलद रंगांच्या फ़टका-यांचे, पिवळ्या रंगाच्या अतिरिक्त वापराचे मूळ त्याच्या औदासिन्यात असू शकेल हे जाणवते.
कलाकृतीचा आस्वाद कलाकाराच्या कोणत्याही वैयक्तिक, सामाजिक, राजकीय संदर्भांशिवाय स्वतंत्रपणे घेता यायला हवा हा काही समीक्षकांचा आग्रह असतो. पण जर चित्रकाराच्या वेदनेचे, जीवनसंघर्षाचे अवशेष त्या चित्राला चिकटून राहिलेले असले तर तेही जाणून घेणे चित्रांच्या बाबतीत आवश्यकच ठरते. तसं केलं नाही तर आर्टिस्ट्स इन्टेन्शनला ते नाकारणे ठरते आणि मग त्या चित्रकृतीवरही तो अन्याय ठरतो. माहीत असलेल्या, माहीत करुन घेतलेल्या जीवनसंदर्भांच्या खूणा चित्रांमधे शोधणे अपरिहार्य ठरते.

माणसांची चित्रं

सामान्य माणसं जेव्हा चित्रांमधून येतात तेव्हा त्यांना इतर कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण ओळख नसते. त्यांचं सामान्य असणं, त्यांचं नीरस, रुटीन आयुष्य हेच त्यांचं वैशिष्ट्य असतं. चित्रकारांच्या दृष्टीने. म्हणूनच ती जेव्हा चित्रांमधून येतात तेव्हा समुहाने येतात.
सामान्यांचं जीवन, त्यांचे प्रश्न, गरीबीची भूक, कष्ट फ़ार कमी वेळा चित्रांमधे उतरली, जेव्हा उतरली, तेव्हा त्यांचं फारसं स्वागत झालं नाही, सामान्यांकडूनही नाही.
साहजिक आहे, कष्टमय, नीरस जीवन रोज जगणा-यांना आपल्या या जगण्याचं चित्रणं बघण्यापेक्षा आभासी, जे आपल्याजवळ नाही, जे हवसं वाटतय ते बघण्यात जास्त रुची.
चित्रकला सुरुवातीपासूनच देवालयांमधे रुजली, राजाश्रयाने फोफावली. त्यामुळे धार्मिक, ऐतिहासिक चित्रविषय, राजबिंडी व्यक्तिचित्रणं, रमणीय निसर्गचित्रं जास्त लोकप्रिय झाली.
चित्रचौकटीतलं ते अद्भूत विश्व, त्या कहाण्या सामान्यांच्या नव्हत्या, चित्रांमधल्या नायक नायिकांच्या भावभावना कितीही खर्‍यासारख्या भासल्या तरी त्यातून सामान्य माणसाच्या वेदना उमटत नव्हत्या. सामाजिक बांधिलकी मानणारे कलाकार मुळात हाताच्या बोटावर मोजण्याइतके, चित्रकार तर आणखीनच कमी. तरीही काही मोजक्या चित्रकारांनी सामान्य माणसाला आपल्या कॅनव्हासवर स्थान दिलं आणि तेही केवळ त्यांची गरिबी, सामान्य, हलाखीतलं जगणं 'कलात्मकरित्या' देखणं दिसतं म्हणून नाही, तर खरोखर या चित्रकारांना सामान्य माणसाचं जगणं रंगविण्यात रस होता.
वेलाकुझचं १७व्या शतकातलं कष्टकर्‍यांना जेवण करुन वाढणार्‍या स्त्रीचं चित्र किंवा व्हॅन गॉघचं दरिद्री खाणकामगारांचं, बटाटे खाऊन भूक भागवू पहाणार कुटुंब, त्या काळापेक्षा नंतरच लोकांनी नावाजलं, आणि तेव्हाही चर्चा त्या माणसांपेक्षा चित्रकाराच्या गुणवत्तेबाबतच झाली.


९व्या शतकात गुस्ताव कोर्बेने भव्य आकाराच्या कॅनव्हासवर सामान्य लोकांचं आयुष्य रंगवलं तेव्हाही त्याला या बिनमहत्वाच्या, सामान्य विषयाकरता एव्हढी मोठी जागा आणि आपली कला फ़ुकट घालवल्याबद्दलची टीका सहन करायला लागली.
अमेरिकेत ग्रेट डिप्रेशनच्या काळात सोशल रिऍलिझम या आर्ट मूव्हमेन्टने जोर धरला. भारतामधे मात्र सामाजिक सत्यता चित्रांमधून यायला त्यानंतर निदान दोन दशकं वाट बघायला लागली. भारतीय चित्रकलेवर रविवर्माचा, आर्टस्कूल्समधल्या ऍकेडेमिक शैलीचा प्रभाव तीव्र होता, प्रोग्रेसिव्ह आर्टची चळवळ अधिक काळ रुजली असती तर कदाचित हा पाया त्यांच्याकडून भक्कमपणाने घातला गेलाही असता.
५०च्या उत्तरार्धात सामाजिक मूल्यांमधे मुलभूत बदल होऊ लागले. औद्योगिकीकरण, राजकीय अस्थिरतेच्या काळात हे बदल अधोरेखीत करणारी, नव्या पिढी समोरील प्रश्नांना उच्चारणारी समकालीन चित्रभाषा आधुनिक भारतीय चित्रकलेच्या मुख्य प्रवाहात रुळवण्याचे महत्वाचे काम केले सुधीर पटवर्धन, गीव्ह पटेल, नलिनी मलानी, विवान सुंदरम यांनी. सामाजिक समस्यांना त्यांनी वैयक्तिक आपलेपणातून न्याहाळले. त्यांच्या चित्रांमधून शहर दिसलं. शहरी ताणतणाव, कुटुंब-समाजाची घुसमट दिसली. भाऊ पाध्ये, किरण नगरकर, अरुण कोलटकर, नारायण सूर्वे, नामदेव ढसाळ अशा समकालिनांच्या साहित्यातून जशी खरी मुंबई दिसली तशी ती यांच्या चित्रांमधूनही दिसली.
सामान्य माणसाला सातत्याने आपल्या कॅनव्हासवर स्थान देणार्‍या चित्रकार सुधीर पटवर्धनांची कामगिरी या सर्वामधे मुलभूत आणि महत्वाची. त्यांची शैली थेट. चित्रभाषा सहज, सोपी पण अंतर्मुख करणारी. त्यांच्या चित्रातल्या माणसांच्या कहाण्या खर्‍या, आजच्या.
ही माणसं दीर्घकाळ लक्षात रहातात, त्यांच्या जगण्याबद्दल विचार करायला भाग पाडतात. कधी ती माणसं रस्त्यावरच्या अपघाताला अलिप्तपणे न्याहाळणारी, कधी उसळलेल्या दंगलीत स्वतःचा जीव बचावू पहाणारी, कधी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी कष्ट करणारी, कधी लोकलच्या प्रवासातली. समाजातली माणसे आणि समाजाचाच एक भाग असलेल्या कुटुंबातलीही.
सुधीर पटवर्धनांचं मला सर्वात अस्वस्थ करुन टाकणारं चित्र फुल सर्कल’.
मध्यमवर्गीय कुटुंब रहात असलेल्या घरातली एक खोली. समोर खुर्चीवर हातात मोबाईल घेऊन बसलेली एक व्यक्ती, बाजूला एक स्त्री वाकून केर काढते आहे. बिछान्यावर वृद्ध आजारी गृहस्थ. पलीकडे एक तरुण. पाठमोरी तरुण स्त्री. एक लहान मुलगा खेळण्यातल्या गाड्यांशी खेळतो आहे.
हे सारेजण एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत हे निश्चित. बिछान्यावरची आजारी व्यक्ती एकेकाळची घरातली कर्ती असावी, भोवताली त्यांचा भाऊ, मुलगा, सून, नातवंड. आजारपणाचं सावट घरातल्या प्रत्येकाच्या दैनंदिन व्यवहारावर अपरिहार्यतेनं पडलेलं स्पष्टपणाने दिसतं. खुर्चीतल्या गृहस्थांच्या चेहर्‍यावर थकवा, डोळे मिटलेले. डुलकी किंवा विचारांमुळे. हातातल्या मोबाईलवर आजारी व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल नुकतीच काही चर्चा झाली असावी. कुणाच्या तरी चौकशीला उत्तर दिलं गेलं असेल.. अजून काहीच फरक नाही, जैसे थे. एक ओशाळवाणेपणा चेहर्‍यावरच्या थकव्यात मिसळलेला. मागचा तरुण निश्चित असा कुठे पाहत नाही. त्याचे खांदे झुकलेले, चेहरा ओढलेला आहे. तोही कसल्या तरी विचारात मग्न. पाठमोर्‍या स्त्रीच्या देहबोलीतून त्रयस्थता, अलिप्तता व्यक्त झाली आहे. तिच्या पाठीतून कठोरपणाचा भाव जाणवतो.
ही सहा माणसं एका खोलीत असली तरी सुटी सुटी आहेत. कुणीही एकमेकांशी, किंवा काहीच बोलत नाहीयेत. प्रत्येकजण स्वतःतच मग्न. कसलं तरी दडपण त्यांच्यावर आहे. सर्वच व्यक्तींचे चेहरे झाकोळलेले आहेत. लांब मुदतीच्या आजारपणाचं, येऊ घातलेल्या मरणाचं सावट सर्वांच्या चेह-यावर पडलेलं दिसतं.
त्या सगळ्यांना एकत्र बांधणारी व्यक्ती डोळे मिटून बिछान्यावर पडलेली आहे. लहान मुलगाही आपलं जग निर्माण करून त्यात मग्न आहे. थोडीफ़ार हालचाल करतात ती केर भरणारी स्त्री आणि हा लहान मुलगा. बाकी काळ साचून राहिलेल्या शेवाळासारखा स्तब्ध. एकेकाळी घरात वाहता असलेला जीवनप्रवाह आता थांबल्यासारखा झाला आहे. काळाच्या एका अनाकलनीय लूपमधे अडकल्यासारखी ही माणसं अनंत काळ अशीच बसून असल्यासारखी.
ही खोली जगण्याच्या चैतन्यानं नव्हे तर मरणाच्या औदासीन्यानं भारलेली आहे.
हे लोक काय विचार करत असतील? लहान घरात, जागेची अडचण असताना खोलीतला मुख्य पलंग वृद्ध, बिनकामाच्या व्यक्तीकडून असा दीर्घकाळाकरता अडवला गेल्यावर घरातल्यांच्या, मग ते जवळचे नातेवाईक का असेना, मनात जे काही कटू विचार उमटून जातील ते सारे या चित्रात स्पष्ट वाचता येतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती घरातलं आजारपणाचं वातावरण कधी एकदाचं संपेल याची वाट पाहते आहे. प्रतीक्षेमुळे सहनशक्तीचा अंत होतो, मुखवटे गळून पडतात . मृत्यू किंवा आजार बरा होऊन, कसंही. पण वातावरण पूर्वपदावर यावं अशी प्रत्येकाच्या मनात तरळती इच्छा. दुस-याच्या जगण्या-मरण्याच्या विचारानं या चित्रातली स्थिती भारलेली आहे. जवळच्या व्यक्तीच्या मरणाची इच्छा परिस्थितीला शरण जाऊन का होईना, मनाच्या खोल तळातून पृष्ठभागावर येते त्या वेळी काय स्थिती होत असेल?
हे चित्र पाहत असताना आपण अस्वस्थ होतो. कारण हे चित्र आपल्याच मनाचा तळ ढवळत असतं.
कलेने अंतर्मुखही करायला हवे. कलेचे ते कर्तव्य आहे.
=====================